विद्यार्थ्यांना शाळेबाहेरील जग दाखविणारा अवलीया शिक्षक 

सोनल मंडलिक (सकाळ वृत्तसेवा-यिनबझ)
Monday, 8 July 2019

तरुणाईचे आयडॉल 
गोपाल खाडे यांच्याविषयी थोडक्यात... 

  • गोपाल खाडे हे शिक्षक आहेत. 
  • उत्तम संग्राहक आहेत. त्यांच्याकडे पक्षीचित्र व माहिती, व्यंगचित्रे, वर्तमानपत्रे व साप्ताहिकात आलेली प्रेमपत्रे, अनेक मान्यवरांची स्वाक्षरी, विविध प्रकारच्या दगडाचा संग्रह आहे. 
  • विविध राज्यस्तरीय पुरस्काराने ते सन्मानित आहेत. 

माणसाच्या जगण्याला वेगळेपणाची किनार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जगण्याची मजा येत नाही. काही माणसं फार अवलीया असतात एखाद्या ध्येयाकडे रोखून बघत त्याचा पाठलाग करत असतात आणि ते ध्येय त्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनतो. असाच एक जगण्याचा, माणूसकीला जागण्याचा, इतरांना जगवण्याचा अविभाज्य घटक आहे ते म्हणजे गोपाल वसंतराव खाडे. एकीकडे ज्ञानदानाची खिल्ली उडवली जात असतांना आपल्या विविध, वेगळेपण जपणाऱ्या उपक्रमातून विद्यार्थी घडवायचे काम करणाऱ्या शिक्षकात अग्रगण्य नाव म्हणजे गोपाल खाडे. सकाळ समूहाच्या यिनबझच्या "तरुणाईचे आयडॉल"मध्ये चर्चा करताना गोपाल यांनी अनेक पैलू उलगडले. 

गणेश खाडे यांनी आपल्या विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केले आहे. असाच एक चिवचिव उपक्रम खाडे यांनी राबविला आहे. कामरगांव या गावात शिरताचं चिमण्यांची चिवचिव, कावळ्यांची कावकाव व विविध पक्ष्यांचे आवाज कानावर पडल्याशिवाय राहत नाही. जागोजागी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आपलं मन वेधून घेतात. ही किमया साधली ती  गोपाल खाडे या अवलिया शिक्षक व त्यांच्या विद्यार्थ्यांच्या अविरत १३ वर्षाच्या प्रयत्नाने. ग्रीष्माचा वनवा पाखरांना पोळून काढत असताना माणसाची व पाखरांच्या जीवाची काहिली पाहल्या जात नाही. त्यामुळे संवेदनशील माणसेचं तृष्णा तृप्तीचे आव्हान स्विकारतात. एकीकडे आपण व्यवहारी जगामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे माणसाची संवेदना बोथट होत असली तरी कामरगांवच्या विद्यार्थ्यांनी पाखरांसाठी पाणवठे उभारले आहेत. खरंच तहानेला जात नसते धर्म नसतो तहानेची तृप्ती करणारी सत्प्रवृत्ती हिचं खरी श्रेष्ठ जात व हाच खरा श्रेष्ठ धर्म आहे हे कामरगांवातील चिवचिव मंडळाच्या चिमुकल्यांना चांगले उमगले. 

माणसांसोबत पाखरेही जगली पाहिजेत,जपली पाहिजेत ही भावना शुभसंकेतचं मानावा लागेल. चांगली सुरुवात करायची असेल तर मार्गदर्शक हा देखील उत्तम असावा लागतो. गोपाल खाडे यांच्या पशूपक्ष्यांप्रती संवेदनेने भरलेल्या हाताचा सुगंध विद्यार्थ्यांच्या नाजूक हाताला पण लागला व ते नाजूक हात संवेदनेने सुसंस्कारित झाले याचा प्रत्यय कामरगांव येथे येतो. सुरुवातीला शाळेत सुरू झालेला उपक्रम आज मात्र संपूर्ण गावाने अंगीकारला आहे. आपल्या शाळेत आपण जे करतो तेच घरी केले तर गावात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होईल या विचाराने मग विद्यार्थ्यांनी आपल्या घरी पाणवठे व अन्नपात्र तयार केले. कामरगांवमधे दहा घराआड एक जलपात्र पाणवठा, अन्नछत्र किंवा घरटी दिसल्याशिवाय राहात नाही. कावळे चिमण्या यांच्याबरोबरच लालबुड्या बुलबुल, सूर्यपक्षी, मैना, साळुंखी, कोकिळा सुतार, भारद्वाज, दयाळ, शिंपी, कोतवाल, भोर यासारखे पक्षी आता मोठ्या संख्येने गावात येऊ लागली सकाळी आणि संध्याकाळी त्यांच्या आगमनाने परिसरातील किलबिलाट वाढला. लहान बाळांना त्यांच्या हक्कांची चिऊ आणि काऊ गावात अंगणातही दिसू लागली. 

