बीव्हीएससीच्या प्रवेशाची सुरुवात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019
  • देशभरातील शासन व शासन अनुदानित पशुवैद्यकीय महाविद्यालयातील एकूण उपलब्ध होणाऱ्या जागेच्या १५ टक्के कोट्यातील जागावाटपासाठी प्रवेश प्रक्रिया व्हीसीआय (व्हेटर्नरी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्लीतर्फे) राबविण्यात येत आहे.
  • या जागांवरील प्रवेशासाठी पूर्वीप्रमाणे घेण्यात येणारी एआयपीव्हीटी परीक्षा रद्द झालेली असून, आता वैद्यकीय प्रवेशासाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या ‘नीट-२०१९मधील’ गुणांच्या आधारे देण्यात येणाऱ्या ऑल इंडिया रॅंकच्या आधारे ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाते.

देशभरातील शासन व शासन अनुदानित पशुवैद्यकीय महाविद्यालयातील एकूण उपलब्ध होणाऱ्या जागेच्या १५ टक्के कोट्यातील जागावाटपासाठी प्रवेश प्रक्रिया व्हीसीआय (व्हेटर्नरी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्लीतर्फे) राबविण्यात येत आहे. या जागांवरील प्रवेशासाठी पूर्वीप्रमाणे घेण्यात येणारी एआयपीव्हीटी परीक्षा रद्द झालेली असून, आता वैद्यकीय प्रवेशासाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या ‘नीट-२०१९मधील’ गुणांच्या आधारे देण्यात येणाऱ्या ऑल इंडिया रॅंकच्या आधारे ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाते.

प्रवेशाचे वेळापत्रक 
कौन्सिलच्या www.vci.cuonseling.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे, पसंतीक्रम नोंदविणे व चॉईस लॉकींग करणे ही मुदत १७ ते २२ जुलै  दरम्यान आहे. रजिस्ट्रेशन शुल्क ऑनलाइन मोडने वरील कालावधीमध्ये भरायचे आहे. पसंतीक्रम एकदाच नोंदवायचे असून, त्याद्वारे पहिल्या फेरीचे जागावाटप २६ जुलैला होणार असून, प्रवेश २९ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत घ्यायचे आहेत. प्रवेशासाठी एकूण ३ फेऱ्या होणार असून, शेवटचा चौथा मॉपअप राउंड होणार आहे. प्रत्येक प्रवेश फेरी झाल्यानंतर नॉन जॉईनिंगमुळे शिल्लक राहणाऱ्या जागांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध होतो. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने असून, कोणतीही कागदपत्रे कौन्सिलकडे पाठविण्याची आवश्‍यकता नसते. प्रवेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित संस्थेकडून सर्व मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाते व त्यानंतरच प्रवेश दिला जातो.

प्रवेशाची पात्रता
बॅचलर ऑफ व्हेटर्नरी सायन्स ॲण्ड ॲनिमल हजबंड्री (बीव्हीएस्सी ॲण्ड ए.एच.) हा साडेपाच वर्षे कालावधीचा पदवी अभ्यासक्रम असून, याच साडेपाच वर्षांत एक वर्षे कालावधीची रोटेटिंग इंटर्नशिप बंधनकारक आहे. बारावी पात्रता परीक्षेत इंग्रजी व ‘पीसीबी’मध्ये खुल्या गटासाठी किमान ५० टक्के गुण व राखीव गटासाठी ४७.५० टक्के गुणांची आवश्‍यकता असते. वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट-२०१९ परीक्षेत पात्रता मिळविणे आवश्‍यक आहे. प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रे, इतर सर्व संस्थांची माहिती उपलब्ध झालेल्या माहितीपत्रकातून घेण्यात यावी.

उपलब्ध जागा
देशभरातील सुमारे २० राज्यांतील ४५ शासकीय महाविद्यालयांतून १५ टक्के कोट्यातील सुमारे ५१० जागा प्रवेशासाठी उपलब्ध होतात. महाराष्ट्रातील विद्यार्थीदेखील देशपातळीवरील १५ टक्के कोट्यातील प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊन देशभरातील इतर संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकतो. त्याचबरोबर स्वतःच्या राज्यातील पाच शासकीय संस्थांमध्येही प्रवेशासाठी पात्र असतो. महाराष्ट्रात मात्र नागपूर, मुंबई, शिरवळ-सातारा, परभणी व उदगीर या पाच महाविद्यालयांमधून ८५ टक्के कोट्यातून फक्त ३२६ जागा उपलब्ध होतात. त्या तुलनेत देशपातळीवरील १५ टक्के कोट्यातून मात्र ५१० जागा उपलब्ध होत असल्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी देशपातळीवरील प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यावा. 
राज्यातील पाच महाविद्यालयांतील ८५ टक्के कोट्यातून प्रवेशासाठीची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेल तर्फे स्वतंत्रपणे राबविण्यात येणार असून, त्यासाठी www.mahacet.org तसेच www.mafsu.in या संकेतस्थळाच्या संपर्कात राहावे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News