कृषीनगरातील निखिलने उघडली यूपीएससीची कवाडे

विवेक मेतकर
Wednesday, 7 August 2019
  • सीएपीएफच्या असिस्टंट कमांडंटपदी मिळाली नियुक्ती

अकोला: यूपीएससी ही सातत्याची व संयमाची परीक्षा आहे. आपण कोणत्या माध्यमातून शिक्षण घेतले आहे. पार्श्वभूमी ग्रामीण की शहरी या बाबी अत्यंत गौण आहेत. अभ्यास आणि सकारात्मक दृष्टिकोनातून या परीक्षेत निश्चितच यश प्राप्त करता येवू शकते. हे शहरातील कृषीनगरातील निखिल वानखडे याने सिध्द केलं.नुकत्याच लागलेल्या निकालात त्याने सीएपीएफचे असिस्टंट कमांडंटपद मिळविलं आहे. 

शहरातील कृषीनगर परिसरात राहणाऱ्या निखिल वानखडे या तरूणाने आपल्या कष्टाच्या जोरावर युपीएससीसारख्या कठीण परीक्षेत असामान्य यश प्राप्त केले आहे. सीएपीएफच्या असिस्टंट कमांडंटपदी त्याला नियुक्ती मिळाली आहे. निखीलचे वडील सेवानिवृत्त सहा. पोलीस निरीक्षक आहेत तर आई मंगला वानखडे अकोला मनपाच्या प्राथमिक शाळेमध्ये सहाय्यक शिक्षीका आहेत. एका गरीब कुटुंबातील निखीलने युपीएससीमध्ये आपले नावलौकीक करुन समाजासमोर फार मोठा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्याचा समाजातील इतर तरुणांनीही आदर्श घेवून त्या मार्गावर वाटचाल करावी अशी मनिषा निखीलने बोलतांना व्यक्त केली. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय वडील अजाबराव वानखडे व आई सौ. मंगला वानखडे, मामा पो.कॉ. विजय इंगळे यांना देतात. 

असा होता शिक्षण प्रवास 
२०१४ पासून स्पर्धा परीक्षेमध्ये आपले करिअर शोधणाऱ्या निखिलने खऱ्या अभ्यासाला सुरुवात केली ती २०१६ पासून. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण गुरुनानक शाळेत झाले. शालेय जीवनात त्याने प्रत्येक स्पर्धा परीक्षेत सहभाग तर नोंदविलाच. तसेच त्याने प्रत्येक परीक्षेत पहिला क्रमांक कधी चुकू दिला नाही. दहावीनंतर श्री शिवाजी महाविद्यालयात त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुक्त विद्यापीठातून २०१३ साली पदवी प्राप्त केली. 

आईचा विश्वास आणि वडीलांचा संयम 
शालेय जीवनात आई आणि मामा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तो बघायचा. त्यांच्यातील प्रश्नोत्तरांमुळे जिज्ञासा वाढत गेली आणि आपणही स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असं मनाशी ठरविलं. सुरुवातीचे दोन वर्ष स्पर्धा परीक्षांच गांभीर्य लक्षात आले नाही. वारंवार अपयश येत होतं. मात्र, आईने दाखविलेला विश्वास आणि वडीलांच्या संयमामूळेच त्याला या यशाला गवसणी घालता आली असल्याचे तो म्हणतो. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्याचे प्रेरणास्थान असल्याचे तो सांगतो. सध्या तो आयएएसचा अभ्यास करित आहे. तीन ते चार वर्षांपासून दिल्लीला तो अभ्यास करत होता. तर त्याचा आजही अभ्यास सुरू असल्याचे तो सांगतो. 

अजून बरंच काही करायचं आहे 
यूपीएससी मार्फत जशी प्रशासकीय सेवांसाठी परीक्षा घेण्यात येते त्याचप्रमाणे सेंट्रल आर्म पोलिस फोर्स ही परीक्षासुध्दा यूपीएससी मार्फत घेण्यात येते. सीएपीएफचे असिस्टंट कमांडंटपद हे डीवायएसपी पदाशी समांतर आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशन या शासकीय सेवेत असताना परिश्रमाच्या जोरावर त्याने हे यश प्राप्त केले आहे. मात्र, त्याचा प्रशासकीय सेवेचा अभ्यास आजही सुरू आहे.  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News