'चिऊ ये-काऊ ये दाणा खा-पाणी पी भुर्र उडून जा' ही तोंडोतोंडी असलेली वाक्य लुप्त होतात की काय आणि चिमण्या संपतात की, काय अशी भीती निर्माण होत असतानाच या विद्यार्थ्यांनी हाती घेतलेलं हे सकारात्मक कार्य आज मात्र आपल्या राज्यासाठी एक आदर्श उपक्रम ठरलेला आहे. विद्यार्थ्यांच्या मनात पक्ष्यांबद्दल आत्मीयता निर्माण झाली. त्यासाठी परिसंवाद कथाकथन प्रभातफेरी घरटी स्पर्धा बर्डफिडर स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येऊ लागले. विद्यार्थी व गावकऱ्यांमध्ये बऱ्यापैकी जागरूकता निर्माण झाल्याने इतर शिक्षकांनी टाकाऊ पदार्थापासून उपयोगी पदार्थ निर्माण करण्याची कार्यशाळा घेतली. यामध्ये प्लास्टिक बॉटल, मातीच्या कुंड्या, भांडी, यापासून पाण्याची भांडी व धान्यपात्र कसे तयार करायचे याचे प्रशिक्षण दिले. आता तर उत्तम प्रकारची पर्यावरण पूरक,स्वस्त व परिसरातील वस्तू वापरून पक्ष्यांकरता कृत्रिम घरटे बनवावी ती जिल्हा परीषद विद्यालय कामरगांवच्या विद्यार्थ्यांनीचं.

एप्रिल महिन्यात दिवसभरात दोन हजारांपेक्षा जास्त पक्षी शाळेच्या आवारात कडधान्य, भुईमुंगाच्या शेंगा सूर्यफूल व पाण्याचा आस्वाद घेतात. हे चित्र खरोखर आजकाल दुर्मिळ होत चाललेले आहे. परंतु गोपाल खाडे यांच्या मार्गदर्शनात ही किमया साधली ती जिल्हा परिषद विद्यालय कामरगावच्या विद्यार्थ्यांनी. आता तर चक्क विद्यार्थीच इतर गावांमध्ये जाऊन घरटी बनविण्याच्या कार्यशाळा घेतात व स्वस्त दरात कुठलाही खर्च न करता घरटी कशी तयार करावी याचे प्रशिक्षण तेथील विद्यार्थ्यांना देतात.

या उपक्रमाची माहिती सोशल मीडियाद्वारे स्वीडन देशातील स्टॉकहोम पर्यंत डॉ. मनोज काळे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी गोपाल खाडे यांच्याकडून उपक्रमाविषयी माहिती जाणून घेतली. ते स्टॉकहोम येथील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे संशोधक आहे. त्यांनी भारतात येऊन जिल्हा परिषद विद्यालय कामरगांव येथे भेट दिली विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी उपक्रमाविषयी चर्चा केली आणि शाळेला १५००० व उपक्रमाला ५००० व भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याला २००० रुपये बक्षीस दिले. पथनाट्याला मिळालेले बक्षीस विद्यार्थ्यांनी गोपाल खाडे यांच्याकडे  चिवचिव मंडळाला लागणाऱ्या खर्चासाठी सुपूर्द केले ७००० रुपयातून त्यावर्षी मातीची भांडी व मातीची घरटी मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली. शिवाय आजूबाजूच्या परिसरांमध्ये शाळांमध्ये पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी मातीची भांडी व बर्ड फिडर देण्यात आले.स्वच्छता अभियान लेक वाचवा अभियान पोषण पंधरवाडा या योजनांच्या प्रसारामधे शाळेचा मोठा वाटा दुर्लक्षित करुन चालणार नाही. 

