शरद पवार यांच्या मोठेपणासाठी नेहमीच उद्गारचिन्ह

मधुकर भावे
Friday, 2 August 2019

२७ व्या वर्षी आमदार, ३१ व्या वर्षी कॅबिनेट मंत्री, ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री, ५१ व्या वर्षी संरक्षण मंत्री, असा नेता देशात कोण?

महाराष्ट्रातल्या आजच्या सर्वोच्च नेत्याला, राष्ट्रीय पातळीवरचा, भारतरत्नच्या खालोखालचा एवढा मोठा सन्मान होतो आहे आणि त्याबद्दल अभिनंदन करण्याऐवजी ‘पुरस्कार मिळणे योग्य आहे की नाही’ असली दळभद्री चर्चा आजच्या वाहिन्या करू शकतात.

 ‘एबीपी माझा’मधून फोन आला. विचारणा झाली. ‘बुधवारी रात्री ९ ते १० या वेळात चर्चेला येता का?’ मी प्रश्न विचारला, ‘चर्चेचा विषय काय?’ एबीपी माझाकडून सांगण्यात आले की, ‘शरद पवार यांना पद्मविभूषण देणे योग्य आहे का?’ एबीपी माझाचा प्रश्न ऐकूनच संताप आला. महाराष्ट्रातल्या आजच्या सर्वोच्च नेत्याला, राष्ट्रीय पातळीवरचा, भारतरत्नच्या खालोखालचा एवढा मोठा सन्मान होतो आहे आणि त्याबद्दल अभिनंदन करण्याऐवजी ‘पुरस्कार मिळणे योग्य आहे की नाही’ असली दळभद्री चर्चा आजच्या वाहिन्या करू शकतात. वैचारिकदृष्ट्या हे या वाहिन्यांचे दिवाळखोरीचे लक्षण मानले पाहिजे. 

आजचा सोशल मीडिया ज्या वेगाने अत्यंत बेजबाबदार होत आहे, त्याचेच हे जिवंत उदाहरण आहे. एबीपी माझाला सांगितले की, ‘असल्या चर्चेत मी येणार नाही.’ अनेक वाहिन्यांवाले प्रत्येक दिवशी अशा नकारात्मक चर्चेची गु-हाळे लावून स्वत:ला हास्यास्पद बनवत आहेत, याचे भान त्यांना राहिले नाही. 

एबीपीवर जाण्यास स्पष्ट नकार दिला. शरद पवार या व्यक्तिमत्त्वाला उणेपणा देण्यासाठीच या कार्यक्रमाचे जणू आयोजन झाले असावे. आपल्या महाराष्ट्रात मुळात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी अशी सामाजिक नेतृत्वाची माणसं शिल्लक राहिली आहेत. त्यात शरद पवार हे सर्वात उंचावर आहेत. त्यांचा सामाजिक अधिकार आणि त्यांचा राजकीय अधिकार हा सर्वमान्य आहे. 

एखाद्या पक्षाला, एखाद्या समुदायाला, एखाद्या गटाला किंवा एखाद्या व्यक्तीला, ‘तू किंवा तुम्ही असे वागवू नका,’ असं सांगण्याचा अधिकार असलेले महाराष्ट्रात आज किती व्यक्ती आहेत? आणि अशा ज्या व्यक्ती आहेत, त्यांचं ऐकले जाईल असे किती आहेत? शरद पवार त्यातले एकमेव आहेत. त्यामुळे शरद पवार यांना पद्मविभूषण द्यावे की देऊ नये या संबंधात गेली ४८ तास सोशल मीडियाने जो धिंगाणा घातला आणि आपण म्हणजे सोशल मीडिया किती कद्रु मनाचे आहोत, याचे त्यांनी प्रदर्शन मांडले होते. 

चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत नसलेली माणसं आज अशी सर्वत्र दिसतात. आणि सार्वजनिक जीवनाचा पचका करून टाकतात, त्यात हे वाहिनेवाले आहेत. त्यांचा मूर्खपणा त्यांच्याजवळ, त्यांनी चुकीची चर्चा आयोजित केली तरी, त्यामुळे शरद पवार यांना कुठे कमीपणा येत नाही. 

