सीमारेषांपलीकडची नाती दर्शविणारी वेब सीरीज

विशाखा टिकले पंडित
Saturday, 22 June 2019

दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आपल्या भावाच्या मृत्यूला आपण जबाबदार असल्याची टोचणी मनाला लागलेला वेदांत त्यातून बाहेर पडतो का?

भारत आणि पाकिस्तान या देशांमधल्या कटू संबंधांचा फटका दोन्ही देशातील काही सामान्य नागरिकांना कसा बसतो, माणुसकीच्या नात्यातून या नागरिकांना मदत करताना सीमारेषांपलीकडे जोडल्या गेलेल्या एका सुंदर नात्याची गोष्ट ‘काफिर’ या वेबसीरिजमध्ये मांडण्यात आली आहे. 

दिया मिर्झा आणि मोहित रैना या कलाकारांवर चित्रित झालेली ही वेबसीरिज नुकतीच ‘झी ५’वर प्रदर्शित झालीय. ही गोष्ट आहे कायनाझ नावाच्या पाकिस्तानी मुलीची. मूल होत नाही म्हणून नवऱ्याने नाकारलेली कायनाझ आई-वडिलांवर ओझं नको म्हणून जवळच्या नदीत स्वतःला झोकून देते. नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत आलेली कायनाझ भारतीय सैनिकांच्या हाती लागते. जिथं ती सापडते तिथंच काही दिवसांपूर्वी दहशतवादी सापडलेले असतात. कायनाझ ही त्यांचीच सहकारी असल्याचा संशय येऊन तिची रवानगी जेलमध्ये केली जाते आणि तिच्यावर दहशतवादी असल्याचा ठपका लागतो. जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर वेदांत राठोड या पत्रकाराला एका सैनिकासोबत शाळेत जाणारी एक छोटी मुलगी दिसते.

‘ह्युमन इंटरेस्ट स्टोरी’ हवी म्हणून ऑर्डर आलेला तो पत्रकार त्या छोट्या मुलीची आणि तिची आई कायनाझची गोष्ट जगासमोर आणायचं ठरवतो. त्यादरम्यान कायनाझने लपवलेलं एक सत्य समोर येतं. हे सत्य समजूनही वेदांत कायनाझला मदत करतो का? कायनाझ पुन्हा आपल्या देशात परतते का? दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आपल्या भावाच्या मृत्यूला आपण जबाबदार असल्याची टोचणी मनाला लागलेला वेदांत त्यातून बाहेर पडतो का? या प्रश्नांच्या उत्तरांचा अतिशय छान प्रवास या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. 

दिया मिर्झाने या सीरिजमधून वेबविश्वात केलेलं पदार्पण यशस्वी ठरलंय. मुलगी, बायको, आई, प्रेयसी या भूमिकांसोबत दहशतवादाचा ठपका असलेली अत्याचारित हतबल कैदी या भूमिका दियाने अप्रतिमरीत्या साकारल्या आहेत. मोहित रैना यानेदेखील आपल्या एका चुकीपायी भावाला जीव गमवावा लागला, हे शल्य घेऊन जगणारा, कायनाझ आणि तिच्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी झटणारा; एक हळवा प्रियकर वेदांत छान साकारला आहे.

एकामागोमाग घडणाऱ्या वेगवान घटनांमुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढत जाते. एकंदरीत दोन देशांमध्ये निर्माण झालेल्या कटुतेपलीकडे जाऊन तयार झालेल्या नात्यांचा हा प्रवास पाहण्यासारखा आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News