स्वच्छता अभियान व हागणदारीमुक्त गांव मोहिमेला यशस्वी करण्यासाठी वाशीम जिल्हा परिषदेने जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने महा स्वच्छता रॅली काढली होती. या रॅलीच्या माध्यमाने १५ गावांना भेटी देण्यात आल्या. यावेळी गोपाल खाडे यांनी बनवलेला स्वच्छता रोबोट जागोजागी लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत होता. शाळेच्या वेळेनंतरचा अतिरिक्त वेळ त्यांनी स्वच्छता अभियाना करीता जनजागृतीसाठी जिल्ह्याला दिला. 
महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे दरवर्षी पुणे पंढरपूर वारीत वारकर्‍यांसोबत स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात येते. २०१६ च्या स्वच्छता दिंडीत गोपाल खाडे वाशीम जिल्ह्याच्या वतीने  सहभागी झाले होते. 

गोपाल रोबोटच्या आवाजात विशिष्ट शैली द्वारे वारकऱ्यांना स्वच्छतेचा संदेश देतात उघड्यावर शौचास बसल्याने महिलांची अब्रू जाते आणि आरोग्याला बाधा पोहोचते असे  सांगतात. विद्यार्थ्यांनी नियमित नखे कापावीत, हात साबणाने स्वच्छ धुवावेत, पिण्याचे पाणी उंचावर टाकून ठेवावे,पाण्यात हात बुचकळून नये, ओगराळे वापरावे शौचालयाचा वापर करावा अशी माहिती देतात.त्याचबरोबर स्वच्छतेशी निगडीत प्रश्न ही लोकांना विचारतात.

स्वछता अभियानातील एका अनुभवाबाबत गोपाल यांनी सांगितले की, लाखो वारकऱ्यांचे सोबत पुणे पंढरपूर अशा प्रवासात एक रोबोट चालत होता. चालताना सर्वजण या रोबोटकडे कुतूहल मिश्रित नजरेने पाहत होते कारण या रोबोटवर स्वच्छता व पाणीपुरवठा संदर्भात संदेश देण्यात आले होते. वारीत आलेले वारकरी या स्वच्छता रोबोटशी हस्तांदोलन करत होते. तसेच त्याच्या शरीरावरील स्वच्छता संदेशाचे वाचन पण करीत होते. कदाचित रोबोट च्या माध्यमातून विविध सामाजिक समस्येवर हल्लाबोल करीत जनजागृतीचे काम करणारे गोपाल खाडे हे राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिली व्यक्ती असेल. स्वच्छता दिंडीतील त्यांच्या उत्कृष्ट सहभागाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता  विभागाच्यावतीने सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

राज्य शासनाच्या बेटी बचाव बेटी पढाव योजनेत गोपाल यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. स्वच्छता दिंडीतील यश पाहता जिल्हा प्रशासनाने त्यांना लेक वाचवा या अभियानामध्ये सहभागी सहभागी करून घेतले. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महा संचालनालयांतर्गत वाशिम जिल्हा माहिती कार्यालय यांनी गणपती उत्सव दुर्गोत्सव व यात्रेमध्ये बेटी बचाव बेटी पढाव संदेश रोबोट व बायोस्कोपच्या माध्यमातून दिला. कच्ची घोडी व बायोस्कोपद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम गोपाल खाडे यांनी केले. पोहरादेवी हे बंजारा लोकांचे धार्मिक स्थळ रामनवमीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. या यात्रेत भारतभरातुन लाखो श्रद्धाळु पोहरादेवीत येतात. या यात्रेत बंजारा बोलीभाषेतचं गोपाल यांनी बंजारा  समाजाशी संवाद साधुन लेक वाचविण्याचे आवाहन केले. समोरचा व्यक्ती आपल्याच बंजारी भाषेत बोलतो म्हटल्यावर लोक कुतूहलाने कच्छी घोडी चा कार्यक्रम पाहायला यायला लागले.वाशिम जिल्ह्यातील लेक वाचवा लेक शिकवा या अभियानाचे यश पाहता हा उपक्रम शासनाने राज्यासाठी राबविण्याचे ठरविले.

