नांदेडचे केंद्रीय विद्यालय अजूनही उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 7 August 2019
  • रस्त्याची अडचण कारणीभूत; खासदारांनी लक्ष घालण्याची मागणी

नांदेड - केंद्रीय विद्यालयाची इमारत पूर्ण बांधून चार महिने झाले असून, रस्त्याचा प्रश्‍न सुटत नसल्यामुळे सध्या ही इमारत उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. शाळा नवीन इमारतीमध्ये ता. १५ आॅगस्टपूर्वी स्थलांतर करण्यासाठी प्राचार्य आणि दक्षिण - मध्य रेल्वे विभागाच्या विभागीय व्यवस्थापक यांनी लक्ष घालावे, अशी विनंती पालकांनी निवेदनाद्वारे केली. या शिवाय खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही लक्ष घालावे, अशी मागणीही पालकांनी केली आहे.

निवेदनामध्ये म्हटले आहे की, सध्या नांदेड येथील केंद्रीय विद्यालय रेल्वेच्या जागेमध्ये सुरू अाहे. मात्र, येथील वर्गखोल्या छोट्या आहेत. एका वर्गामध्ये ६० पेक्षा अधिक विद्यार्थी असल्याने अध्यापन करताना शिक्षकांना असंख्य अडचणी निर्माण होत आहेत. अक्षरशः एका बाकावर तीन - तीन विद्यार्थ्यांना बसावे लागत आहे. कार्यालय आणि वर्गखोल्यांमधील अंतर जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षकांना कसरत करावी लागत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी केंद्रीय विद्यालयाने स्वतः अत्याधुनिक इमारतीची निर्मिती सध्याच्या शाळेच्या बाजूला केली आहे. या इमारतीचे काम पूर्ण होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला, तरीही रस्ता ‘केव्ही’ने तयार करावा की रेल्वे विभागाने तयार करावा? अशा भूमिकेमुळे इमारतीचे उद्‍घाटन रखडले आहे. १५ आॅगस्टपूर्वी रस्त्याचा प्रश्‍न सोडवून शाळा नवीन इमारतीमध्ये सुरू करावी, अशी विनंती पालकांनी निवेदनात केलेली आहे.

दरम्यान, गुरुवारी (ता. एक) पालकांनी ‘केव्ही’चे प्राचार्य तसेच रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांना लेखी निवेदन देऊन, १५ आॅगस्टपूर्वी शाळा नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याची विनंती केली. शिष्टमंडळात डॉ. यशवंतराव पाटील, डॉ. सुभाष उत्तरवार, प्रा. एन. पी. दिंडे, आर. बी. सूर्यवंशी, बी. जी. सोनटक्के, पी. जी. चौधरी, चंद्रकांत दामेकर, बालाजी हाके, सुधीर खोडवे, के. एम. मीना, शिवराज बोंढारे आदींचा समावेश होता. तसेच नांदेडचे नवनिर्वाचित खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही यात लक्ष घालून प्रश्‍न सोडवावा, अशीही मागणी पालकांनी पत्रकाद्वारे केली आहे. 

सध्याची जागा ही विद्यार्थी संख्या पाहता अपुरी पडत आहे. केंद्रीय विद्यालयाची स्वतःची नवीन इमारत बांधून तयार आहे. परंतु, रस्त्यामुळे स्थलांतरणास अडचण येत आहे. तरीदेखील वरिष्ठांशी बोलून १५ आॅगस्टपूर्वी शाळा स्थलांतरित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.  
- श्री. प्रशांत, प्राचार्य, केंद्रीय विद्यालय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News