अक्षरनाती ... एका सांस्कृतिक उपक्रमाचे इतिहासकथन

दत्ता भगत
Thursday, 31 January 2019

निर्मलनी आपल्या पुस्तकांचे नाव देतानासुद्धा आपला लेखनहेतू स्पष्ट केलेला आहे; पण त्याचवेळी आणखी एक अर्थछटा सुचवून त्यांनी आपल्या शब्दसामर्थ्याचेही दर्शन घडवले आहे. 'अक्षर' ह्या शब्दाचा "लिपीबद्ध आविष्कार" हा जसा एक अर्थ रूढ आहे, तसाच कधीच भंग न पावणारा असाही दुसरा अर्थ त्यातून ध्वनीत होतो

माझे मित्र निर्मलकुमार सूर्यवंशी यांचे 'अक्षरनाती' हे आत्मचरित्र मी एका बैठकीतच वाचून संपवले. मला त्याची तीन कारणे संभवतात, असे वाटते. पहिले कारण म्हणजे, त्यांची लेखनशैली ओघवती, अतिशय सुबोध आणि पारदर्शी आहे. दुसरे कारण असे की, हे रूढ अर्थाचे 'आत्मचरित्र' नाही. गेल्या चाळीस वर्षातला त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जो प्रकाशनव्यवसाय उभा केला त्याचे हे प्रथमपुरुषी निवेदन पद्धतीने सांगितलेले इतिहासकथन आहे. तिसरे कारण, कदाचित माझ्यापुरते सीमित आहे. 'निर्मल प्रकाशनाने' गेल्या चार दशकांत सुमारे ज्या चारशे लेखकांची पुस्तके प्रसिद्ध केली. त्यापैकी किमान शंभर लेखक तरी माझ्या प्रत्यक्ष परिचयाचे आहेत आणि त्यातले पंचवीस तीस लेखक माझ्या मित्र परिवारातले आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखकीय जडणघडणीचा हा वृत्तांत माझ्यापुरता कुतूहलपूर्ती करणारा आहे. म्हणून, हे आत्मवृत्त मी एका बैठकीत वाचून संपवले. 

निर्मलनी आपल्या पुस्तकांचे नाव देतानासुद्धा आपला लेखनहेतू स्पष्ट केलेला आहे; पण त्याचवेळी आणखी एक अर्थछटा सुचवून त्यांनी आपल्या शब्दसामर्थ्याचेही दर्शन घडवले आहे. 'अक्षर' ह्या शब्दाचा "लिपीबद्ध आविष्कार" हा जसा एक अर्थ रूढ आहे, तसाच कधीच भंग न पावणारा असाही दुसरा अर्थ त्यातून ध्वनीत होतो. निर्मल यांच्या जीवनशैलीत जे काही नातेसंबंध निर्माण झाले, टिकून राहिले आणि अखंड टिकून राहण्याची प्रवृत्ती ह्या नातेसंबंधात आहे. ती कधीही भंग न पावणारी आहे. हाही एक अर्थ या शीर्षकातून सूचित होतो. त्यांचे लेखक हे केवळ ग्राहक नाहीत किंवा त्यांचे लेखन ही त्यांची व्यवसायातली कच्ची सामग्रीसुद्धा नाही. त्या पलीकडे ह्या लेखनसामग्रीशी त्यांचे नाते आहे. आपली जीवनशैली आणि आकलनदृष्टी अधिक समृद्ध करणारा हा व्यवसाय आहे. अशी त्यांना मनोमन खात्री आहे. प्रकाशन व्यवसायाच करायचा हा निर्णय त्यांनी 
केव्हा घेतला? तो क्षण त्यांनी अधोरेखित केलेला नसला तरी तो नकळतपणे ह्या लेखनात झिरपला आहे. दत्ताची भजने लिहून प्रकाशित करणाऱ्या निर्मलसाठी त्या क्षणाला तरी ती त्यांची आर्थिक नड होती; पण ती भजनाची पुस्तके विकताना पेंटरचे गाणे आणि ती ऐकताना आनंदित होऊन त्या भक्‍तांचे ते गाण्याचे पुस्तक खरेदी करणे केवळ बाजारातील एखादी वस्तू आपण खरेदी करीत आहोत ह्या स्वरूपाचे नव्हते. हे अजाणतेपणी ह्या उभयतांना जाणवले. कदाचित त्यामुळेच आपण प्रकाशनव्यवसाय हेच आपले अंतिम ध्येय ठरवावे, या जाणिवेचे बीजारोपण अत्यंत संवेदनक्षम वयात झाले. पुढे योगायोगाने जे साहित्यिक वातावरण लाभत गेले. त्यामुळे ह्या बीजाचे रोपट्यात आणि रोपट्याचे एका वृक्षात रूपांतर झाले, असे मला वाटते. 

