युतीच्या जागावाटपाचा मुद्दा १० दिवसात निकाली : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 1 August 2019

राजकीय आघाडीवर

  • पिचड यांच्या भाजप प्रवेशावर महादेव कोळी समाज नाराज
  • आघाडी नेत्यांवर पक्षांतरासाठी भाजपकडून दबाव : राजू शेट्टी
  • मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला राष्ट्रवादीचे शिवस्वराज्य यात्रेचे उत्तर
  • आघाडीचे ४० आमदारच निवडून येतील : गिरीश महाजन

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र लढणार असून, येत्या १० ते १५ दिवसांत जागावाटप व त्याबाबतची बोलणी पूर्ण होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. युती अभेद्य असून, आता फक्त बहुमताचे विक्रम मोडायचे आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मधुकर पिचड, राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, महात्मा फुलेंच्या वंशज नीता होले, माजी आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील यांच्यासह आमदार शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, कालिदास कोळंबकर, संदीप नाईक आदींनी आज सकाळी मुंबईतील गरवारे क्‍लब येथे झालेल्या समारंभात भाजपात प्रवेश केला.

या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्रच लढेल. आमची युती अभेद्य असून, आता फक्त बहुमताचे विक्रम मोडायचे आहेत. येत्या १०-१५ दिवसांत जागावाटपाबाबत निर्णय होईल. मात्र, काही जण युतीबाबत संभ्रम निर्माण करीत आहेत. दोन्ही पक्षांत जागावाटपावरून काही मतभेद आहेत. मात्र, ते चर्चेअंती सोडविले जातील. पुढील सरकारही युतीचेच असेल.’’

काँग्रेस-राष्ट्रवादीतील आघाडीच्या नेत्यांच्या भाजपप्रवेशाबाबत होत असलेल्या टीकेबाबत फडणवीस म्हणाले की, आम्ही कोणाचेही जोरजबरदस्तीने किंवा धमकी देऊन प्रवेश घडवून आणत नाही आहोत. अनेकांना भाजपात यायचे आहे. मात्र, आम्ही सरसकट प्रवेश देत नाही. कोणालाही प्रवेश द्यायला भाजप काही धर्मशाळा नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांचे सध्या भाजपात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. भाजप साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करून अनेक नेत्यांना धमकावून भाजपमध्ये प्रवेश करवून घेत असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह आघाडीतील अनेक नेत्यांनी केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले.
 

आम्ही कोणाच्याही पाठीमागे आकसाने चौकशीचा ससेमिरा लावलेला नाही. कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शिवसेना पक्ष फोडला होता.

- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री
 

आम्हाला भाजपची वाट दाखवल्याबद्दल राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार. विकासासाठी जिकडे देश जात आहे तिकडे आपण जावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. आता आम्ही तुमच्या पक्षात आलो आहोत, आम्हाला बरोबरीने वागवा.

- मधुकर पिचड, ज्येष्ठ नेते

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News