मराठी बिग बॉसचा 'बिचुकले' आता 'हिंदी बिग बॉस' मध्ये ! चक्क सलमान खानने दिलं आमंत्रण

सकाळ (यिनबझ)
Monday, 12 August 2019

सलमानच्या चित्रपटातील गाण्यांवर स्पर्धकांनी ताल धरला होता. ‘देखा है पहली बार, साजन की आँखो में प्यार’ हे गाणं एसपी बालसुब्रह्मण्यम यांच्या आवाजात गाऊन दाखवण्याचा आचरटपणाही बिचुकलेंनी केला. त्याचवेळी सलमानने बिचुकले यांना हिंदी बिग बॉसच्या आगामी पर्वात येण्याचं आमंत्रण दिलं.

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार भाईजान सलमान खानने ‘बिग बॉस मराठी’च्या सेटवर नुकतीच हजेरी लावली होती. काल रात्री या भागाचे प्रक्षेपण झाले.  यावेळी साताऱ्याचे राजकारणी व वादग्रस्त स्पर्धक अभिजीत बिचुकले यांना चक्क यावर्षीच्या ‘हिंदी बिग बॉस’ मध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण सलमानने दिलं. परंतु प्रत्यक्षात बिचुकलेंची हजेरी बिग बॉसच्या हिंदी आवृत्तीमध्ये लागते का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

सलमान खानला पाहून बिग बॉसच्या घरातील स्पर्धक अक्षरश: हरखून गेले होते, पण यावेळी सर्वाधिक फूटेज खाल्लं ते अभिजीत बिचुकले यांनी. सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी सर्व स्पर्धकांची ओळख सलमान खानला करुन दिली. त्यावेळी बिचुकलेंना पाहून मला स्वामी ओम याची आठवण होत असल्याचं सलमान म्हणाला आणि एकच हशा पिकला. 

"तुम्ही फार कुरापती करु नका, बाहेर आल्यावर तुम्हाला मार पडेल", असं सलमानने बिचुकलेंना गमतीत म्हटलं. त्यावर बिचुकलेंनी आत्मविश्वासाने ‘आपल्याला मार नाही पडणार’, असं सांगितलं. त्यावर, स्वामी ओमलाही असंच वाटायचं, असं म्हणत सलमानने त्यांची फिरकी घेतली.

सलमानच्या चित्रपटातील गाण्यांवर स्पर्धकांनी ताल धरला होता. ‘देखा है पहली बार, साजन की आँखो में प्यार’ हे गाणं एसपी बालसुब्रह्मण्यम यांच्या आवाजात गाऊन दाखवण्याचा आचरटपणाही बिचुकलेंनी केला. त्याचवेळी सलमानने बिचुकले यांना हिंदी बिग बॉसच्या आगामी पर्वात येण्याचं आमंत्रण दिलं.

यापूर्वी, बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे हिलाही बिग बॉसच्या बाराव्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षकांची पसंती मिळाल्यास बिस बॉस हिंदीच्या आगामी पर्वात बिचुकले दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही, हेही तितकेच खरे !

अभिजीत बिचुकले यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास अत्यंत रोचक राहिला आहे. खंडणी आणि चेक बाऊन्स प्रकरणात अडकल्यामुळे बिचुकलेंना सातारा पोलिसांनी बिग बॉसच्या घरातूनच अटक केली होती. काही काळ कोल्हापुरातील कळंबा तुरुंगात घालवल्यानंतर बिचुकलेंची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी बिचुकलेंची पुन्हा स्पर्धेत एन्ट्री झाली होती.

‘बिग बॉस’च्या घरात उरलेल्या स्पर्धकांमध्ये महाअंतिम फेरी गाठण्यासाठी चढाओढ सुरु आहे. आता वीणा जगताप, शिव ठाकरे, किशोरी शहाणे-वीज, नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, अभिजीत बिचुकले, हीना पांचाळ आणि आरोह वेलणकर हे आठ सदस्य आता खेळात राहिले आहेत.ग्रँड फिनालेमध्ये किती स्पर्धकांचा समावेश होणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही सहा स्पर्धकांचा समावेश महाअंतिम फेरीमध्ये होईल, अशी शक्यता प्रेक्षक वर्तवत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News