संपूर्ण पुस्तक वाचले म्हणजे, आपल्या ग्रामीण बोलीतला त्यांनी स्वत...च वापरलेला शब्द त्यांची प्रेरणा स्पष्ट करतो. ते स्वत...च म्हणतात, पन्नास वषारपूर्वी मी अक्षरांच्या 'नादी' लागलो. कुठलेही पुस्तक प्रकाशित करण्यासाठी स्वीकारताना त्यांनी नफ्यातोट्याचा विचार केलेला दिसत नाही. कुठलाही विचार न करता आधी ते पुस्तक प्रसिद्ध करायचा निर्णय घेतात आणि त्यांनतर त्या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे किती तोटा येईल आणि तो भरून काढावा यासाठी काय काय करावे लागेल याचा व्यावहारिक विचार करू लागतात, ही त्यांची एक पद्धत आहे. 

नफ्यातोट्याचा विचार करणारी यशस्वी व्यावसायिकांची परंपराच नाही अशा काळात निर्मल प्रकाशनाचा व्यवसाय सुरू करायचा हे मनोमन ठरवतात. खरे तर प्रकाशन व्यवसायासाठी स्वत... चा प्रेस असणे ही गरजच नसते. हा फरकही त्यांना सुरुवातीला कळलेला नाही. पुस्तक छापण्यासाठी उमरखेडला प्रेस मालकाला पैसे द्यावे लागले, हे लक्षात घेऊन बहुधा त्यांचे त्यांनीच असे अनुमान काढले की, प्रकाशनव्यवसाय करायचा तर त्यासाठी स्वत... चा प्रेस लागते. मुद्रण व्यवसायातले एक प्रॉडक्‍ट म्हणजे पुस्तक; पण ते काही मुद्रण व्यवसायातले एकमेव प्रॉडक्‍ट नव्हे. हे त्यांच्या लक्षात आले केव्हा? तर प्रेसचे कर्ज फेडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची छपाई करावीची लागली तेव्हा. 

इ.स. १९५८ साली मराठवाडा विनाअट महाराष्ट सामील झाला याचा सांस्कृतिक क्षेत्रातल्या किती विचारवंतांनी नेमकेपणाने अर्थ समजून घेतला? भौतिक साधनसामग्रीचा अभाव मराठवाड्याच्या मागासलेपणाचा एवढाच सीमित अर्थ सर्वानी घेतला. दुर्दैवाने अजूनही एवढाच सीमित अर्थ घेतला जातो. त्यामुळे रस्ते, जलसाठे, कारखानदारी एवढ्या मर्यादेपुरताच मराठवाड्याच्या मागासलेपणाचा विचार होतो. सांस्कृतिक मागासलेपणाचा कुणीच विचार करीत नाही. हा विचार राजकीय नेत्यांनी करणे अपेक्षित नसते तर सांस्कृतिक क्षेत्राचे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे त्या पश्‍चिम महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी करणे अपेक्षित होते. कुरुंदकर गुरुजींच्या मनात प्रचंड प्रमाणात हा सल होता. वैयक्‍तिक पातळीवर त्यांची कुणी मागासलेपणासाठी मानहानी करावी असे त्यांचे व्यक्‍तिमत्त्व नव्हते. हे ज्यांना कळत नव्हते तिथे त्यांनी कुणाचाही मुलाहिजा न ठेवता अशा व्यक्‍तींचा किती आणि कसा पाणउतारा केला ह्याची अनुभवाने मला माहिती आहे. त्याचे स्पष्टीकरण करताना ते धक्‍कतंत्राचा वापर करतात, विक्षिप्त विधाने करतात असे जेव्हा म्हटले जायचे तेव्हा गुरुजींच्या मनातला हा सल वैयक्‍तिक नसायचा तर प्रादेशिक ममत्त्वाचा असायचा, हे मराठवाड्याबाहेरच्या मंडळीचे सोडा; पण मराठवाड्यातल्या लोकांनाही नीट उमगायचे नाही, असे मला जाणवते आहे. आजही झाडीबोलीतल्या रंगभूमीवर काम करून बऱ्यापैकी मानधन कमवून जाणारे पुण्या- मुंबईचे कलावंत या रंगभूमीबद्दल कमी  बोलत असतात हे मला त्यांच्या अंतरवर्तुळातल्या सहवासामुळे पुरेसे माहीत आहे. 

