आजीबाईची नातवांसाठी बिबट्याशी झुंज!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 June 2019
  • दोघांना तावडीतून सोडवले
  • माळशेजच्या पायथ्याशी थरार

मुरबाड : जांभूळ खाण्याचा मोह झालेल्या चार नातवंडांना घेऊन आजीबाई जंगलात गेली... दोघे झाडावर चढून जांभूळ काढत होते, तर दोघे झाडाखाली आजीबाईसोबत ती वेचण्यात मग्न... इतक्‍यात बिबट्याने दोघा नातवंडांवर झेप घेतली... अचानक घडलेल्या या प्रकाराने भावंडे हादरली; पण आजीबाई डगमगली नाही. तिने बिबट्यावर दगडफेक सुरू केली... डरकाळ्या फोडत तो तिच्या दिशेने झेपावण्याचा प्रयत्न करणार तोच ती त्याला कोयत्याचा धाक दाखवी... काही क्षणांच्या या झुंजीनंतर आजीबाईच्या धैर्यापुढे बिबट्याने नमते घेत पळ काढला.

माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या करपटवाडीच्या जंगलात शुक्रवारी (ता. १४) सकाळी ११ च्या सुमारास हा थरार रंगला होता. 
कानीबाई रामू भला (रा. करपटवाडी) असे या शूर आजीबाईचे नाव आहे. नरेश काळुराम भला (वय १३) आणि हर्षद विठ्ठल भला (७) हे दोघे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांना टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर वनपाल कपिल पवार यांनी त्यांना मुरबाड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

कानीबाई आपल्या चार नातवंडांना घेऊन शुक्रवारी सकाळी जांभूळ काढण्यासाठी जंगल परिसरात गेल्या होत्या. त्यांच्या शेताजवळील ओढ्याकाठी असलेल्या जांभळाच्या झाडावर दोन मुले जांभूळ काढण्यासाठी चढली, तर नरेश आणि हर्षद हे दोघे आजीसोबत झाडाखाली जांभूळ वेचत होती. त्या वेळी अचानक बिबट्याने नरेशवर हल्ला केला. त्यानंतर हर्षदचे डोके पंजात पकडले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मुले घाबरली; मात्र कानीबाई यांनी बिबट्यावर दगडफेक सुरू केली.

बिबट्या डरकाळ्या फोडत कानीबाईच्या दिशेने वळला. त्या वेळी त्यांनी हातात कोयता घेऊन बिबट्याच्या दिशेने हातवारे केले. आजीबाईच्या या धाडसापुढे बिबट्याने अखेर नमते घेत तिथून पळ काढला. त्यानंतर आजीबाईने हर्षदला खांद्यावर घेतले. इतर तिघेही तिच्यासोबत निघाले. काही वेळात त्यांनी गाव गाठून घरच्यांना घटनेची माहिती दिली. जखमींवर मुरबाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

परिसरात पूर्वीपासूनच बिबट्याचे वास्तव्य आहे. घटना घडली ते  जंगलातील ओढ्याजवळचे थंड ठिकाण आहे. तिथे तो विश्रांती घेत असावा. वन्य प्राणी समजून त्याने मुलांवर हल्ला केला असण्याची शक्‍यता आहे. स्थानिकांची बैठक घेऊन सावधानतेच्या सूचना देणार आहोत. 
कपिल पवार, वनपाल, टोकावडे विभाग

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News