..आणि अखेरीस गोव्यातील काँग्रेसला सुरुंग लागला !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 12 July 2019
  • गोव्यातील काँग्रेसचे आमदार भाजपवासी
  • दिल्लीत नड्डा यांनी केले स्वागत

 

नवी दिल्ली : गोव्यात काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या दहा आमदारांनी नवी दिल्लीत भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला. चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली या दहा जणांना घेऊन दिल्लीत आलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुपारी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. संसद भवनात झालेल्या अर्धा तासाच्या भेटीनंतर डॉ. सावंत यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या प्रस्तावित विस्ताराबाबत लवकरच अंतिम निर्णय घेऊ, असे पत्रकारांना सांगितले.

भाजप सूत्रांच्या माहितीनुसार, गोव्यात दहा फुटीर आमदारांचा गट सामील झाल्यावर भाजपचे संख्याबळ २७ पर्यंत वाढले आहे. कवळेकर यांच्यासह आतांसिओ मोन्सेरात, इजिदोर फर्नांडिस, अंतोनिओ फर्नांडिस, नीळकंठ हळर्णकर, जेनिफर मोन्सेरात, एलोवेरा फिलिप्स रॉड्रिग्स, क्‍लाफसियो डायस, विफ्रेंड डीसा हे दहा आमदार भाजपमध्ये दाखल झाले. काँग्रेसमधील फुटीर आमदारांना काही मंत्रिपदे देणे क्रमप्राप्त आहे, त्याचप्रमाणे राज्यात उपमुख्यमंत्रिपद निर्माण केले जाईल, अशीही माहिती भाजप सूत्रांकडून समजली.

डॉ. सावंत यांनी दुपारी शहा यांच्याशी घडामोडींबद्दल सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर ते संसद भवनातून बाहेर पडले. दुपारी चारच्या सुमारास सर्व काँग्रेस आमदारांना घेऊन भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात पोचले. तेथे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुलाबाचे फूल आणि भाजपचे उपरणे देऊन या सर्वांच्या भाजपवासी होण्यावर शिक्कामोर्तब केले.

काँग्रेसने घर सांभाळावे!
गोवा किंवा कर्नाटकमध्ये घडणाऱ्या घडामोडींमध्ये भाजपची काहीही भूमिका नसल्याचा पुनरुच्चार पक्षाने आज केला. पक्ष नेते व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसने घर सांभाळावे, असा सल्ला दिला. आपले विविध राज्यांतील आमदार अस्वस्थ आणि अतृप्त का आहेत, ते राजीनामा देण्याची घाई का करत आहेत, राजीनामा देण्याची सुरवात कोणी केली या प्रश्नांची उत्तरे काँग्रेसने स्वपक्षातच शोधावीत; त्यासाठी भाजपला दोष देऊ नये, 
असे जावडेकर म्हणाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News