सोशलात अडकलेली टाळकी आणि दमलेले घरचे, तुमच्याही घरी असंच आहे का?
फोन ठेव आणि पुस्तक घे....
बास कर आता ते गेम खेळणे....!
बंद कर ते यू-ट्यूब....!
फोन ठेव आणि पुस्तक घे....
बास कर आता ते गेम खेळणे....!
बंद कर ते यू-ट्यूब....!
फोनला हात लावू नकोस....!
फोन बाजूला ठेव आणि जेव आता....!
तुमच्या आमच्या घरात मुलांशी संवाद हल्ली याच त्रासिक वाक्याने सुरू होतात व त्याचे पर्यावसन रागात व आदळ-आपट करण्यात आणि भांडणात होते, तरीही प्रश्न काही सुटत नाहीत. मुलांना लागलेले मोबाईलचे व्यसन हे आजच्या आई-वडीलांसमोरचा यक्ष प्रश्न आहे.
आपल्या घरातील जन्मलेल्या बाळापासून ते शाळा-कॉलेजच्या पाल्यांपर्यंत हे व्यसन तितकेच गंभीर बनले आहे. यात लहान मुलांच्यामध्ये प्रचंड आकर्षण आहे. मग ते गेम खेळण्याविषय असो, फोटो पाहण्याविषयी असो, गाणी, व्हिडिओ पाहण्याविषयी असो, वा काही मनोरंजनात्मक अॅपविषयी असो...
आपल्या घरातल्या टीन वयामधील मुला-मुलींना सकाळी आंथरूणातून उठल्यापासून ते पु्न्हा झोपेपर्यंत हा स्मार्टफोन लागतोच. झोपेतून उठल्यावर मुड ठीक करण्यासाठी, जेवण करताना, दुपारी गेम खेळायला, काही खाताना मोबाईल शेजारी हवाच असतो. शेवटी झोप यावी म्हणूनही मोबाईल उशाशी हवाच असतो.
मुले लहान असताना त्यावेळी पालक म्हणून आई-वडिलांना त्यांचे फार कौतुक वाटते. त्यांचं फोन वापरणे, फोटो पाहणे, गाणी, व्हिडिओ चालू करणे, पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक सहज लक्षात ठेवून काढणे ही आपल्या पाल्याची बुद्धिमत्ता प्रत्येक आई-वडिलांसाठी काहीकाळ अभिमानाची गोष्ट ठरते;
पण जस-जसे आपल्या मुलांना मोबाईलची सवय पडून त्याचे व्यसन लागते, तशी तशी पालक म्हणून अभिमानाची वाटणारी बाबदेखील आता डोकेदुखी ठरू लागते व काळजीचा विषय बनते. मग आपल्यातील सुज्ञ पालक जागा होतो. त्यांना मोबाईलचे दुष्परिणाम दिसू लागतात. मग पालक म्हणून आपण बैचेन होतो.
मोबाईलचे प्रमाण कमी करायला हवे याचा विचार करतो. एकमेकांना दोष देतो. तुझ्या लाडामुळे झाले म्हणून एकमेकांकडे बोट दाखवतो. आपण झटक्यात मोबाइल बंद करतो; पण ते तितके सोपे रहात नाही. मुले हट्ट करतात, चिडचिड करतात, रडतात, आदळा-आपट करतात, रुसतात, जेवत नाहीत, मग आपण पुन्हा प्रेमापोटी माघार घेतो.
कमी-जास्त प्रमाणात हर घर की यही कहानी है।
आपल्या घरातील ही मुले हल्ली या फोन समोरून उठतच नाहीत. त्यांना प्रत्येक गोष्टीत फोन हवा असतो. अगदी घरातील खेळण्यांनाही मुले हात लावत नाहीत. मोबाईल हे एक खेळणे हातात असते व बाकीच्या खेळण्यांना अडगळीची जागा दाखवलेली असते. 10-15 वर्षांपूर्वी लहान मुलं इतकी खेळायची की आई-वडिलांना त्यांना घरात ओढून घेऊन जावे लागत होते. पण आता मुले बाहेरच पडत नाही. ही मोबाईलची ओढ असली तरीही यात पालकांची भूमिका महत्त्वाची आहे.
21 व्या शतकात...
21 व्या शतकात आपल्याबरोबर फोन पण स्मार्ट झाला व बोलण्याबरोबर फोनचे अनेक उपयोग समोर आले. त्यामुळे आपल्याला त्याचा मोह झाला व गरजही बनली. घरात पालकांचाही फोनचा वापर खूप वाढला आहे. आपल्या पाल्यांच्या समोर आपण मोबाईल, सोशल मीडिया यासाठी आपण बर्याच वेळ देतो. नकळत आपल्या पाल्यांनाही त्याचे आकर्षण वाढते. पालकांच्या बरोबर घरातील इतर ही व्यक्ती मोबाईलला अधिक महत्त्व देतात. शिवाय मोबाईलचे स्वतःचे खिळवून ठेवणारे गुण आहेतच. त्यामुळे मुले सहज आकर्षित होतात.
याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो हे संशोधन सांगते.
पालक म्हणून आपण काही बंधने पाळणे गरजेचे आहे. बर्याच वेळा मुले फार त्रास देतात म्हणून त्यांना शांत करण्यासाठी त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. कधी घरात फोनची संख्या जास्त असेल तर मुलांना फोन उपलब्ध होतात. घरात असताना आपल्या फोनची इंटरनेट सेवा बंद ठेवायला हवी. मुलांना घडवणे ही फक्त आईची जबाबदारी नसून दोघांची आहे, हे पाळणे तितकेच गरजेचे आहे. मुलांना वेळ द्यायला हवा. आपले पाल्य आपला अंश असतात. वस्तू खरेदी करताना शंभर वेळा चौकशी करणारे आपण पाल्याच्या बाबतीत तितकेच चौकस असणे गरजेचे आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्ही आपल्या पाल्याला आपला वेळ देत असास तर आणि तरच त्यांच्यावर सवार असलेलं सोशल मिडीया आणि त्याआधी मोबाईलचं भूत उतरू शकेल.