औरंगाबादेत ‘टीसी’साठी विद्यार्थी पुन्हा महाविद्यालयात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 June 2019

टीसी देण्याच्या आश्वासनानंतर युवासेनेने माघार घेतली होती; मात्र दोन दिवसांनंतरही टीसी न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी पुन्हा महाविद्यालयात धाव घेतली.

औरंगाबाद - अकरावी उत्तीर्ण झाल्यानंतर बारावीसाठी अन्य महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी शहरातील वसंतराव नाईक महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी ‘टीसी’ची मागणी केली; पण महाविद्यालयाकडून टीसी देण्यास विलंब होत असल्याने युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी महाविद्यालयात ठिय्या दिला होता.

टीसी देण्याच्या आश्वासनानंतर युवासेनेने माघार घेतली होती; मात्र दोन दिवसांनंतरही टीसी न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी पुन्हा महाविद्यालयात धाव घेतली. शिवाय येत्या दोन दिवसांत टीसी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा युवा सेनेचे हनुमंत शिंदे यांनी आहे. 
शहरातील वसंतराव नाईक महाविद्यालयात अकरावी उत्तीर्ण अनेक विद्यार्थ्यांनी विविध कारणे देत टीसीची मागणी महाविद्यालयाकडे केली होती. विद्यार्थी टीसी घेऊन ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रवेश घेतात. परिणामी, महाविद्यालयातील विद्यार्थीसंख्येवर परिणाम होतो.

या कारणामुळे विद्यालये टीसी देत नसल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सहारा घेत महाविद्यालयासमोर ठिय्या मांडला होता.  शुक्रवारी (ता. २१) विद्यार्थ्यांना टीसी न दिल्याने युवा सेनेचे शहरप्रमुख हनुमंत शिंदे, विशाल गायके, गणेश तेलोरे, स्वप्नील डिडोरे, शुभम पवार, अवधूत अंधारे यांनी महाविद्यालय प्रशासनाशी टीसी देण्याबाबत चर्चा केली. यावेळी महाविद्यालय प्रशासनाने ठोस कारणे दाखवून टीसी घेऊन जावी, असे स्पष्ट केले. शिवाय ठोस कारण असेल तर दोन दिवसांत टीसी देण्याचे आश्‍वासनही दिले. 

विद्यार्थी का मागत आहेत टीसी?
शहरातील अनेक विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाइन प्रक्रियेत शहरातील महाविद्यालयांची निवड करून प्रवेश घेतले होते. मात्र, शहरातील महाविद्यालयांत कॉपी करता येत नाही. त्यामुळे शहरात राहणारे अनेक अकरावीचे विद्यार्थी ग्रामीण भागातील महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी दाखले काढत आहेत. दरम्यान, केवळ एका वर्षासाठीच विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाइन प्रक्रियेत महाविद्यालयाची निवड का केली, असाही प्रश्‍न शिक्षणक्षेत्रातील व्यक्तींकडून उपस्थित केला जात आहे.

कधी मिळते टीसी 
- सध्या विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालय घरापासून लांब असणे
- पालकांची बदली झाली असेल तर 
- वैद्यकीय कारणास्तव राहत असलेल्या परिसरात कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळणे 
- शाखा बदल
- विद्यार्थ्यांचा राहण्याचा पत्ता बदलणे
 - बारावी बोर्ड बदल

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News