रंजनातून अंजन या उक्तीप्रमाणे गोपाल काम करतात. विविध शासकीय योजना सामाजिक समस्या  याविषयी जनजागृती करण्यासाठी  त्यांचे विद्यार्थीसुद्धा अग्रेसर असतात. दमदारपणे पथनाट्य सादर करावे ते खाडे सरांच्या विद्यार्थ्यांनीचं. या पथनाट्याचे लेखन  स्वतः गोपाल खाडे करतात. पथनाट्यात विविध प्रसंग  म्हणतांना  मनोरंजनाची व गीतांची साथ घेतली जाते. या गीतांचे लेखन सुद्धा गोपाल खाडे हे स्वतः करतात. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपरिषद, विधानसभा, लोकसभा, निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पथनाट्य सादर करतात. मतदानाची घटणारी टक्केवारीची समस्या पथनाट्याच्या माध्यमातून लोकांसमोर मांडून प्रबोधन करतात.विविध प्रसंगातून मतदानाचे कार्य किती महत्त्वाचे लोकांना पटवून देतात.उत्तम सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करतात.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वोक्व्हार्ड फाऊंडेशन मुंबई यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत विद्यार्थीनी कु. पुनम सुनील सरीसे हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषीक पटकाऊन अव्वल स्थान गाठून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मुंबई येथील वोक्हार्ड फाऊंडेशनने विद्यार्थ्यांच्या मनात स्त्रीयांबद्दल आदर वाढावा व महिला सक्षम व्हाव्यात या उदात्त हेतून राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. वोक्व्हार्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सर हुझेपा खोराकीवाला व महिला व बालविकास विभागाच्या प्रमुख स्नेहल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या स्पर्धा पार पाडल्या.  कामरगाव जि.प. विद्यालयाचे ५० विद्यार्थी गोपाल खाडे, नीता तोडकर खाडे यांच्या मार्गदर्शनात सहभागी झाले होते. जिल्हास्तरवर प्रथम आलेल्या पुनम सरीसे सह द्वितीय अपेक्षा देशमुख तृतिय क्रमांकाच्या अश्‍विनी देव्हारेचे निबंध राज्यस्तरावर सहभागी झाले. राज्यभरातून आलेल्या निबंधामधून पुनम सरिसेच्या 'महिला सक्षमिकरण आव्हाने व संधी' या निबंधाला पुरस्कृत करण्यात आले. पुनम सरीसे यावर्षी दोनवेळा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत सहभागी होत आहे. यापूर्वी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय अभिनय स्पर्धेतही पुनमने सहभाग घेतला होता.अशा ह्या कल्पक शिक्षकांचे असे कल्पक विद्यार्थी.

गोपाल यांनी सूत्रसंचालन देखील केले आहे. वऱ्हाडीसारख्या बोलीभाषेतून कविसंमेलने गाजवने असो की एकपात्री प्रयोग करणे असो की समाजाला सर्वंकष विकास करणे असो या अशा अनेक भूमिका गोपाल खाडे हे एकाच वेळी कसे काय पार पाडतात हा खरच संशोधनाचा विषय आहे. 'इचुकाटा' या हास्यातून प्रबोधन या काव्यमैफिलीचे बहारदार सुत्रसंचालन करणारे गोपाल खाडे आहेत. 

