कर्नाटकात अखेरीस "कमळ" फुललं !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 July 2019
  • कर्नाटकात आघाडी सरकारने विश्‍वास गमावला

बंगळूरू : कर्नाटकातील सत्तानाट्य आज अखेर संपले. विधानसभेमध्ये विश्‍वासदर्शक ठरावावरील मतदानात काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या आघाडीला केवळ ९९ मते मिळाली, तर भाजपच्या बाजूने १०५ इतकी मते पडल्याने आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर लगेचच नवी दिल्लीत भाजपची सत्तास्थापनेसाठी खलबते सुरू झाले असून बी.एस. येडीयुरप्पा हेच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पंधरा आमदारांनी बंड केल्याने कुमारस्वामी सरकार अल्पमतात आले होते. पण, विश्‍वासदर्शक ठरावाची परीक्षा लांबणीवर टाकत कुमारस्वामींनीही सत्ता ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला होता. सत्तेचा हा पेच सर्वोच्च न्यायात गेला खरा. पण, तेथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. राज्यपालांनी ठरवून दिलेल्या डेडलाइन धुडकावून सत्ता वाचवताना सरकारचे विधिमंडळात मात्र पानिपत झाले. दरम्यान, विश्‍वासदर्शक ठराव गमावल्यानंतर कुमारस्वामी यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. या वेळी राज्यपाल वजुभाई वाला यांनी हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी १८ जुलैला विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर गेले चार दिवस त्यावर चर्चा घडवून आणण्यात आली. राजीनामा दिलेले काँग्रेस व ‘जेडीएस’चे आमदार परत येतील, या आशेने चार दिवस आघाडी पक्षांनी विश्वासमतास विलंब केला. शेवटी असंतुष्ट आमदार आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आघाडी सरकारने विश्वासदर्शक ठरावावर आज मतदान घेण्यास अनुमती दिली. राज्यपालांचा दबाव, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना यामुळे सभाध्यक्षांनीही विश्वासदर्शक ठरावावर आजच मतदान घेण्याचा आग्रह धरला होता. 

आज पुन्हा मतदानास विलंब केल्यास सभाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा त्यांनी इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर अखेर आघाडीने विश्वासदर्शक मतदानास सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सभागृहात विश्वासदर्शक प्रस्ताव सादर केल्यानंतर प्रथम आवाजी मतदान घेण्यात आले. त्यानंतर विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने सदस्यांना उभे राहून मतदान घेण्यात आले. त्यानंतर विरोधात मतदान घेण्यात आले. 

आघाडी सरकारच्या बाजूने ९९ व विरोधात १०५ मते पडल्याने आघाडी सरकारला १४ महिन्यांनंतर सत्ता गमवावी लागली. यावेळी वीस आमदार गैरहजर होते. त्यात जेडीएस-काँग्रेसचे १७, अपक्ष-२ आणि बसपचा एक आमदार गैरहजर होता. विश्‍वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी १०३ मते आवश्‍यक होती. मात्र कुमारस्वामींच्या बाजूने ९९ मते पडली.

दरम्यान, विश्‍वाससदर्शक ठरावावर चार वाजेपर्यंत चर्चा करून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार यांनी सकाळीच जाहीर केला होता. आज सकाळी उशिराच अधिवेशनाच्या कामकाजाला सुरवात झाली. विश्वास मतदानाबरोबरच आज सर्वच प्रक्रिया  पूर्ण होणे गरजेचे असल्याचे सभाध्यक्षानी प्रारंभीच सभागृहात सांगितले. 

"हा लोकशाहीचा विजय आहे. चौदा महिन्यांच्या आघाडी सरकारला जनता वैतागली होती. विकास थांबला होता. माझे सरकार शेतकऱ्यांना प्राधान्य देईल. कर्नाटकात विकासाचे नवे पर्व सुरू होईल."

- बी. एस. येडियुरप्पा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष

"होय, मी विश्वास मत जिंकण्यास अंतिम क्षणापर्यंत प्रयत्न केला. बहुतेक वेळा आमदारांनी आता काय होईल, यावर चिंता व्यक्त केली. त्यांना व सरकार वाचविण्याचा प्रयत्न केला. मला दुःख वाटत नाही. मी आनंदाने या पदाचा त्याग करीत आहे."

- कुमारस्वामी, मावळते मुख्यमंत्री

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News