11 ऑगस्ट रोजी अणे महिला महाविद्यालयात स्टँड अप कॉमेडी स्पर्धेचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 July 2019
  • पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने शासनाच्या वतीने विविध उपक्रम
  • इच्छुक स्पर्धकांनी आपल्या कार्यक्रम स्थळाजवळील वेळापत्राप्रमाणे एक दिवस अगोदर 7506848055 या व्हॉट्सअप क्रमांकावर 2 मिनिटांचे सादरीकरण चित्रित करून पाठवायचे

यवतमाळ: महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत स्टँड अप कॉमेडी स्पर्धांचे आयोजन केले जाणार असून पु.ल. यांच्या साहित्यावर कॉमेडीची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. यवतमाळमध्ये या स्पर्धेचे आयोजन 11 ऑगस्ट 2019 रोजी अणे महिला महाविद्यालयात होणार आहे.
 
मराठी भाषा विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांत ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर पात्र ठरणाऱ्या निवडक विजेत्यांना स्पर्धेच्या अंतीम फेरीत सादरीकरण करण्याची संधी मिळेल. महाराष्ट्रातील विनोदी कलावंतांचे टॅलेंट हंट करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्ताने राज्य शासन करणार आहे. 

मंगळवारी (ता.16 जुलै) नाशिक जिल्ह्यातून जिल्हास्तरीय फेऱ्यांना सुरुवात झाली असून प्रत्येक केंद्रावरील विजेत्याला 20 हजार आणि उपविजेत्याला 15 हजार अशी रोख स्वरूपाची बक्षिसे देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर सकाळी 10 ते दुपारी 2 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 7 या स्पर्धेचे आयोजन होणार आहे. 

इच्छुक स्पर्धकांनी आपल्या कार्यक्रम स्थळाजवळील वेळापत्राप्रमाणे एक दिवस अगोदर 7506848055 या व्हॉट्सअप क्रमांकावर 2 मिनिटांचे सादरीकरण चित्रित करून पाठवायचे आहे. यातून निवड करण्यात आलेल्या स्पर्धकाला केंद्रावर 5 ते 8 मिनिटे सादरीकरण करावयाचे आहे. या स्पर्धेचा सोहळा येत्या 25 ऑगस्ट रोजी पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होईल. यवतमाळ जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी दिनांक 11 ऑगस्ट 2019 रोजी लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पु.लं.चे साहित्य अधिकाधिक तरूणांपर्यंत पोहोचावे, यासाठी ही स्पर्धा सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित केली आहे. या स्पर्धेदरम्यान सर्व जिल्हा केंद्रावर पु.ल. जत्रोत्सवही आयोजित करण्यात येणार आहे. या माध्यमातून पुलंचे साहित्य, त्यांची भाषणे, त्यांचे कार्यक्रम अनुभवण्याची संधीही रसिकांना मिळणार आहे. या संपूर्ण उपक्रमाचे प्रक्षेपण सोनी मराठी वाहिनीवरून केले जाणार आहे. 

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील शहरी तसेच ग्रामीण भागातील विनोदी कलावंतांना राज्यस्तरीय व्यासपीठ देण्याच्या हेतूने ही स्पर्धा राबविण्यात येत आहे. या स्पर्धेस भरभरून प्रतिसाद देण्याचे आवाहन प्रा. डॉ. दुर्गेश कुंटे व मराठी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News