शरद पवार हे शरद पवारच आहेत. ७५ वर्षे पूर्ण केल्यानंतर आज ७७ व्या वर्षात १२ तास काम करणारा आणि वर्षातून १० महिने दौरे करणारा, स्वत:च्या कुटुंबीयांमध्ये वर्षातले फक्त चार दिवस राहणारा, सकाळी आठ वाजता आपला कामाचा दिवस सुरू करणारा, दिवसभरात १००-२०० माणसांना निवांत भेटणारा, त्यांचे प्रश्न ऐकून घेणारा, ‘उद्या बघू, परवा बघू’ असे न सांगता, फोन उचलून त्यांचे काम मार्गी लावणारा, कोणताही राजकीय पक्ष असो वा त्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना विकासकामात मनस्वी मदत करणारा, शेतीचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, दुष्काळाचे प्रश्न, बंद पडणा-या उद्योगांचे प्रश्न, बेकारीचे प्रश्न, शेतीमालाच्या भावाचे प्रश्न, शेतकरी संस्थांना अनुदान मिळण्याचे प्रश्न, असे असंख्य प्रश्न आज महाराष्ट्रात आहेत. त्या प्रश्नाचा निचरा कसा करावा, याची एक विलक्षण हातोटी शरद पवार साहेबांजवळ आहे. त्यांना भेटायला गेलेल्या महाराष्ट्रातील कोणत्याही सार्वजनिक कार्यकर्त्यांला भेटताना, ‘कशी चाललीय तुमची संस्था’ हा प्रश्न ते विचारल्याशिवाय राहणार नाहीत. काही अडचण असल्यास लगेच मदत केल्याशिवाय राहणार नाहीत. असा एक विलक्षण झपाटा त्यांच्याजवळ आहे. 

एक आठवण सांगतो. पिंपरी-चिंचवडच्या डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्यासोबत दिल्लीत पवार साहेबांना भेटायला गेलो होतो. पी. डी. सरांचे काम होते, त्यांनी ते पवार साहेबांना सांगितले. पवार साहेबांनी सहज प्रश्न केला, ‘संस्था कशी चालली आहे.’ पी. डी. सरांनी सांगितले, ‘उत्तम चालली आहे. पण गेली तीन वर्षे नियमाने मिळणारे सरकारी अनुदान मिळालेले नाही.’ एखाद्या नेत्याने असे म्हटले असते की ‘अरे, असं कसं झालं,’ शरद पवारांनी लगेच फोन उचलला, तत्कालीन उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे यांना फोन लावला. पवार साहेबांनी त्यांना विचारले की, ‘राजेश, किती खासगी शिक्षण संस्थांना नियमाप्रमाणे द्यावयाचे अनुदान दिले गेले नाही, त्याची यादी मला पाठव’ विषय होता पीडींच्या संस्थेचा. पण त्या कामाला व्यक्तिगत स्वरूप न देता, संबंध महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांना ही अडचण असेल याची कल्पना करून श्री. पवार यांनी माहिती मागवली. आम्ही भेटलो तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. संध्याकाळी ४ वाजता माहिती आली. पुढे काय झाले असेल याची कल्पना करता येईल. पुढच्या ७२ तासांत महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्थांचे थकीत अनुदान रवाना झाले. याचे नाव शरद पवार आहे. 

आणखी एक किस्सा. गेल्या वर्षी पिंपरी-चिंचवड येथे साहित्य संमेलन झालं. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मोदींबद्दल केलेल्या विधानामुळे गोंधळ माजला. संमेलन उधळण्यापर्यंत भाषा झाली. उद्घाटन समारंभात येणा-या मुख्यमंत्र्यांनी कळविले की, ‘मी उद्घाटनाला येणार नाही’, त्यांनी कळवलं म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडेंनी कळवले की, ‘मी पण येणार नाही.’ भाजपाच्या स्थानिक खासदार- आमदारांनी कळवले की, ‘आम्ही पण येणार नाही.’ स्वागताध्यक्ष होते पी. डी. पाटील सर. ते थोडे अस्वस्थ झाले. ते म्हणाले, ‘काय करू या.’ मी म्हटले ‘चला, पवार साहेबांना भेटू या.’ सुदैवाने पवार साहेब पुण्यातच होते. त्यांना भेटलो, ‘काय काम काढलं?’ ते म्हणाले. त्यांच्यासमोर विषय मांडला. त्यांनी फोन उचलला. मला वाटले, ते सीएमना फोन लावतील. त्यांनी थेट फोन लावला पीएमना. मोदी फोनवर आले. पवार साहेबांनी विषय सांगितला, ‘महाराष्ट्राच्या एवढ्या मोठ्या सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमाला तुमचे मुख्यमंत्री येणार नाहीत. स्थानिक वादात त्यांनी एवढे लक्ष घालता कामा नये.’ तिकडून मोदी म्हणाले की, ‘शरदजी, बंदा आयेगा’ मोदींनी फोन ठेवला आणि न बोलता बंदा आला. बंदा आला म्हणून सांस्कृतिक मंत्री चंदा पण आला. थेट मोदींशी बोलणारा महाराष्ट्रातला किंवा देशातला दुसरा नेता कोण? त्याचे नावही शरद पवार.

