नवा अभ्यासक्रम लागू; उद्‌बोधनाचा विसर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 5 August 2019
  • शिक्षण मंडळाचा हलगर्जीपणा; प्रशिक्षण न मिळाल्याने राज्यातील शिक्षकांची चिंता वाढली

नागपूर - राज्य सरकारने यावर्षीपासून अकरावीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखांच्या अभ्यासक्रमात बदल केला. अभ्यासक्रम बदलल्यानंतर शिक्षण मंडळाच्या वतीने शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी उद्‌बोधनवर्ग लावले जातात. विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होऊन महिना लोटला तरी उद्‌बोधन वर्गाचे आयोजन करण्यात मंडळाची अनास्था दिसून येत आहे. प्रशिक्षण न मिळाल्याने शिकवायचे काय, असा प्रश्‍न शिक्षकांसमोर पडला आहे.

शिक्षणाला पारंपरिक चाकोरीतून बाहेर काढून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता व अभिव्यक्ती ही कौशल्ये अभिप्रेत आहेत. यात शिक्षकांची भूमिका ‘फॅसिलेटर’ व ‘मेंटॉर’ची राहणार आहे. मागील वर्षीपासून प्रश्‍नपत्रिकेच्या आराखड्यात बदल केला. नवीन अभ्यासक्रम हा कृतिपत्रिकेवर आधारित आहे. 
नवीन पुस्तके व पाठ्यक्रम हा विद्यार्थी केंद्रित असून, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अभिप्रेत आहे.

आधुनिक स्पर्धेच्या युगात राज्यातील विद्यार्थ्यांच्या टिकाव लागला पाहिजे व स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी म्हणूनच या नवीन अभ्यासक्रमाकडे बघितले जात आहे. यासाठी शिक्षकसुद्धा ‘अपडेट’ असणे आवश्‍यक आहे.

एक महिना लोटला असून, शिक्षक जुन्याच पारंपरिक पद्धतीने शिकवीत आहेत. नवीन पाठ्यक्रम कसे शिकवावे या दोलायमान स्थितीत राज्याचा शिक्षक आहे. अभ्यासक्रमाच्या अध्यापनासाठी प्रशिक्षण कधी होणार याकडे चातक नजरेने वाट बघत आहे. 

शिक्षक भारतीने दिले होते निवेदन
अकरावीच्या शिक्षकांना नव्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी महिनाभरापूर्वीच शिक्षक भारतीचे विभागीय कार्यवाह प्रा. सपन नेहरोत्रा यांनी पदाधिकाऱ्यांसह शिक्षण मंडळाला निवेदन सादर केले होते. मात्र, निवेदनाकडेही मंडळाने दुर्लक्ष केल्याचे समजते. त्यामुळे अजूनही प्रशिक्षणास सुरुवात झाल्याचे दिसत नाही.

शिकवायचे काय?
मागील वर्षी दहावीच्या अभ्यासक्रमात बदल केल्यानंतर शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. यावर्षी अकरावीच्या अभ्यासक्रमात बदल केल्यावर उन्हाळ्यातच प्रशिक्षण व उद्‌बोधन वर्ग घेणे गरजेचे होते. अकरावीची प्रवेश फेरी आता अंतिम टप्प्यात आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांचे नियमित वर्गही सुरू झाले आहेत. मात्र, प्रशिक्षण न झाल्याने नव्या अभ्यासक्रमात शिकवायचे काय? हे शिक्षकांना कळायला मार्ग नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News