हे सर्व कार्य  करताना घरच्यांकडून मिळणाऱ्या पाठींब्याबाबत गोपाळ म्हणाले की, जी माणसं पडत असतात ती सारखी धडपडत असतात कारण धडपडणारी माणसचं घडत असतात हा निसर्गाचा नियम आहे. आपल्या धडपडण्याला पत्नीची साथ आहे म्हणून हे शक्य आहे असे प्रामाणिकपणे गोपाल खाडे कबूल करतात. त्यांच्या प्रमाणेच त्यांचे संपूर्ण कुटूंब पत्नी नीता, मुलगी अवंती, मुलगा तन्मय सारेच्या सारेच कलाप्रेमी व भन्नाट कलाकार आहेत. यावर्षी तर गोपाल खाडे व तन्मय खाडे राज्यस्तरिय विज्ञान प्रदर्शनात तर अवंती खाडे ही राष्ट्रीय स्तरावर होणार्‍या इन्सपायरच्या आय आय.टी.दिल्ली येथे विज्ञान प्रदर्शनात सहभागी झाली होती. गोपाल खाडे राज्य स्तरीय लोकसंख्या शिक्षण प्रदर्शनीत सहभागी होत आहेत. गोपाल खाडे यांच्या सुविद्य पत्नी नीता खाडे ह्या सुद्धा उपक्रमशील व कल्पक शिक्षिका आहेत.

गोपाल खाडे हे मुलांना नवनवीन गोष्टी शिकविण्यातही नेहमी प्रयत्नशील असतात. गोपाल हे अफलातून अशा ध्येयवेड्या माणसांना शाळेत आणून आपल्या विद्यार्थ्यांशी त्याचा संवाद घडून आणतात. मग शाळेत कधी इंग्लंडचा पीटर विल्यम येतो तर कधी सायकल वेडे प्रिसीलिया मदान व सुमित पारिंगे येतात. असंच एकदा शाळेत पिटर विल्यम या इंग्लडच्या ध्येयवेड्या युवकाने भेट दिली. आचार्य पदवीसाठी त्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास हा विषय निवडला. यासंदर्भात तो मुंबईवरून पायी जगन्नाथपुरीला पायी निघाला. गोपाल खाडे यांनी त्यांना शाळेत बोलावले. आपल्या विद्यार्थ्यांसोबत त्याची भेट व संवाद घडवून आणला. भाषेची अडचण येऊ नये म्हणुन दुभाषकाचे काम नीता तोडकर खाडे व गोपाल खाडेंनी केले आणि सुरु झाला विल्यम व मुलांचा मजेशिर संवाद. मुलांची अजब गजब प्रश्न व विल्यमची उत्तरे यामुळे मात्र ही भेट मुलांच्या कायम स्मरणी राहली.

बांबूच्या सायकलीवरून देशप्रवासाला निघालेल्या प्रिसिलिया मदान व सुमित पारिंगे यांची सुद्धा मुलांची भेट घडवून आणली. पनवेलला राहणारे हे दोन सायकलवेडे. दोघांनीही भारतात उभा-आडवा अनेकदा प्रवास केला आहे. पनवेल ते कन्याकुमारी, पनवेल ते मनाली किंवा ओरिसापर्यंतही ते जाऊन आले आहेत.  या दोघांनी कन्याकुमारी ते खार्दुंग असा ४२०० किमी प्रवास सायकलने केलाय. आणि तोही बांबूच्या सायकलवरून. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा संदेश देत त्यांची बांबूची सायकल देशभर धावली आणि या दोघांनी बांबूच्या सायकलवरून भेट दिली ती जिल्हा परिषद विद्यालयातील कामरगांव येथील विद्यार्थ्यांना. शाळेमध्ये लहान व्याख्याने देऊन मुलांशी संवादही या दोघांनी साधला. दोघांच्याही सायकली थांबल्या आणि शाळेतली मुलं बांबूच्या सायकल पाहण्याकरता गोळा झाली. असल्या भन्नाट माणसाची भेट गोपाल खाडे हे आपल्या विद्यार्थ्यांना नेहमीच घडवुन आणत असतात अशा भन्नाट लोकांचे अनुभव मुलांचे अनुभवविश्व वाढवण्याकरता फार महत्त्वाचे ठरतात असे गोपाल खाडे यांचे मत आहे.

विद्यार्थ्यांना शाळेत शिकवतानाच्या अनुभवाबाबत गणेश यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना शाळेत शिकवताना माझा असा अनुभव आहे की फक्त आपणच बोललो आणि विद्यार्थ्यांनी ऐकलं तर विद्यार्थ्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहत नाही. विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग जितका जास्त तितके त्यांचे भावविश्व जास्त विस्तारत जाते. आधुनिक काळाचा विचार करता आज तेच जास्त महत्त्वाचे आहे. आज घोकंमपट्टी करणारे विद्यार्थी मागे पडत आहे व कृतीयुक्त अध्ययन-अध्यापनात जी विद्यार्थी सक्रिय असतात, ते कुठल्याही गोष्टीला व्यवस्थितपणे सामोरे जाऊ शकतात हा माझा दावा असल्याचे गोपाल खाडे सांगतात.

