अमरनाथच्या गुहेतून...(भाग 3)

धर्मभूषण अ‍ॅड. दिलीप ठाकूर 
Saturday, 29 June 2019

रद्द केलेल्या तिकिटाची नुकसान भरपाई म्हणून पंचवीस हजाराचा भुर्दंड बसला. पण इतक्या मोठया यात्रेचे नियोजन करताना अशा गोष्टी घडणार म्हणून अगोदरच मनाची तयारी करुन ठेवलेली होती.

ज्या दिवसाची गेल्या अनेक महिन्यापासून वाट पाहत होतो, तो दिवस आज उजाडला. आज आम्हाला अमरनाथ यात्रेला जायचे असल्यामुळे सकाळी तीन ला जाग आली. शांत वातावरणात स्तब्ध बसून तयारी व्यवस्थित झाली की नाही याची खात्री केली. काल प्राचार्य नारायण शिंदे सर, दिनेशसिंह ठाकूर, प्रल्हाद बन्सा, प्रवीण मुथा, यांच्यासोबत सर्व  रेल्वे तिकीट बरोबर आहेत की नाही तसेच यात्रा पर्ची सर्वांची सोबत घेतली की नाही याची काळजीपूर्वक खातरजमा करुन घेतली. ज्या यात्रेकरूंचे प्रतीक्षा यादीत नाव होते  अद्याप तिकिट कन्फर्म झाले नव्हते अशा सतरा जणांची तात्काळ तिकिटे काढली. ज्यादा झालेली तिकिटे रद्द केली.

रद्द केलेल्या तिकिटाची नुकसान भरपाई म्हणून पंचवीस हजाराचा भुर्दंड बसला. पण इतक्या मोठया यात्रेचे नियोजन करताना अशा गोष्टी घडणार म्हणून अगोदरच मनाची तयारी करुन ठेवलेली होती. नियोजनबध्द तयारी करुन देखील रात्री साडेआठला जेव्हा रेल्वे चा चार्ट तयार झाला त्यावेळी चार एसी तिकीट असलेल्या यात्रेकरूंचे तिकीट कन्फर्म न झाल्यामुळे टीटीला झेलावे लागणार अशी मनाची  तयारी केली.

सगळ्यांना सांगितले होते की, दहा किलो पेक्षा जास्त सामान असता कामा नये, पण माझेच चार डाग झाले होते. म्हणतात ना "लोका सांगे ब्रह्मज्ञान पण आपण कोरडे पाषाण". पण इलाज नव्हता कारण जे जे लोक आमची यात्रेत जेवणाची, नाश्त्याची व इतर व्यवस्था करणार होते त्यांचा सत्कार करण्यासाठी ट्रॉफी, शिरोपाव, गुरुद्वाराचा प्रसाद सोबत घेतल्यामुळे वजन वाढले होते. सर्वांची यात्रा पर्ची,  टिकीटे, जागोजागी लावायचे अमरनाथ यात्री संघाचे स्टिकर, अमरनाथच्या गुहेजवळ लावण्या साठी मोदीजी,खा.चिखलीकर व माझा फोटो असलेले आणि भाजपा नांदेड जिल्ह्यातर्फे यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत असा मजकूर असलेले दोन मोठे बॅनर सोबत घेतल्यामुळे  एक डाग वाढला होता. यात्रेला येणाऱ्यापैकी फक्त अमरनाथ यात्री संघ, नांदेडचेच नर तेथे लावल्या जातात याचा सार्थ अभिमान माझ्या सोबत सर्व यात्रेकरूंना वा नांदेडकराना असतो.

अमरनाथ यात्रेला जे सामान नेणे आवश्यक आहे त्याची यादी आम्ही सर्व यात्रेकरूंना पूर्वीच  दिलेली असते. त्यामध्ये पाच ड्रेस, महिलांसाठी किमान एक पंजाबी ड्रेस, शाल, टॉवेल, हवेची उशी, काश्मीर मध्ये जास्त थंडी असल्यामुळे थर्मलवेअर, स्वेटर, हातमोजे, पाय मोजे , बूट, नॅपकिन टुट ब्रश, पेस्ट, अंगाचे व कपड्याचे साबण, कोल्ड क्रीम, कंगवा, बॅटरी व्हील  असलेली सुटकेस अथवा हँडबॅग, पाठीवरची बॅग, कुलूप व साखळी, औषधी, ओरिजनल आधारकार्ड, प्लॅस्टिक बंदी असल्यामुळे स्टीलचे ताट  व चमचा या बारीक-बारीक बाबींचा उल्लेख केलेला आहे. माझी सुटकेस सौ. जयश्री नेहमी व्यवस्थित भरत असल्यामुळे मला काळजी नव्हती. 

सकाळी साडेपाचला विधी आटोपून  देवपूजा केली. सध्या क्रिकेट विश्‍वचषकाचे सामने सुरू आहेत. भारताचा प्रत्येक सामना मी पाहत असतो, पण यात्रे दरम्यान ते   शक्य नसल्यामुळे भारताने सर्व सामने  जिंकावे  अशी देवाजवळ प्रार्थना केली. अमरनाथ, वैष्णोदेवीचे दर्शन करत असताना मराठवाड्यातील दुष्काळाचे सावट दूर व्हावे तसेच भारताने क्रिकेटचा विश्वचषक जिंकावा तसेच  मोदीजीँना दीर्घायुष्य लाभावे यासाठी साकडे घालण्याचा निश्चय केला. आज आम्हा भारतीयांच्या मनात या तिन्ही गोष्टीबद्दल आदर, प्रेम आहे. दुष्काळाबाबत प्रेम नाही पण त्याचे सावट आमच्या वर येऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.

बाहेरगावाहून जे यात्रेकरू आमच्यामध्ये सामील होणार होते, ते आलेत की नाही याची खात्री करून घेतली. या वर्षी आमच्या सोबत नांदेडच्या यात्रेकरूंसोबतच हैदराबाद, पुणे, संभाजीनगर, उदगीर ,जालना, महबूबनगर, आदिलाबाद, वसमत, परभणी येथील यात्रेकरू सहभागी झाले आहेत. गेल्या 17 वर्षांत माझ्यासोबत आलेल्या शेकडो यात्रेकरू पैकी एकहीजन नाराज झाला नसल्यामुळे त्यांनी केलेल्या माऊथ पब्लिसिटीने दूरदूरचे यात्रेकरू आमच्या सोबत येतात. त्यातील बहुतेकजण सीनियर सिटीजन आहेत. सर्वांची वैयक्तिक काळजी घेत असल्यामुळे यात्रेकरुंचा विश्वास संपादन केलेला असल्यामुळेच इतक्या दुर दुरचे लोक आमच्या सोबत यात्रेला येत असतात. लोकांच्या मनात असलेला हा विश्वास कायम रहावा म्हणून मी प्रयत्नशील असतो.

सहा वाजता सर्व यात्रेकरूंना मेसेज करुन उठण्याच्या सूचना दिल्या. हैदराबाद येथून रात्री साडेतीनला आलेल्या कॅप रेल्वे स्टेशन वर वाटप  करताना गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे रेल्वेतच वाटप करण्याचा निर्णय घेतला. बरोबर नऊ वाजता वडिलांचा आशीर्वाद घेऊन आमच्या गल्लीतील सोन्या मारुती मंदिर व स्वामी समर्थ मंदिराचे दर्शन घेऊन रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी निघालो...(क्रमश:)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News