आजपासून ‘बेस्ट’चा प्रवास स्वस्त, प्रवाशांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019
  • पहिल्या पाच कि.मी.साठी भाडे पाच रुपये
  • परंतु अर्धे तिकीट बंद

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बससेवेची भाडेकपात मंगळवारपासून लागू होत आहे. त्यानुसार पहिल्या पाच किलोमीटरसाठी ५ रुपये तिकीट असेल; आतापर्यंत पहिल्या दोन किलोमीटरच्या टप्प्यासाठी ८ रुपये तिकीट होते. नव्या दरांनुसार कमाल भाडे २० रुपये असेल. विशेष म्हणजे, अर्धे तिकीट बंद करण्यात आले आहे.

बेस्ट उपक्रमाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी महापालिकेने ६०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या मोबदल्यात प्रवाशांची संख्या वाढावी म्हणून तिकिटांचे दर कमी करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी ठेवला होता. त्यानुसार बेस्ट समितीच्या पाठोपाठ महापालिकेच्या महासभेने भाडेकपातीचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर राज्याच्या परिवहन प्राधिकरणाने सोमवारी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, मंगळवारपासून नवे दर लागू होतील, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. 

बेस्ट उपक्रमाने तिकीट दरांची फेररचना केली आहे. पूर्वी दोन किलोमीटरच्या टप्प्यासाठी आठ रुपये तिकीट होते. आता प्रत्येक पाच किलोमीटरसाठी पाच रुपये असा तिकीटदर असेल. वातानुकूलित बसचे किमान तिकीट सहा रुपये असेल. पूर्वी सर्वांत शेवटच्या टप्प्यासाठी म्हणजे ४५ किलोमीटरपुढील प्रवासासाठी ४६ रुपये मोजावे लागत होते. आता कमाल तिकीट २५ रुपये असेल.

बेस्टच्या ताफ्यात आगामी काळात वातानुकूलित आणि बॅटरीवर चालणाऱ्या बसगाड्या दाखल होणार आहेत. काही महिन्यांत बेस्टचा ताफा सध्याच्या तीन हजारांवरून सहा हजारपर्यंत पोहोचेल. त्यासाठी भाड्याने बसगाड्या घेण्याचे ठरले आहे.

सुधारित दर (रुपयात) 
किलोमीटर - साधी बस - एसी बस 
५ - ५ - ६
५ ते १० - १० -१३
१० ते १५ - १५ - १९
१५ हून अधिक - २० - २५

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News