दिव्यांची अमावास्या

शिल्पा देवळेकर
Thursday, 1 August 2019
  • प्रत्येक दिव्याची ज्योत उजळली, समईच्या पंचारती उजळल्या, त्या दिव्यांच्या तेजाने सगळं कसं अगदी तेजोमय झालं होतं.

ऑफिसमधून आज लवकर घरी आली. कारण आज दिव्यांची अमावास्या. घरी आल्यावर पटापट आवरून तिने पूजेची तयारी केली. कपाटात चार चांदीची निरंजन होती, ती काढली, दोन समया, निरंजन स्वच्छ घासली. कणकेचे दिवे बनवले. देव्हाऱ्यासमोर छान रांगोळी काढली, पाट ठेवला, पाटाभोवती रांगोळी काढली. दोन बाजूला दोन समया ठेवून मध्ये सगळे दिवे ठेवले.

समोर छोट्या ताटात कणकेचे दिवे ठेवले. प्रत्येक दिव्याची ज्योत उजळली, समईच्या पंचारती उजळल्या, त्या दिव्यांच्या तेजाने सगळं कसं अगदी तेजोमय झालं होतं. पूजा झाल्यावर ते दृश्य अगदी सुरेख, अप्रतिम, विहंगम दिसत होतं. आणि त्या प्रत्येक दिव्यांच्या ज्योतीमध्ये 'त्याच्या' प्रेमाचं कोंदण तिने जडावासारखं पैलू पाडून खोवलं होत. आज त्या ज्योतीत तिला 'तो' दिसत होता.

तिच्या आयुष्यात असुनही नसलेला 'तो', त्या तेजोमय वर्तुळात तिला गवसलेला. त्या प्रकाशात ती त्याला डोळ्यात साठवत होती. अबोल शब्दांनी बोलत त्याला मनात फुलवत होती. त्या तेजामध्ये तिच्या प्रेमाच्या छटा तिने त्याच्यावर मनसोक्त उधळल्या होत्या, त्या दिव्यांच्या तेजात तो देखील अतिशय हळुवारपणे प्रेमभरल्या आनंदाची बरसात तिच्यावर करत होता.

जणू त्या दोघांच्या नेत्रभेटीसाठी आज दिव्यांनीच हा समारंभ सजवला होता. आणि म्हणूनच दूर असूनही हृदयाच्या स्पंदनात असलेला तिचा 'तो'आज दिव्यांच्या अमावस्येच्या रात्री पौर्णिमेचा पूर्णचंद्र होऊन  तिला डोळे भरून पहात होता. दिव्या दिव्यांमधून तेजाची बरसात करत होता. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News