बिहार सरकार मध्ये गुंडाराज सुरु

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 June 2019
  • निदर्शनाबद्दल ३९ जणांविरुद्ध ‘एफआयआर’
  • गावात पुरेशी औषधे नाहीत आणि पाणीही नाही. या स्थितीत आम्ही निदर्शने केली तर आमच्याविरुद्धच कारवाई केली जात असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे​

पाटणा : ‘चमकी’ तापामुळे झालेल्या मुलांच्या मृत्यूंबाबत निदर्शने करणाऱ्या ३९ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वैशाली जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली. जिल्ह्यातील हरवंशपूर या गावातील अनेक मुले या तापाने मरण पावली आहेत आणि गावात पाणीटंचाई आहे. त्याच्या निषेधार्थ ही निदर्शने करण्यात आली होती.

वैशाली हा मुझफ्फरपूरच्या शेजारचा जिल्हा आहे. निदर्शने आणि गोंधळ घातल्याच्या आरोपावरून ३९ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गावात पुरेशी औषधे नाहीत आणि पाणीही नाही. या स्थितीत आम्ही निदर्शने केली तर आमच्याविरुद्धच कारवाई केली जात असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

‘चमकी’ तापामुळे राज्यात आतापर्यंत १८९ मुले मरण पावली आहेत. आजही मुझफ्फरपूरच्या ‘एसकेएमसीएच’ रुग्णालयात एका मुलाचा मृत्यू झाला. या रुग्णालयात ४३५ मुलांवर उपचार सुरू आहेत. मात्र, मॉन्सूनपूर्व पाऊस झाल्याने रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. या तापावरून राजकारण सुरू असून, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रीय जनता दलाने केली आहे, तर काँग्रेसने मेणबत्ती मोर्चा काढला होता. या मुलांच्या मृत्युंची जबाबदारी कोणाची, या मुद्द्यावर सगळे पक्ष मौन बाळगून आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News