२७ व्या वर्षी आमदार, ३१ व्या वर्षी कॅबिनेट मंत्री, ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री, ५१ व्या वर्षी संरक्षण मंत्री, असा नेता देशात कोण?७५व्या वाढदिवशी देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, सात राज्यांचे मुख्यमंत्री असे देशातले किमान २० मोठे लोक एका व्यक्तीच्या सत्काराकरिता एका व्यासपीठावर येतात. पवार साहेबांच्या कर्तृत्वाचे गुणगाण करतात. त्याच्या अगोदर १४ वर्षे म्हणजे ६१व्या वाढदिवसाला मुंबईतील कार्यक्रमात त्यावेळेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी टोकियो येथून थेट महालक्ष्मी रेसकोर्सवर येतात आणि भाषणात सांगतात की, ‘७५० सांसद है, लेकीन इसमे अकेले शरद पवार है, जो सामाजिक बात करते है.. इस लिए मैं आया हूँ..’

शरद पवार यांना पद्मविभूषण द्या किंवा त्यांना राष्ट्रपती करा, ही सगळी पदे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या आवाक्यापेक्षा चार-सहा इंच कमीच आहेत. या व्यक्तिमत्त्वाचा आवाका इतका विलक्षण आहे की, त्यांच्या पक्षाला कोणतेही नाव द्या. काँग्रेस ‘एस’ म्हणा, नाही तर ‘राष्ट्रवादी’ म्हणा... गेल्या १७ वर्षात आपल्या स्वत:च्या व्यक्तिमत्त्वावर ५०-६० आमदारांना निवडून आणणा-या नेत्याचं नाव सांगा. ते नाव सुद्धा शरद पवार हेच आहे. 

आपल्या मतदारसंघात निवडणुकीच्या आदल्या दिवशी जाऊन लाखो मतांच्या फरकाने सतत निवडून येणा-या उमेदवाराचे नाव सांगा... ते नावही शरद पवारच. १९८४ ची लोकसभा पोटनिवडणूक. इंदिरा गांधी यांची भीषण हत्या झालेली. राजीव गांधीच्या मागे सगळा देश उभा. देशात सर्वाधिक मताच्या फरकाने राजीव गांधी निवडून आले. फरक होता ५ लक्ष १६ हजार मताचा. आणि त्या खालोखाल, बारामती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमदेवाराच्या विरुद्ध काँग्रेस ‘एस’चे उमेदवार म्हणून निवडून आले होते, शरद पवार. फरक होता ५ लक्ष ३ हजारांच्या मतांचा. त्यांची सामाजिक कामांची यादी तर विलक्षण आहे. पण सामाजिक जाणिवांची यादी अधिक मोठी आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यापीठ नामांतराचा प्रश्न पाहा. पवार सरकार जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना त्यांनी माघार घेतली नाही. मोठी किंमत चुकवून शरद पवार यांनी नामांतर करून दाखविले. त्यांनी राजकीय पक्ष बदलली असेल तरी, सामाजिक भूमिका त्यांनी कधीही बदलली नाही. ते काँग्रेसमध्ये होते. बाहेर गेले. पुन्हा प्रवेश केलानंतर स्वत:चा पक्ष काढला. पण राजकीय चौकटीच्या बाहेर देशात सामाजिक नेतृत्व म्हणून शरद पवार यांच्याखेरीज आज देशपातळीवर नाव सांगा.

पण चॅनेलवाल्यांना हे कोणी सांगावे? आणि कसे सांगावे? महाराष्ट्रातला महिला आयोग, पोलिसांमधील महिलांची भरती, शासकीय जमीन, घर घेताना पतीबरोबर पत्नीची मालकी, पत्नीचे नाव आणि मालकी हक्क हे सामाजिक भान कायद्यामध्ये शरद पवार यांच्यामुळे नोंदले गेले. श्री. पवार यांच्या सामाजिक जाणिवेबद्दल खूप लिहिता येईल. श्री. शरद पवार यांच्या विरोधात मीही अनेक वेळा टीका केली आहे, पुढे वेळ आली तर करीन सुद्धा. पण शरद पवारांचे मोठेपण प्रश्नचिन्हात कधीही बसू शकत नाही. त्यांच्या मोठेपणासाठी फक्त आणि फक्त उद्गार चिन्हच राहील! 

अटलबिहारी वाजपेयी विरोधी पक्षनेते असताना त्यावेळचे राष्ट्रपती आर. व्यंकटरामन यांनी वाजपेयी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला होता. (वाहिनीवाल्यांच्या माहितीसाठी)

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News