पत्रकारितेचे आकर्षण...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019
  • क्षमता ओळखणे आवश्यक
  • टेलिव्हिजनवरील पत्रकारितेचे आकर्षण
  • या क्षेत्रांत दैनंदिन घडामोडींची माहिती हवी

करिअरची निवड हा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे तो निर्णय भावनेच्या बळावर  नव्हे तर सर्वांगिण विचार करून घ्यायला हवा. विद्यार्थ्यांनी आपली आवड लक्षात घ्यावीच आणि क्षमताही तपासून पाहावी. उत्तम करिअर घडण्यासाठी आधी आपल्या क्षमता ओळखणे आवश्यक असते.

टीव्ही पत्रकारिता : ग्लॅमरमागची मेहनत
टेलिव्हिजनवरील पत्रकारितेचे सर्वांनाच आकर्षण वाटते. वृत्तवाहिनीवर बोलणारा अँकर तर बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतो. अनेकांना त्यांच्यासारखे प्रसिद्ध व्हायचे असते. ग्लॅमरमागची मेहनत, वृत्तवाहिनीतील करिअरच्या संधी कशा रीतीने करावी पुढीलप्रमाणे....

टीव्हीवर बोलणारा अँकर पाहून अनेकांना वाटते की, आपणही यांच्यासारखेच बोलावे. आपल्यालाही हे सहज जमू शकते. पण हे तितकेसे सोपे नाही. इथे प्रसिद्ध व्हायचे, तर मेहनत हवीच. पत्रकारितेत यायचे तर मुळात वाचन दांडगे हवे. एकाच क्षेत्रातील नव्हे तर सर्वच क्षेत्रांतील दैनंदिन घडामोडींची माहिती हवी. अभ्यास करून मगच एखाद्या गोष्टीत मत मांडावे. उगाच वायफळ बोलण्याला अर्थ नाही. चुकीची माहिती कधीच सांगू नये. त्याऐवजी गप्प बसावे.

विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आज उपलब्ध आहेत. गरवारे इन्स्टिटय़ूट, झेविअर्स कॉलेज, रानडे इन्स्टिटय़ूट, केसी कॉलेज, मुंबई विद्यापीठ अशा अनेक ठिकाणी पत्रकारितेचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ते अभ्यासक्रम करून या क्षेत्रात आल्यास नक्कीच फायदा होतो. कारण येथे पत्रकारितेच्या सर्व माध्यमांचे तंत्र समजावून सांगितले जाते. शिकता शिकताच विद्यार्थ्यांनी कामाला सुरुवात करायला हवी.

अनेक वृत्तपत्रांमध्ये कॉलेजच्या, तिथल्या उपक्रमांच्या, स्नेहसंमेलनांच्या बातम्या विद्यार्थीच करत असतात. त्या वृत्तपत्रांत जाऊन संबंधित वरिष्ठांना भेटावे. आपला बायोडेटा देऊन आपल्या लिखाणाची एखादी प्रत देऊन किंवा मेल करून ठेवावी. म्हणजे आपले लिखाण कसे आहे, आपल्याला कोणत्या पद्धतीचे लिखाण जमते, याची महिती संपादकीय विभागातील वरिष्ठांना मिळू शकेल. अगदी टीव्ही पत्रकारिता करायची तरीही चांगले लिहिता येणे आवश्यक आहेच. कारण लिहिण्याने आपले विचार पक्के होतात. ते मुद्देसूद मांडण्याची सवय होऊ लागते. लिखाणानंतर पुढची पायरी बोलणे आहे. 

टीव्ही पत्रकारिताच करायची तर आपणच आपले लहान लहान व्हिडीओ तयार करा. त्यात आपल्या आजूबाजूच्या लहानसहान घटनांची बातमी बनवा. तो तुमच्या कॉलेजचा कार्यक्रम असेल नाहीतर लग्न. पण यामधून आपल्याला बोलण्याची सवय होते. सभाधीटपणा येतो. लोकांसमोर बोलण्याचे धाडस येते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर किंवा होत असताना एखाद्या वृत्तवाहिनीमध्ये उमेदवारीही करू शकता. ती उमेदवारी करत असताना केवळ दिलेले काम करून मग घरी जाऊ नका. वृत्तवाहिनीचे काम समजून घ्या. वेगवेगळ्या विभागांचे  काम कशा प्रकारे चालते ते पाहा. आपल्या काही नवीन कल्पना असतील तर त्या वरिष्ठांकडे मांडा. त्यासाठी घाबरू नका. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संयम राखा. आपल्यातली प्रतिभा जिवंत ठेवा.

पत्रकारितेचे क्षेत्र छान आहे, कारण इथे आपल्या आवडीची गोष्ट आपल्या कामाचा भाग असते. मॅच बघणे, सिनेमा बघणे या गोष्टी कामाचा भाग असतात. त्यामुळे पत्रकारितेचे काम कधीच कंटाळवाणे होत नाही.

हे क्षेत्र मुलींसाठीही सुरक्षित आहे. उशिरा बसून काम करावे लागते, थांबावे लागते परंतु तुमची संस्था चांगली असेल तर त्यांच्याकडून मुलींसाठी त्यांना सुखरूप घरापर्यंत पोहोचवण्याची सोयही केली जाते.

पण काम करण्याची तयारी आणि जिद्द हवी. कारण इथे ऑफिसमध्ये जाण्याची वेळ ठरलेली असते, मात्र परत येण्याची नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News