निर्मलचे व्यक्‍तिमत्त्व प्रत्येक गोष्टीकडे सकारात्म पद्धतीने पाहणारे व्यक्‍तिमत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्या लेखणीला कुठेही अन्याय झाला हे फारसे जाणवत नाही. उलट अन्यायाकडे ते आपल्या सभोनी असणारी ती 'प्रतिकूलता' आहे. असेच गृहीत धरतात. त्यामुळे तिच्यावर मात कशी करावी ह्याच आव्हानाचा ते विचार करतात. परिणामी ह्या आत्मवृत्तात कुठेही 'कडवटपणा' आलेला नाही. पुस्तकांची केवळ नावे वाचून एखादा सरकारी अधिकारी खालच्या माणसानी केलेली तक्रार खरी आहे, असे गृहीत धरत असेल तर ह्या शासनप्रणालीचा त्यांना राग यायला हवा; पण तसे घडत नाही. ते केवळ नाराजी व्यक्‍त करतात आणि पुढे चालू लागतात. काही कौटुंबिक सुखद:खाचे तपशील ह्या आत्मचरित्रात आले आहेत. ते प्रकाशन व्यवसायाशी अनुषंगिक असल्यामुळे आले आहेत. आईचा अखेरचा आजार मात्र वाचकांना हेलावून टाकणारा कौटुंबिक प्रसंग आहे. तो 
तसा येणे यात अस्वाभविक असे काहीच नाही. वयाच्या दुसऱ्यावर्षी निर्मलचे वडिलांचे छत्र नाहीसे झाले. त्यामुळे त्यांची आई हेच त्यांचे वडीलही आहेत. त्यामुळे त्यांचे जाणे त्यांना पोरकेपणाची जाणीव करून देते. 

चरित्र, आत्मचरित्र वाचताना लेखक काय सांगतो, एवढेच वाचायचे नसते, तर तो सांगायचे काय टाळतो आणि अगदीच अशक्‍य असेल तर वाचकांच्या फारसे लक्षात येऊ नये असे शिताफीने कसे सांगतो हेही लक्षात घ्यायला हवे. मी चरित्रात्मक पुस्तकांचे अध्यापन केलेले असल्यामुळे चरित्रातल्या अशा जागा माझ्या नजरेतून सुटत नाहीत. अशा गोष्टीही "अक्षरनाती' मध्ये आहेत; पण वाचकांनी स्वत:हून अशा गोष्टी शोधायच्या असतात अथवा दुर्लक्षित करायच्या असतात असे माझे मत आहे. म्हणून, मी या आत्मचिरत्रातल्या जागा सांगायचे टाळले आहे. 'अक्षरनाती' ह्या पुस्तकाचा आणखी एक विशेष इथे लक्षात घ्यायला हवा. प्रकाशन हा व्यवसाय नसून तो एक सांस्कृतिक उपक्रम आहे. ह्या उपक्रमाच्या वाटचालीत पुढे हा "व्यवसाय' झाला. पश्‍चिम महाराष्ट्रात हा विकासक्रम काळाच्या स्वाभाविकपणे संक्रमित झाला. मराठवाड्यात मात्र अशा संक्रमणपर्वाला वेळच मिळत नाही. त्यामुळे या व्यवसायातले खाचखळगे असूनही नव्याने या व्यवसायात पदार्पण करणाऱ्या व्यावसायिकांच्या लक्षात येत नाहीत. निर्मलच्या या आत्मचरित्रामुळे या व्यवसायातल्या जाचक ठरणाऱ्या अनेक उणिवा लक्षात येतात हे या पुस्तकाचे यश आहे असे मला वाटते. 

महाविद्यालयीन काळात कविता लिहिण्याची आवड असणाऱ्या निर्मलनी व्यावसायिक दडपणामुळे कविता लेखनाकडे दुर्लक्ष केले. मित्रांच्या निर्मितीला प्रकाशात आणताना आपली लेखनउर्मी ह्याच आनंदात त्यांनी विलीन केली. निर्मल ह्यांच्या अनेक लेखकमित्रांना हे माहीत असावे. म्हणून, त्यांचे अनेक लेखकांशी मैत्रिपूर्ण संबंध टिकून आहेत. मराठवाड्यातल्या प्रकाशन व्यवसायातले ऐतिहासिक कथन या दृष्टिने निर्मलचे हे आत्मवृत्त अनेकांसाठी एक सांस्कृतिक ठेवा म्हणून, दीर्घकाळ लक्षात राहील याची मला खात्री वाटते. 
                                                                                                     

                                                                                                              'अक्षरनाती' 
                                                                                                       निर्मलकुमार सूर्यवंशी 
                                                                                                    पृष्ठे-272, किंमत-400 
                                                                                                    निर्मल प्रकाशन, नांदेड. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News