सरण हाक मारतय

धनंजय पवार
Thursday, 31 January 2019

पेन हातात घेतली कि समाजाची विदारक स्थिती आपोआप कागदावर उमटते. असाच एका कर्जबाजारी शेतकर्यावर अधारीत "सरण हाक मारतय" नावाचा लेख लिहण्याचा
प्रामाणिक प्रयत्न केला. त्याचाच थोडा भाग....

"आर ऐ केरबा....केरबा...!
विचाराच्या तंद्रित अडकलेला केरबा थोडा दचकुणच गेला. आंग झडकत कोण हाक मारली म्हणुन ईकड- तिकड शोधु लागला. तेव्हा त्याला हातामधी फवारणीच औषध अन पाठीवर पिचकारी घेतलेला तुका पाटील नजरेस पडला. अन त्यान बी हाक्केला औ दिली..

"हं बोला की पाटील." "राम राम..." तुका पाटील हातवर करुन म्हणाला. तसा केरबा पण डोक्यावरली मळकट रुमाल झडकत बोला. "राम राम पाटील." "अर काय लेका कसला इचार करतुया, कव्हापास्न तुला हाका मारतोय, पर तु तुह्याच इचारात गुंग."

समोर पडलेल्या ओरबड दगडावर बसत केरबा बोला. "काय न्हव पाटील, जरा संसाराच गणीत जुळवत व्हतो." "कसलर गणीत ?" "ह्योच आपल रोच! डोळ आटली पर त्यो का बराबर नाय आला, हातात सोयाबीन काय पडल न्हाय अन वरतुन खटल या सालात पोरीच्या लग्नाची आण घालतय."
"आर बाका हाय की मग ! या सालात इंदिच हात पिवळ कर, वयातली पोर मांडव घरीच चांगली दिसतीया." तुका पाटील जरा आनंदातच बोला. केरबा मात्र खुप उदास वाटत होता. जनु काही त्याला तुका पाटलाचे शब्द काळजाला टोचल्यागत झाले. केरबाच्या या पडलेल्या चेहर्याकड बघत तुका पाटील म्हणाला. "काय र काय झाल." केरबा थोडा खिन्न स्वरातच बोला. "आव्ह ह्या जगात चोरीचा अन पोरीचा धंदा करणार्याला किंमत हाय, पर मेहनत करुण रानामधी राब राब राबुन या जगाच पोट भरणार्या तुम्हा आम्हा शेतकर्याला किंमत न्हाय, आपलच बघा की रातचा दिस करुन अनवाणी पाय या काळ्या ढेकळात झिजवुन तरी आपल्या पदरात काय तरी हाय काय?, अन जर थोडपार काय आल की ह्यो निसर्ग तरी आय घालतो नायतर मग बाजार भाव." केरबाच्या तरळलेल्या डोळ्यात बघत दबक्या आवाजातच तुका पाटलान त्याच्या सुरात सुर मिसळला.

"होय र बाबा तुझ बि समद खर हाय, त्यो न्हाय का कुरुंदवाडीचा हामजा त्यो पहिला आपल्याच गावात येत व्हता सायकलवर गव्हा- सोयाबिनच मात्र घ्यायला, पर जसा चंदन तस्करीत लागला तस त्याच नसिबच पलटल बघ. अन त्यो फाट्यावरचा बंड्या त्यान तर कलाकेंद्र सुर केल म्हण, पोर्या-बाया नंग्या नाचवतोय अन बकळ पैका कमवतोय, पर लेका गावातली समदी नया जोमातली पोर त्यान बिघडीवली."

केरबा पण थोडा आवेशानच म्हणाला. "म्हणुन तर म्हणतोय पाटील... बुट पालीस,  केस मालीस सोडा येळ पडली तर चोर्या करा न्हायतर बंड्या व्हानी पोर्या धरा पर ह्या शेतीबितीत नग." टोकाला गेलेला विषय पालटत तुका पाटलान केरबाला विचारल. "बर ते जावुदे समद, सोयाबिन किती झाल." "झाल लोकाच उस्न-पास्न फेडाय पुरत पर बॅंक अन त्यो अनाधिकृत सावकार हाय की उरावर." थोडा मिश्किल चेहरा करतच केरबा बोला. "काय र बाबा अजुन सनी गेली न्हाय वाटत सावकाराची? पहिल तुझ्या बान थेरडीच्या दुखन्या खातर दिल नावच करुन त्याला आता र्हायला त्यो बी तुकडा घेतो की काय हा सावकार." केरबा खिन्न स्वरातच बोलाय लागला. "आहो या सावकारी पाई बायकोन अंगावर फुटक्का मनी ठेवला नाय, पर ह्यो काय कर्ज फिटत नाय बघा."

"जाऊ दे र बाबा ह्यो सावकारी कर्ज म्हणजे गळती घागर हाय, यात किती बि ओता याचा काय घडा भरणार नाय, कर्जावर कर्ज, कर्जावर कर्ज लावितच राहतो. अन शेवटी सोन्याचा तुकडा गिळतोच गिळतो, आर या कर्जा पाई कितीतर जनान जिवनयात्रा संपिवली बघ." तुका पाटलाच बोलन सरते न सरते तोच केरबा ताड दिशी उठतो अन एक टक फुकुन देलेल्या बोरीच्या काट्याकड बघत उर भरुन आलेल्या कंठान म्हणतो. "पाटील मला बी कवा कवा असच वाटत समद काहि जिवंतपणी काव काव करणार्या सावकाराच्या नावच कराव अन खुशाल एकदाच पावला पावलावर साद घालणार सरण गाठाव."

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News