सलमानचाच जलवा..!

संतोष भिंगार्डे
Saturday, 8 June 2019

सर्वात कमाल केली आहे विलायतीची भूमिका करणाऱ्या सुनील ग्रोव्हरने. चित्रपटात कच्चे दुवे नक्कीच आहेत. चित्रपट कधी खिळवून ठेवतो आणि कधी पकड ढिली सोडतो.

सलमान खान आणि कतरिना कैफ यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री उत्तम जुळलेली आहे. ही जोडी पहिल्यांदा एकत्र आली ती डेव्हिड धवन यांच्या ‘मैंने प्यार क्‍यूं किया’ या चित्रपटासाठी.

हा चित्रपट फारसा काही चालला नाही; परंतु या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री उत्तम जुळल्याने निर्माते आणि दिग्दर्शकांनी या जोडीला अधिक पसंती दिली. साहजिकच या जोडीचे ‘युवराज’, ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’ असे  चित्रपट आले. त्यातील काही चित्रपट यशस्वी ठरले; तर काही फ्लॉप. आता या सेलेबल जोडीचा ‘भारत’ हा चित्रपट आला आहे.

धमाल-मस्ती; त्याच बरोबरीने इमोशन्स आणि कौटुंबिक असा हा मसालापट आहे. खरे तर सलमान म्हटलं की मारधाड आणि ॲक्‍शन हे समीकरण असतेच. परंतु या चित्रपटात नेमक्‍या या गोष्टींना फाटा देण्यात आला आहे आणि चित्रपट अधिकाधिक इमोशनल कसा होईल, याकडे लक्ष देण्यात आले आहे. चित्रपटाच्या कथानकाची सुरुवात भारतच्या (सलमान खान) ७० व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनपासून होते आणि त्याच वेळी कथा फ्लॅशबॅकमध्ये जाते. १९४७ च्या भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी भारत (सलमान खान) आपले वडील (जॅकी श्रॉफ) आणि बहिणीपासून कायमचा दुरावतो. तो आपली आई (सोनाली कुलकर्णी), एक लहान भाऊ आणि बहीण यांच्यासह दिल्लीत स्थायिक होतो. त्याच्या वडिलांनी त्याच्याकडून आई आणि भावंडांची काळजी घे, अशा प्रकारचे वचन घेतलेले असते.

‘भारत’ या चित्रपटात १९४७ ते २०१० पर्यंतचा कालावधी दाखविण्यात आला आहे. या कालावधीत भारत दिल्लीतच राहून आपल्या कुटुंबाची गुजराण करत असतो. दरम्यान, एक मित्र भेटतो विलायती खान (सुनील ग्रोव्हर). तेलनिर्यात करणाऱ्या कंपनीमध्ये भारत आणि त्याचा मित्र विलायती काम करण्यास जातात. तेथे भारतची भेट कुमुद मॅडम (कतरिना कैफ) बरोबर होते आणि हळूहळू ते दोघेही प्रेमात पडतात. कुमुद त्याला आपल्याबरोबर लग्न करण्यास सांगते. परंतु कुटुंबामुळे भारत लग्नास नकार देतो. मग कुमुद त्याच्या घरात येऊन राहते. कुमुद आणि भारतचं प्रेम, भारतचं आपल्या कुटुंबावर असलेलं प्रेम, वडिलांची आणि बहिणीची त्याला येणारी सतत आठवण, त्यांना भेटवण्यासाठी चाललेली कुमुदची धडपड आणि त्याला मित्राची मिळालेली साथ चित्रपटात पाहायला मिळते.

दिग्दर्शक अली अब्बास जाफर आणि सलमान खान यांनी ‘सुल्तान’ आणि ‘टायगर जिंदा है’ हे दोन ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. त्यांचा हा तिसरा चित्रपट.सलमान खानची विविध रूपे यामध्ये आहेत आणि त्याने प्रत्येक भूमिकेला योग्य असा न्याय दिला आहे. दिशा पटानीच्या वाट्याला छोटासा रोल आहे. तिने साकारलेली राधाची भूमिका तडक-भडक आहे. कतरिना कैफने कुमुदची भूमिका उत्तम साकारली आहे.

सोनाली कुलकर्णी, आसिफ शेख, बिजेंद्र काला या कलाकारांनी उत्तम कामगिरी केली आहे. पण सर्वात कमाल केली आहे विलायतीची भूमिका करणाऱ्या सुनील ग्रोव्हरने. चित्रपटात कच्चे दुवे नक्कीच आहेत. चित्रपट कधी खिळवून ठेवतो आणि कधी पकड ढिली सोडतो. दिग्दर्शकाने पटकथेवर म्हणावे तसे काम केलेले दिसत नाही. केवळ आणि केवळ सलमान खान आहे म्हणून सबकुछ चलता है आणि ते साहजिकच आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News