ऐन वेळी परीक्षा रद्द!; कला संचालनालयाचा भोंगळ कारभार
- विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांनाही मनस्ताप, नियोजन कोलमडले, प्रश्नपत्रिकांचा घोळ कायम
अकोला: विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे रेखाचित्रकला परीक्षा आयोजित करण्यात येते. याअंतर्गत एलीमेटरी व इंटरमिजिएट परीक्षा गुरुवारपासून (ता.२६ सप्टेंबर) आयोजित करण्यात आली होती. मात्र, ऐन वेळी ही परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांनाही मनस्ताप होत आहे. या परीक्षेसाठी गतवर्षी एकूण सहा लाख ७१ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नावे नोंदवली होती. त्यापैकी एलिमेंटरी परीक्षेस तीन लाख ९६ हजार ९४९ विद्यार्थी तर इंटरमिजिएट परीक्षेस दोन लाख ७४ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी नावे नोंदवली होती.
हे विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत असताना ऐनवेळी काही तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे सर्वांचेच नियोजन बिघडले असून, त्याचा नाहक मनस्ताप विद्यार्थी व पालकांसह शिक्षकांनाही होत आहे. या परीक्षेसाठी शालेय क्रीडा स्पर्धा आणि विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांचे नियोजन बदलावे लागले होते. ते नियोजनही कोलमडले असून, सर्वांना आता नव्याने नियोजन करावे लागणार आहे. शहरातून साडेपाच हजार विद्यार्थी अकोला शहरात या परीक्षेसाठी सात केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर सरासरी आठशे विद्यार्थी ही परीक्षा देतात. फक्त अकोला शहरातूनच किमान साडेपाच हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
कला संचालनालयाकडे प्रश्नपत्रिकाच नाहीत कला संचालनालयाने विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रश्नपत्रिकांची छपाई केली नाही. नोंदणी केलेल्या विद्यार्थी संख्येनुसार कला शिक्षक किंवा केंद्र प्रमुखाकडून कला संचालनालयाला डीडीसुध्दा पाठविण्यात आला. मात्र, विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रश्नपत्रिका तयार नसल्याची चर्चा कलाशिक्षकांमध्ये आहे. प्रश्नपत्रिकांचे संचही जाणार परत एलीमेटरी व इंटरमिजिएट परीक्षेकरिता जिल्ह्यातून हजारो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यानुसार परीक्षेचे प्रश्नसंच दोन दिवसांपूर्वीच शिक्षकांनी अमरावती येथील चित्रकला महाविद्यालयातून आणले होते.
तेही पुरेशा संख्येत नव्हते. आता परीक्षा पुढे ढकलल्यामुळे दोन दिवसात हे संचही परत करावे लागणार आहेत. पेपर फुटल्याची चर्चा एलीमेटरी व इंटरमिजिएट परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका अपुऱ्या असल्याने या प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढण्याची वेळ आली होती. झेरॉक्स काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान या प्रश्नपत्रिका परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेसह परीक्षा बाह्य व्यक्तींपर्यंतही पोहोचल्या. त्यामुळे पेपरसंचाच्या गोपनियतेबाबत साशंकता व्यक्त होत असून, पेपर फुटल्याची चर्चाही सुरू आहे. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
महाराष्ट्र राज्य कला संचालनाद्वारे एलीमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा अर्थात रेखाकला परीक्षा घेतल्या जातात. दहावीच्या निकालात या परीक्षांच्या गुणांचा सामावेश असल्याने विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. मात्र, ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे तारांबळ उडाली आहे.
- संजय आगाशे, अध्यक्ष अकोला जिल्हा कलाध्यापक संघ तथा केंद्र प्रमुख मुंगीलाल बाजोरीया विद्यालय, अकोला.