शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 26 July 2019
  • संवेदनशिल अधिकाऱ्यांच्या ऋणमुल संघटनेचा उपक्रम

यवतमाळ: ऋणमुल ट्रस्ट शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्यातील आजी- माजी वरिष्ठ सनदी अधिकारी व उद्योगक्षेत्रातील प्रमुख व्यक्तींच्या संकल्पनेतून अस्तित्वात आली.

माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड (ट्रस्टचे अध्यक्ष), निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, माजी मुंबई पोलीस आयुक्त अरुप पटनाईक, ठाणे पोलीस आयुक्त विवेक फंसळकर, मुंबई पोलीस स्पेशल आयजी कृष्ण प्रकाश, माजी कोंकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील, ग्रामीण-गृहनिर्माण संचालक धनंजय माळी, मराठी सिने-अभिनेत्री निशिगंधा वाड, मानस कृषी इंडस्ट्रीजचे संस्थापक व्यंकटेश कुलकर्णी अशी बरीच मंडळी या ट्रस्टच्या स्थापनेपासून सहभागी आहेत.

शेतकऱ्यांच्या विकासासाठी ट्रस्ट प्रामुख्याने तीन विषयावर कार्य करत आहे. यात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य, गटशेती, शेतीमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन, जलसंधारण आदी विषयावर काम करण्यात येत आहे.
 
बळीराजा प्रति आपले सामाजिक दायित्व ओळखून आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटूंबातील मुलांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत हातभार लावण्यासाठी यवतमाळ, अकोला, लातूर, उस्मानाबाद आणि परभणी या जिल्ह्यातील 1000 कुटूंबाना मदत करण्याचे ट्रस्टने ध्येय ठरवले आहे. देणगीदारांना या मुलांना त्यांच्या शैक्षणिक सहाय्य करण्यासाठी संस्थेने आवाहन केले आहे.

या उपक्रमामध्ये आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटूंबातील शिक्षण घेत असलेल्या मुलांना दरमहा रु. 2000 पर्यंतची रक्कम मुलांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील लोही या गावातील पायल दिगंबर डेरे या B.sc दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थिनीला तिच्या शिक्षणासाठी रु 2000 ची आर्थिक मदत करण्यात आली. पायलला M.sc करायचे आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील लक्ष्मी बलकी, प्रियंका मारकवार व साईनाथ बोरकर या तिघा विद्यार्थ्यांनाही ट्रस्टतर्फे प्रत्येकी रु 2,000/- चा चेक देण्यात आला.

ट्रस्टचे सचिव तथा संचालक ग्रामीण गृहनिर्माण धनंजय माळी, यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांच्या हस्ते मुलांना शिक्षणासाठी ट्रस्टतर्फे पहिला चेक देण्यात आला.

'वडिलांचे छत्र हरवलेल्या या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी सहाय्य करत असताना मुलाच्या आईला उपजीविकेचे साधन मिळवून देऊन कुटुंबाला आर्थिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे' असे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मत व्यक्त केले.

शेतकऱ्याकरवीचे आपले सामाजिक दायित्व लक्षात घेऊन या निराधार मुलांना मदत करण्यासाठी रत्नाकर गायकवाड यांनी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन समाजातील सर्व स्तरातील व क्षेत्रातील लोकांनी देणगीच्या स्वरूपात मदतीचा हात पुढे केल्याचे धनंजय माळी यांनी माहिती दिली.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News