देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 June 2019
  • सर्वपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान मोदींचा निर्णय
  • राजनाथसिंह यांची माहिती
     

नवी दिल्ली : एक देश एक निवडणुकीच्या प्रस्तावासंदर्भात विचार करण्यासाठी एक समिती नेमण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. या संदर्भात विचारविनिमयासाठी सरकारतर्फे बुधवारी झालेल्या बैठकीनंतर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी या निर्णयाची माहिती दिली. या बैठकीला उपस्थित असलेल्या राजकीय पक्षांपैकी बहुसंख्य पक्ष या प्रस्तावाला अनुकूल असल्याचे ते म्हणाले.

डाव्यांसह काही पक्षांना या प्रस्तावाबाबत काही शंका असून, त्यावर विचार करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय मोदी यांनी केल्याचे राजनाथसिंह यांनी सांगितले.  संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ. फारुक अब्दुल्ला, शिरोमणी अकाली दलाचे सुखबीरसिंग बादल, बीजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती, तसेच वायएसआर काँग्रेसचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी या बैठकीस उपस्थित होते.

सरकारने बोलाविलेल्या या बैठकीवर अनेक विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला होता. त्यात पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर होत्या. त्यांनी कालच बहिष्काराचा निर्णय जाहीर केला होता. सपचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनीही तसेच सूचित केले होते. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, तेलुगू देसमचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे स्वतः उपस्थित नव्हते; पण त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी मात्र उपस्थित होते.

हा निर्णय घटनाविरोधी : मायावती

देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची संकल्पना लोकशाहीविरोधी आणि घटनाविरोधी आहे, असे टीकास्त्र बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी आज सोडले. ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला मायावती अनुपस्थित होत्या.

देशात सध्या ईव्हीएमबाबत सर्वच जण चिंता व्यक्त करीत असून, याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली असती, तर मी त्या बैठकीला उपस्थित राहिले असते, अशा शब्दांत मायावती यांनी सरकारला टोला लगावला.

‘एक देश, एक निवडणूक’ हा देशासमोरील प्रश्‍न नसून, मतपत्रिकांद्वारे निवडणूक घेणे हा सध्याचा देशासमोरील महत्त्वाचा प्रश्‍न आहे. याबाबत आमचा पक्ष यापुढेही लढत राहील, असे मायावती यांनी म्हटले आहे.

‘एकत्र निवडणुका घेणे लोकशाहीविरोधी’

संसद निवडणुका आणि विधिमंडळाच्या निवडणुका एकाच वेळी घेणे लोकशाहीविरोधी आणि संघराज्याच्या तत्त्वाच्या विरोधात आहे. त्यामुळे ही संकल्पना घटनेच्या विरोधात आहे, अशी टीका ‘माकप’कडून आज करण्यात आली. ‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेला ‘माकप’ने सुरवातीपासून विरोध दर्शविला असून, या विरोधाची कारणे आज पक्षाने जाहीर केली. 
या निर्णयामुळे कायदेमंडळाला सरकार जबाबदार असते, या घटनात्मक तरतुदीचा भंग होतो. त्यामुळे ही संकल्पना मुळातच घटनाविरोधी, असे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी स्पष्ट केले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News