ते पुढे म्हणतात की, माझ्या मित्रपरिवारात विविध क्षेत्रातील लोक असल्यामुळे त्या सर्वांचा मला व माझ्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो मित्र परिवारामध्ये वृत्तपत्रांचे संपादक, उपसंपादक,वकील, डॉक्टर,इंजिनीयर, उपक्रमशील शिक्षक, खेळाडू, वृत्तवाहिन्यांचे पत्रकार, समाजसेवक,लेखक, कवी, व्यापारी अशा विविध अंगाने गोपाल खाडे यांचा मित्रपरिवार संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला आहे. महाराष्ट्र सह इतर राज्यातील आगळ्यावेगळ्या पद्धतीने भन्नाट जीवन जगणारे मित्र आहेत.ते म्हणतात महाराष्ट्रातला क्वचितच एखादा जिल्हा असेल जिथे जिथे माझा मित्र नसेल अडीअडचणीला कुणासाठीही धावणारा मित्रवर्ग लाभल्याचे गोपाल खाडे सांगतात. 

मी माझे अध्यापन करताना ते कृतियुक्त व आनंददायी कसे होइल याकडे कटाक्ष असतो. पालकांना आपल्या मुलांचा अभ्यासाकडे असलेला कल ओळखता आला पाहिजे. आपल्या मुलांच्या आवडीनिवडी छंद काय आहेत यांचा पण पालकाला अभ्यास असला पाहिजे जेणेकरून भविष्यातील अभ्यासासाठी आपल्या पाल्यासाठी त्यांना पाल्याच्या आवडीचा अभ्यासक्रम किंवा शाखा निवडतात निवडता येईल. मित्राच्या मुलाने अमुक क्षेत्र निवडले म्हणून आपल्याही मुलांनी तेच क्षेत्र निवडावे हा विचार पालकांनी करू नये.

गोपाल यांनी शाळेत स्व.महादेवराव लाकडे गुरुजी स्मृतीप्रित्यर्थ चार कवीसंमेलनं अतापर्यंत आयोजित केली. त्या प्रेरणेतुन विद्यार्थ्यांतुन कवी निर्माण झाले. महाराष्ट्रातल्या कित्येक कवींच्या कविता इथल्या विद्यार्थ्यांना तोंडपाठ आहेत. कालपर्यंत कविता लिहणार्‍या कवयित्री आज मात्र उत्तमप्रकारे कवीसंमेलनाचे सुत्रसंचलन करतात.

कामरगांवच्या शाळेत गुणवत्तपुर्ण शिक्षण मिळते पण त्याहुनही अधिक म्हणजे आपण या समाजात जन्मास आलो व आपण या समाजाचे देणे लागतो हा विचार गोपाल आपल्या विद्यार्थ्यात निर्माण करण्यात यशस्वी झालेत. ते कधी आपल्या मुलांना शिवारफेरीच्या माध्यमातुन जंगलात नेतात. पक्ष्यांची वनस्पतींची ओळख करुन देतात तर कधी सायन्स ट्रेनला भेट देण्याकरीता दुसर्‍या जिल्ह्यात नेतात. 

असाच एक अनुभव मांडताना गोपाल म्हणाले की, चाकावरचे विज्ञानप्रदर्शन दाखविण्याकरिता मुलांना मुर्तिजापुरला नेले होते. मी आणि नीता तोडकर खाडे त्यांना सायन्स ट्रेन  दाखाविण्याकरीता उपस्थित होते. यावेळी रेल्वेच्या बाहेर काचेच्या तावदानावर भारतातील विविध राज्यातील मुलांनी काढलेली पर्यावरण, प्रदुषण, लोकसंख्यावाढ, जलपुनर्भरण, नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर, नैसर्गिक ऊर्जास्त्रोत्रांचा अधिक वापर करण्यासंदर्भातील चित्रे आकर्षक पद्धतीने लावली होती. मुलांनी या चित्रांचा आनंद घेतला. वातावरणीय बदलांबाबत जागृती निर्माण करणे हा सायन्स एक्सप्रेसचा मुख्य उद्देश होता.

