एकदिवसीय क्रिकेटकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी ह्या खेळाडूने घेतली कसोटीतून निवृत्ती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 July 2019

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज महंमद अमीरने २७व्या वर्षीच कसोटी क्रिकेटचा निरोप घेतला आहे. अमीर ३६ कसोटी खेळला आहे.

लाहोर : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज महंमद अमीरने २७व्या वर्षीच कसोटी क्रिकेटचा निरोप घेतला आहे.  मात्र, तो एकदिवसीय आणि टी- २० साठी उपलब्ध असेल. 

मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे अमीरने सांगितले. अमीर ३६ कसोटी खेळला आहे. अमीर म्हणाला, ‘‘पाकिस्तानकडून कसोटी खेळणे, हा माझा सन्मानच होता. मात्र, आता मला मर्यादित षटकांच्या क्रिकेटकडे अधिक लक्ष द्यायचे आहे. या क्रिकेटमध्ये पाकसाठी सर्वस्व पणास लावेन.’’

निवृत्तीचा निर्णय सोपा नसल्याचे अमीरने सांगितले. तो म्हणाला, ‘‘फार कसोटी खेळलो नसताना हा निर्णय सोपा नव्हता. हा निर्णय विचारपूर्वक घेतला. कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धा सुरू होत आहे. निवड समिती नव्या खेळाडूंच्या शोधात आहेत. पाककडे चांगले युवा गोलंदाज आहेत. त्यांना संधी मिळण्यासाठी हा निर्णय घेतला. या निर्णयाने निवड समितीचे कामही सोपे होईल.’’

कसोटी कारकिर्दीला सुरवात होत नाही तोच अमीर स्पॉट फिक्‍सिंगमध्ये अडकला होता. या प्रकरणी त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली. ती उठल्यानंतर त्याने पाकिस्तान संघात पुनरागमन केले होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News