बेंदूर सणाला लागला शेंदूर

शुभांगी पवार, सातारा
Monday, 15 July 2019

बैल या शेतकऱ्याच्या मित्रासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. त्याला पूर्ण विश्रांती दिली जाते. सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात ह्या सणाला "बेंदूर" म्हणतात.

हा सण बैल या शेतकऱ्याच्या मित्रासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. त्याला पूर्ण विश्रांती दिली जाते. सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात ह्या सणाला "बेंदूर" म्हणतात. तर नगर, पुणे भागात "बैलपोळा" म्हणतात तो नंतर असतो, कर्नाटकी बेंदूर कर्नाटक व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात असतो. ज्याच्याकडे बैल, गाई, म्हैशी असतात त्यांची बेंदूर सणा दिवशी पूजा करतात.

ग्रामीण संस्कृती व मानव-प्राणी यांच्यामधील प्रेम-जिव्हाळा ह्याच सुंदर आदर्श उदाहरण म्हणजे हा सण अस मला वाटतं. तसेच ह्या सणापासून सणांना सुरुवात होते. "आला बेंदूर, सणाला लागला शेंदूर" अशी ग्रामीण म्हण आहे. खऱ्या अर्थाने ह्या सणापासून लागोपाठ सण सुरू होतात.

आदल्या दिवशी त्यांना हळद तेलात कालवून खांदयाना मालिश करतात. त्याला खांदेमळणी म्हणतात वर्षभर बैल "जु" चे ओझे वाहत असतात. त्यासाठी कृतज्ञता म्हणून सेवा करतात व कणिक(गव्हाचे पीठ) तेलात घालून भरवतात सोबत भरडा(जाडे भरडे डाळी)खाऊ घालतात. आज लवकर उठून अंघोळ घालतात अगदी उटणे लावून, हळद चोळून मस्त शिंग कोरतात. रंग लावतात खूप भारी सजवून गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते,

शिंगे ऑईल पेंट ने रंगवून त्याला रंगबेरंगी बेगडी कागदाच्या पट्ट्या चिकटवतात. नवीन कासरा(दोरी), नवी रंगबेरंगी नक्षीदार झूल, घुंगुर माळा, पायात चाळ गोंडे, शिंगाला फुगे, रिबीन, डोळ्यात काजळ, अंगावर हळदीचा रंग, आकर्षक पणासाठी कांदे-बटाटे आडवे कापून ती रंगात बुडवून उमटवलेले छाप, "लक्ष्या" "महिब्या" "टायगर" "पाखऱ्या" "फुल्या" "राजा" "सर्जा" "धनी" "पहिलवान" अशी अस्सल ग्रामीण भागाशी आपुलकी दाखविणारी आपल्या लाडक्या सोबत्याची ही नाव. सोबत घरधनी-मालकीण सुद्धा सुंदर सजतात. कोणाची बैलजोडी अधिक सुंदर-आकर्षक सजवलेली यासाठी मिरवणूकीत चढाओढ लागते. 

घरी आल्यावर घरमालकीन त्यांचे औक्षण करते, पुरणपोळीचा गोड घास खाऊ घालते असे दृश्य मनाला कृतकृत्य करून सोडतात  हल्ली यांत्रिकीकरण व आधुनिक यंत्रसामग्री, ट्रॅक्टर च्या वाढत्या वापरामुळे, शेती पेक्षा नोकरी करण्याकडे कल व बदलत चाललेली मानसिकता ह्यामुळे बैलगाडी, बैलजोडी खूप कमी झाल्या आहेत. त्यामुळे बेंदूर सणालाही आधुनिकतेचा स्पर्श झाला आहे. ज्यांच्याकडे बैल नाही, शेती नाही असे लोक मातीचे बैल बनवून त्याची पूजा करतात.

१५-२० वर्षांपूर्वी मातीचे विना रंगाचे बैल बनवले जात त्यांची घरात कापड अंथरून त्यावर धान्याची रास घालून, शिंगात कणकेचे कडबोळी अडकवत, गोंडा, चावर वाहून पूजा, नैवेद्य दाखवून बेंदूर सण साजरा करण्यात येत असे. हल्ली रंगीतसंगीत आकर्षक हव्या त्या आकार-ऊंचीच्या बैलजोड्या प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्या मिळतात. त्यातही बेंदूर सणाच्या आधी माती आणून ती चाळून, मस्त मळून स्वतःच्या हाताने बैल घडवणे त्याची पूजा करणे ,सण झाल्यानंतर घरातील लहान मुलांनी खेळताना बैल जोडी वापरणं,भूतकालीन दंतकथा झाल्या आहेत.

हल्ली ट्रॅक्टर सजवून त्यांची मिरवणूक, डॉल्बी, डीजे लावून उडत्या चालीवर अर्थहीन कर्कश वाजणारी गाणी मोठ्याने लावून सोबत ओंगळवाणे नर्तन व किंकाळ्या, फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. यामुळे सणाचा खरा हेतू व ग्रामीण संस्कृतीचा ठेवा वेगळ्याच मार्गावर निघाला आहे. ह्याबद्दल मनाला खंत वाटते. पाठ्यपुस्तकात अभ्यासलेला मनात घर करून बसलेला पाखऱ्या हा धडा पुन्हा नव्याने शब्द न शब्द जसाच्या तसा आठवत जातो. पुन्हा नव्याने डोळे भरून वाहतात. शेवटी काय "कालाय तस्मय नमः" म्हणावं लागत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News