सायन्स एक्सप्रेसबाबत बोलताना गोपाल म्हणाले की, हा डिपार्टमेंट अॉफ सायन्स अॅड टेक्नोलॉजी इंडिया व विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर अहमदाबाद यांचा संयुक्त उपक्रम आहे. सुरवातीलाच पहिल्या बोगीतील रचना पाहून मुले जाम खूष झाली. त्यांना आणल्याचं आम्हा दोघांना चिज झाल्यासारखे वाटले. पुढचा एक तास आमचा विविध गोष्टी समजावून सांगण्यात गेला. सर्व तृप्त होवून रेल्वेच्या बाहेर पडलो. मुलांना परत भुका लागल्या होत्या. स्टेशनवरचं एका कोपऱ्यात जेवण्याची परवानगी काढून मुलांना जेवायला बसवले.जेवताना लक्ष बाजूला गेले...सायन्स ट्रेनच्या प्लॅटफॉर्म कृती सुरु होत्या. त्यात  टॅट्टु चित्रकला व कृतीयुक्त खेळ सुरु होते. मुलांनी व आम्ही हातावर प्राण्याचे चित्र काढून घेतले. २९ जुलै हा जागतिक वाघ दिन असल्याने  वाघाचे चित्र जास्त काढल्या जात होते.मुलांनी परत  कृतियुक्त खेळात सहभाग घेतला. सर्व तृप्त होवून रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडलो. सतत अविरतपणे काम करणाऱ्या या माणसाच्या कार्याची पावती पाहायची असेल तर घरात लागलेली विविध  प्रकारची सन्मानचिन्हे प्रमाणपत्रे पहावे लागतील. माझ्या जीवनावर व विचारसरणीवर आनंदवन व सोमनाथचा फार मोठा प्रभाव आहे. कधीही फारसं न ऐकलेल्या सोमनाथच्या पावन भूमीत मी १३ मे १९९९ ला मी पहिल्यांदा गेलो होतो. श्रमसंस्कार छावणीची नोंदणी मी पत्राद्वारे आठ विद्यार्थ्यांसह आधीचं केली होती. सोमनाथ श्रमसंस्कार छावणीमध्ये नेमकं काय असतं याबद्दल फारशी कल्पना नव्हती. मुलमारोडा सोडून जसजसं सोमनाथकडे गाडी जायला लागली तसं जंगल अधिक अधिक गर्द व्हायला लागले होते. मनात थोडी भीती पण होती. सोमनाथ पाहताचं ही भीती निघून गेली. दुसऱ्याशी पहाटेच श्रमसंस्कार छावणी म्हणजे काय हे हळूहळू कळायला लागलं होतं. 

