शिक्षकांच्या बदलीसाठी होणार कौन्सिल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 6 July 2019
  • २,७२१ शिक्षकांना बदलीची प्रतीक्षा
  • सात-आठ वर्षात बदलीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील २,७२१ शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज दाखल केले आहेत. येत्या २२ जुलैपासून बदलीसाठी कौन्सिलिंग होईल

बेळगाव - सात-आठ वर्षात बदलीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील २,७२१ शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज दाखल केले आहेत. येत्या २२ जुलैपासून बदलीसाठी कौन्सिलिंग होईल. अर्जांच्या संख्येवरून सर्रास शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षण खात्याने आज बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांची यादी जाहीर केली.

गेल्या काही वर्षांत अतिरिक्‍त शिक्षक वगळता इतर शिक्षकांच्या बदलीसाठी कौन्सिलिंग झालेले नाही. त्यामुळे मर्जीप्रमाणे बदलीसह इतर प्रकारच्या बदली प्रक्रियेची वाट पाहणाऱ्या सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी यंदा बदलीसाठी रांगा लावून अर्ज दाखल केले आहेत. कौन्सिलिंग प्रक्रियेसाठी १९ जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर सर्व अर्जांची फेरतपासणी करून ग्राह्य अर्ज शिक्षण प्राधिकरणाकडे पाठविण्यात आले होते. त्यानंतर शिक्षण खात्याने मुख्याध्यापक, सहशिक्षक, क्रीडाशिक्षक याप्रमाणे यादी जाहीर केली आहे.

शहर आणि परिसरातील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्यामुळे अतिरिक्‍त ठरण्याचा धोका अनेक शिक्षकांसमोर आहे. तसेच अतिरिक्‍त शिक्षकांशिवाय इतर शिक्षकांच्या बदलीकडे अधिक लक्ष न देण्यात आल्यामुळे जास्त प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. शिक्षण खात्याने १० वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या शिक्षकांची सक्‍तीने बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून शहरात नोकरीत करणाऱ्या शिक्षकांना बदली प्रक्रियेला सामारे जावे लागणार आहे. गेल्या वर्षीही शिक्षक बदलीसाठी कौन्सिलिंग प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तांत्रिक बिघाड आणि इतर कारणांमुळे वेळापत्रक जाहीर करूनही ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

बदली प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या वेळी योग्यप्रकारे बदली प्रक्रिया राबविण्यासाठी शिक्षण खाते प्रयत्नशील आहे. कौन्सिलिंगवेळी कोणतीही समस्या येणार नाही, अशी अपेक्षा आहे.
-ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News