तिकडे मुलींचं बाळंतपण, इकडे आई गरोदर

यीनबझ ऑनलाईन टिम
Wednesday, 24 July 2019

अलीकडे मेडीकल सायन्सची खूप प्रगती झाल्याने लोकांचं आयुष्यमान वाढलं आहे. मरणारे कमी आणि जन्माला येणारे भरमसाठ अशी परिस्थिती असल्याने सरकारने कितीही उपाययोजना केलीतरी पाहिजे तसा विकास होत नाही. लोक संतुष्ट होत नाही.

आज ज्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामागे लोकसंख्येची भरमसाठ झालेली वाढ कारणीभूत आहे असं मला वाटतं. आधीच्या लोकांनी आठ आठ, दहा दहा पोरं पैदा केली. (धन्य त्या माऊल्या ज्यांनी इतकी बाळंतपणं सोसली) मुल जन्माला घालतांना त्यांच्या भविष्याचा अजिबात विचार केला नाही. मुलं जन्माला आल्यावर त्याच्या अन्नपाणी, वस्त्र, निवाऱ्याची, शिक्षण आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे याचा गांभीर्यानं विचार केला नाही. खूप सारी मुलं पैदा करण्यामागे त्यांचा नक्की काय उद्देश होता हेही कळत नाही.

मोठ्या मुलींचं लग्न होऊन तिला मुलबाळ होत असतांना इकडे आई पण गरोदर असायची त्यामुळे कधी कधी मामा लहान आणि भाचा मोठा असा प्रकार व्हायचा. कुटुंबात आठदहा भावंडं असल्याने सगळ्यांची सर्व त-हेने काळजी घेणं कठीण होतं. मुलं सहा वर्षाचं झालं की दिलं टाकून शाळेत! फाटकं दप्तर पाटी पेन्सिल घेऊन शेंबडं पोरगं शाळेत जायचं. ते काय शिकतं, अभ्यास करते की नाही याची बापाला फारशी काळजी नसायची. आठदहा पोरं असल्यावर अंगावर चांगले कपडे घालायला मिळत नव्हते. दहाविला गेल्यानंतरही पायात चपला नसायच्या.

पोरांना आजार झाले की थातूरमातूर काही तरी इलाज केले जायचे किंवा लक्षच दिल्या जात नव्हतं. दवाखाण्यावर खर्च करणं म्हणजे फालतू पैसे उधळणं असंच जणू त्यांना वाटत होतं. त्यातच एखाद्या पोराची लहानपणापासून प्रकृती ठीक नसली की, मोठेपणी गंभीर परिस्थिती निर्माण व्हायची कारण योग्य वेळी योग्य उपचार झाले नसायचे. पोरं शिकली मोठी झाली की, स्वतःच कालेजात किंवा इकडेतिकडे एडमिशन घ्यायची. घरी वर्तमानपत्र येत नव्हतं. कुठं जायचं, कुठं एडमिशन घ्यायचं याविषयी काहीच मार्गदर्शन नव्हतं. नोकरीचा आजच्या सारखा बिकट प्रश्न त्यावेळी नव्हता पण कालेज शिकण्यापेक्षा एखादी ट्रेनिंग वैगेरे केली पाहिजे हे कळत नव्हतं त्यामुळे काहींवर ओव्हर एज होण्याची पाळी सुध्दा यायची.

आज गावागावात कालेज, ट्रेनिंग सेंटर उघडली आहेत. पुर्वी अशी सोय नसल्याने बाहेरगावी मोठ्या सिटीत जाऊन शिकणं खर्चाचं काम होतं. आजच्या पिढीत दोनच मुलं असल्याने आईबाप मुलांवर भरपूर खर्च करतात. महागडं शिक्षण देण्यासोबतच छान कपडेलत्ते, सायकल, टू व्हिलर, स्मार्टफोन आदी सगळंच दिल्या जातं. वडील नोकरीवर असून घरी शेतीवावर असतांनाही आम्हाला तरूणपणी छान कपडेलत्ते मिळाले नाहीत. पायात केरोनाची स्लिपर घालून पायीपायीच कालेजात जावं लागायचं. कालेजचे नटण्यामुरडण्याचे दिवस पण ते असेच कसेतरी गेले. (आता तुम्हीच सांगा खाक पोरी पटणार!) घरी पाच एकर शेती आणि भावंडं दहा! शेतीचे छोटे छोटे तुकडे पडल्यानं एकदिवस स्वतःच शेतमजूर होण्याची पाळी यायची.

दहा पोरांना दहा घरं रहायला लागायची. ती आणायची कुठून? गुरं विकून गोठ्याच्या जागेवर घर उभं केलं जायचं. मुलं दहा सगळ्यांना नोकरी मिळणं शक्य नव्हतं. बेकारी वाढत गेली. स्पर्धा वाढली. नोकरी मिळण्याचे नियम कडक होत गेले. आधी चौथा वर्ग शिकल्यावरही नोकरी मिळून जायची आता पिएचडी करणारा चपराशी बनायला तयार होतो. दहा जागा असतात आणि दहाहजार अर्ज येतात. नोकरी मिळत नाही म्हटल्यावर असंतोष निर्माण होतो. यांना इतकं मिळतं, त्यांना तितकं मिळतं म्हणून जातीजातीत भांडणं व्हायला लागतात. आरक्षण वाढवून दिल्या जातं पण बेकारीचा प्रश्न सुटत नाही.

लोकसंख्येचा भस्मासूर सर्व सोयी, सवलती, योजनांना हरताळ फासतो. अलीकडे मेडीकल सायन्सची खूप प्रगती झाल्याने लोकांचं आयुष्यमान वाढलं आहे. मरणारे कमी आणि जन्माला येणारे भरमसाठ अशी परिस्थिती असल्याने सरकारने कितीही उपाययोजना केलीतरी पाहिजे तसा विकास होत नाही. लोक संतुष्ट होत नाही. कुठलंही सरकार आलंतरी त्याच्या कडे जादुची कांडी नाही की, सर्वांना सर्वकाही मिळेल. कायदा, सुव्यवस्था ठीक राहील! भ्रष्टाचार, लाचखोरी, फसवणूक, माणुसकीचा -हास, जातीय हिंसाचार, असहिष्णुता इत्यादी सर्व गोष्टींंची उपज या भरमसाठ वाढलेल्या लोकसंख्येतून झाली म्हटल्यास वावगं ठरू नये!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News