येत्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर २२० जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019
  • कार्यकारिणीच्या बैठकीत राज्यातील प्रत्येक बुथ मजबूत करण्याचा संदेश
  • गोरेगाव येथील नेस्को संकुलात रविवारी झाली भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत स्वबळावर २२० जागा जिंकण्याचे लक्ष्य भारतीय जनता पक्षाने आखले असून, यासाठी प्रत्येक मतदारसंघात विजयी उमेदवारावर लक्ष केंद्रित करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी युतीबाबत कार्यकर्त्यांनी चिंता करू नये. बुथपातळीपासून भाजपला ताकदवान बनवा, त्या दृष्टीने तयारीला लागा, असे स्पष्ट केले. प्रदेश भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही  कार्यकर्त्यांनी लक्ष्यपूर्तीसाठी तयारीला लागावे, असा संदेश दिला.

गोरेगाव येथील नेस्को संकुलात रविवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. याला  भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा  उपस्थित होते. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी नड्डा यांनी चैत्यभूमी, स्वा. सावरकर स्मारक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकास भेट दिली व अभिवादन केले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती तुटली होती. ‘तीन पायांची शर्यत नको,’ अशी टिप्पणी करीत भाजपचे माजी आमदार मधू चव्हाण यांनी युती तोडून स्वबळावर लढण्याचे आवाहन त्या वेळच्या कार्यकारिणीत केले होते.

त्यानंतर शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून घोडे अडून युती तुटली आणि भाजपने स्वबळावर १२३ जागा जिंकून सरकार स्थापन केले. तर, शिवसेनेला ६३ जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली. तर, २०१९ च्या लोकसभेला भाजपने शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढत युती केली. मात्र, विधानसभेला स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.

‘मी पुन्हा येईन’
मी कोणत्याही परिस्थितीत पुन्हा येईन, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना दिली. याबाबतचे फलक बैठकीच्या मार्गावर लावलेले होते. महाराष्ट्रातील जनता हीच माझी दैवी शक्‍ती आहे. आता नव्याने मैदानात उतरायचे आहे. ही निवडणूक युतीतच लढणार आहे, असेही या वेळी फडणवीस म्हणाले.

‘युतीची चिंता नको’
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या २२० जागा येतील, असा विश्‍वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केला. भाजप कार्यकर्त्यांनी २८८ जागांवर कामाला लागावे. युतीबाबत चिंता करू नका. तो निर्णय मुख्यमंत्री घेतील. संघटनात्मक बांधणीत आपण कमी नाही. आपले थेट जनतेशी घट्ट नाते निर्माण झाले आहे, असेही पाटील म्हणाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News