'श्रम ही श्रीराम हमारा, या बाबांच्या शब्दाप्रमाणे श्रमसंस्कार छावनीत काम चालू झाले. महाराष्ट्रातील शेकडो तरुण विविध जिल्ह्यातून सहभागी झाले होते.कुणी अधिकारी कुणी पत्रकार कुणी समाजसेवक कुणी शिक्षक वकील डॉक्टर शेतकरी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध कार्यकर्त्यांकडून खूप काही शिकायला मिळाले.विचारांच्या कक्षा रुंदावल्या बाबा आमटे आणि विकास भाऊ यांनी केले केलेल्या कार्याचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सोमनाथ. श्रमसंस्कार छावणीने जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला आणि १९९९ पासून नियमितपणे दरवर्षी छावणी ला जायला लागलो. ज्यावेळी सोमनाथला शक्य नसते त्यावेळी आनंदवनात जावुन येतो.झडलेल्या बोटांची किमया बघितली की भरभरुन प्रेरणा मिळते. ती ऊर्जा मनाला तजेला देते व काम करण्याची प्रेरणा पण. दरवर्षी नव-नवीन मित्र-मैत्रीण कडून वेगवेगळ्या प्रकारची महाराष्ट्र होणारी कामे जवळून अनुभवता आली या कार्यकर्त्यांमध्ये संतोष गर्जे असेल अमोल मानकर, प्रशांत देशमुख, स्वामिराज भिसे, नंदु पालवे वा मंजितसिंग असेल यांची जवळून ओळख झाली. विकास भाऊंशी बोलताना विकासभाऊ आमटे  एकदा म्हणाले की  समाज सेवा करायची म्हणजे सामाजिक संस्था काढून समाज सेवा केली पाहिजे असं नाही तुम्ही ज्या नोकरीत आहात त्या जी नोकरी करता ती नोकरी प्रामाणिकपणे करा हीसुद्धा एक समाजसेवाचं आहे. हेचं शब्द प्रमाण मानून गोपाल काम करत राहले. १९७६ ला श्रद्धेय बाबा आमटे यांनी पहिली श्रमसंस्कार छावणी सोमनाथ जंगलात भरवली. तेव्हापासून आज पर्यंत नियमितपणे श्रम संस्कार छावणी सुरू आहे.या शिबिरात हजारो कार्यकर्ते घडत असतात.समाजाने दुर्लक्षित केलेली माणसं आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर किती मोठं काम करू शकतात हे सोमनाथ आणि आनंदवन पाहिल्यावर लक्षात येतं. माझ्या जडणघडणीत सोमनाथ श्रमसंस्कार छावणीचा फार मोठा पगडा आहे. या भन्नाट व्यक्तिमत्त्वाचा परिसरातील युवा वर्गावर फार मोठा पगडा आहे अशीच भन्नाट माणसे ही काम करणार्‍यांसाठी प्रेरणास्थान असतात हेही तितकेच खरे.

गोपाल यांना कात्रणांचा संग्रह करण्याचा छंद आहे. त्याबाबत गोपाल म्हणाले की, "हा छंद जीवाला लावी पिसे "असे म्हटले जाते. इमर्सनने एके ठिकाणी लिहून ठेवले की आयुष्याच्या रहस्यापर्यंत पोहचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वेडेपणा आणि या वेडेपणातूनच साकारलं गोपाल खाडे यांच्या अफलातून 'मोरया आम्हा तुझा छंद' या गणपती चित्र कात्रणांचा संग्रह. तब्बल बावीस देशांची विविध चित्रकात्रण त्यांच्या संग्रहात आहे.चीन, अमेरिका,नेपाळ पाकिस्तान,काबुल अफगानिस्तान,जावावा नेदरलैंड,न्यूझीलंड इंग्लंड,जापान, बँकॉक मध्य आशिया, इंडोनेशिया सारख्या देशातील गणपती चित्रकात्रण त्यांच्या संग्रहात उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील अनेक लहान मोठ्या शहरांमध्ये या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले त्यांच्या संग्रहात २०० च्या वर गणरायांच्या मुर्त्या पण आहेत ज्यामध्ये तबला संतूर सतार ढोलक मृदंग सनई चौघडा मेंडोलीन इत्यादी वाद्ये वाजवणार्‍या गणेशमूर्ती त्यांच्या संग्रहात आहे. बारा राशींचे मेषेश्‍वर, वृषभेश्वर,मिथुनेश्वर, कर्केश्वर, सिंहेश्वर,कन्येश्वर, तुळेश्वर, वृश्चिकेश्वर धनेश्वर, मकरेश्वर, कुंभेश्वर व मिनेश्वर हे बारा गणपती चित्र त्याच्या राशीच्या अर्थानुसार असुन ही चित्रकात्रणे दुर्मिळ अशी आहेत. गणपतीची विविध रूपे त्यांनी स्वास्तिक, त्रिशूल गणेशप्रसन्न, ओम या आकारात लावली आहे. त्यामुळे पाहतांना पाहणाऱ्यांचा आनंद द्विगुणित होतो. कारण शेवटी मजबूती ही शरीराच्या आकारावरून नव्हे तर मेंदूच्या आणि संवेदनेच्या आवाक्यावरून लक्षात घ्यायची असते.

अशा या हरहुन्नरी शिक्षक आणि एका परिवर्तनशील, ध्येयवेड्या, मजबूत माणसाला सलाम. तसेच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News