बामणी रस्ता गेला खड्ड्यात; रस्त्याचा खरा वाली कोण..?

विनोद आपटे
Monday, 1 July 2019

अपघाताचे प्रमाण वाढले, दुरूस्तीच्या नावावर प्रशासनाचे एकमेकांकडे बोट..!

नांदेड: मुक्रमाबादसह परिसरातील नागरिकांना मुखेड तालुक्याला जाण्यासाठी बामणी हा एकमेव महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यामुळेच परिसरातील अनेक गाव, वाडी- तांडे तालुक्याशी जोडली गेली आहेत. पण हा रस्ता तयार झाल्यापासून आतापर्यंत एकदाही डागडूजी करण्यात आली नसल्यामुळे अक्षरशः या रस्त्याची चाळणी झालेली असल्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलेले असून गेल्या अनेक वर्षीपासून डागडूजी करण्यासाठी प्रशासनाकडे मागणी चालू असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग, लेंडी विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग हे, दुरूस्तीच्या नावावर एकमेकांकडे बोट दाखवत असून यांच्या दुरूस्तीच्या नावाखाली सामान्य नागरिकांचा व प्रवाशांचा जीव माञ धोक्यात आला आहे.
         
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबादसह परीसरातील कर्नाटक व आंध्रा प्रदेशातील नागरिकांना लेंडी प्रकल्पग्रस्तांना सोयीचे व्हावे म्हणून पाच वर्षापुर्वी हा रस्ता लेंडी विभागाकडून करण्यात आला. पण या रस्त्याची डागडूजी करण्यासाठी आमच्याकडे कसल्याच प्रकारचा निधी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे या रस्त्याची डागडूजी करण्याचे काम हे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असेल असे सांगून मोकळे झाले. तर हा, रस्ताच आमच्या अखत्यारित येत नाही त्यामुळे या रस्त्याची डागडूजी व इतर कामे करणे ही, आमची जबाबदारी नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सुचविले आहे.  

हा रस्ता आमच्याकडे आला आहे. पण या रस्त्याची निर्मिती ही, लेंडी विभागाकडून करण्यात आली असल्यामुळे या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी लेंडी विभागाची आहे. असे जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. तर लेंडी विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचे फोन लागत नाही. आणि लागला तर तो फोन उचालला जात नाही. अशा या तिन्ही प्रशासनाच्या तू, तू, मैं, मैं  मध्ये येथील नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला आहे. तर 
प्रशासनाच्या या आडमुठ्ठे धोरणाच्या विरोधात नेमकी तक्रार तर कोणाकडे करावी असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडलेला आहे. पहिल्याच रिमझिम पावसात या रस्त्यावरची अक्षरशः चाळणी झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने पायी चालणेही तारेवरची कसरत होऊन बसली असताना या रस्त्यावरून वाहन चालवणे म्हणजे एक प्रकारे मृत्यूलाच आमंत्रण दिल्यासारखे आहे. 

तालुक्याला जाण्यासाठी हा महत्त्वाचा व जवळचा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ असल्यामुळे रोज लहान- मोठे अपघात होणे ही, नित्याचीच बाब होऊन बसली आहे. तर हा रस्ता लेंडी नदीच्या पुलावरून गेला असून पुलाच्या सुरुवातीच्या दोन्ही बाजूला पाणी साचत असून यामुळे हा पुल कोणत्याही क्षणी ढासळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे प्रशासानाने या रस्त्याचे महत्त्व व पुढील धोका ओळखून या रस्त्याची डागडूजी किंवा पुनर्रबांधणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा या रस्त्यावर मोठा धोका होऊ शकतो त्यामुळे या रस्त्याची पुनर्रबांधणी किंवा डागडूजी करून द्या म्हणून परीसरातील नागरिकांना, लेंडी विभाग देगलूर, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे गेल्या पाच वर्षापासून चकरा मारत आहेत. पण येथील अधिकारी माञ एकमेकावर जबाबदारी ढकलून आपली भूमिका चोखपणे पार पाडत असल्याने प्रशासनाच्या या कार्य पध्दतीवर सर्वच स्तरातून निंदा होत आहे.

हा, रस्ता आमच्या अखत्यारीतच येत नाही त्यामुळे या रस्त्याची डागडूजी करणे हे, आमचे कामच नाही. हा, रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभाग किंवा लेंडी विभागाकडे आहे. त्यामुळे या रस्त्याची जबाबदारी ही, त्याचीच आहे. आमची नाही. 
- गणेश बासरकर, अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग
 
बामणीचा रस्ता हा आमच्याकडे आला आहे. पण या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याएवढा निधीही आमच्याकडे उपलब्ध नाही. लेंडी विभागाकडे निधी असेल तर त्यांनीही हे, खड्डे बुजऊ शकतात. आम्ही दरवर्षी निधीची मागणी करतो. पण निधीच उपलब्ध होत नाही. आम्ही तारी काय करणार. आमदार व जिल्हा परिषद सदस्य यात लक्ष घातले तर हा रस्ता नक्कीच खड्डेमुक्त होऊ शकतो. 
- बी.डी. चव्हाण, उपकार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जि.प. नांदेड.

पुर्वी आम्हाला रस्ता नसल्यामुळे आमच्या पिढ्यानपिढ्या जीव धोक्यात घालून दररोज लेंडी नदीतून काट्या कुपाट्याने पायी मार्ग काढून जाणे- येणे करावे लागत होते. पण पाच वर्षापुर्वी हा रस्ता झाल्यामुळे आमचे दुःख संपले असे वाटत होते. पण हाच रस्ता मृत्यूचा सापळा बनल्यामुळे आम्हाला नदीतूनच पायी जाण्याची वेळ आली असतानाही प्रशासन माञ मोठी घटना होण्याची वाट पहात आहे. हे, आमचे दुर्देव. 
- विजय मुगदाळे, ग्रामस्थ, बामणी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News