वडील वॉचमन...मुलाने केली ही कामगिरी ज्यामुळे मोदींकडून झाले कौतुक

यिनबझ ऑनलाईन टीम
Thursday, 31 January 2019

राहायला हक्काचे घर नाही. दर महिन्याला घरात येणाऱ्या उत्पन्नाची शाश्वती नाही. वडील वॉचमन. अशा परिस्थितीतही आकाशने जिद्द सोडली नाही. आई-वडिलांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत त्याने यशाची एकेक शिखरे सर केली आणि परवा चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मन की बात'मध्ये त्याचे कौतुक केले.

पुणे - राहायला हक्काचे घर नाही. दर महिन्याला घरात येणाऱ्या उत्पन्नाची शाश्वती नाही. वडील वॉचमन. अशा परिस्थितीतही आकाशने जिद्द सोडली नाही. आई-वडिलांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत त्याने यशाची एकेक शिखरे सर केली आणि परवा चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मन की बात'मध्ये त्याचे कौतुक केले.

आकाश गुरखा (वय 16) असे त्याचे नाव. पुण्यात नुकत्याच झालेल्या "खेलो इंडिया' स्पर्धेत त्याने बॉक्‍सिंगमध्ये रौप्य पदक पटकाविले. नेपाळहून नोकरीच्या शोधात आलेले गुरखा कुटुंबीय गेली 21 वर्षे पुण्यात राहात आहे. आकाशचे वडील पुण्यातील रामदूत सोसायटीत वॉचमन आहेत. आजूबाजूच्या सोसायट्यांमधील गाड्या धुण्याचेही काम ते करतात. रामदूत सोसायटीच्या पार्किंगमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये त्यांचे चार जणांचे कुटुंब राहते.

वयाच्या नवव्या वर्षापासून खेळायला सुरवात करणाऱ्या आकाशचे बॉक्‍सिंगमधील कौशल्य पाहून प्रशिक्षक उमेश जगदाळे यांनी त्याला एमआयजीएस क्‍लबमध्ये दाखल करून घेतले. रविवार पेठेतील बी. आर. अगरवाल शाळेत शिकत त्याने बॉक्‍सिंगचे वेड जपले. जगदाळेंच्या मार्गदर्शनाखाली आकाशने राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश मिळविले.

आकाशच्या चमकदार कामगिरीमुळे प्रभावित झालेल्या आर्मी स्पोर्टस्‌ इन्स्टिट्यूटने (एएसआय) त्याला प्रशिक्षणाची तयारी दर्शविली. मात्र, त्याची फुफ्फुसे जन्मत:च जोडलेली असल्याने त्याला एएसआयची वैद्यकीय चाचणी पार करता आली नाही. परंतु, एएसआयच्या प्रशिक्षकांना त्याच्या कौशल्याची जाणीव होती. त्यांनी आकाशला नागरी खेळाडू म्हणून एएसआयमध्ये राहण्याची परवानगी गेल्या वर्षी दिली आणि ऑलिम्पिक पदक विजेत्यांना घडविणाऱ्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तो बॉक्‍सिंगचे धडे घेऊ लागला. त्यानंतर अवघ्या वर्षभरात आकाशच्या यशाने राष्ट्रीय पातळीवर भरारी घेतली.

आकाशचा दिवस शाळा, जेवण, त्यानंतर सराव आणि मग क्‍लास यातच संपत असे. "खेलो इंडिया'मध्ये त्याने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला तेव्हा खूप आनंद झाला होता. खेळात हार-जित होत असते. पुढील वेळी तो नक्कीच सुवर्णपदक मिळवेल, अशी खात्री आहे. - सावित्री गुरखा, आकाशची आई

आकाशची कामगिरी - फेडरेशन नॅशनल स्पर्धा - सुवर्णपदक - सर्बिया येथील कुमार गट आंतरराष्ट्रीय बॉक्‍सिंग स्पर्धा - रौप्यपदक - खेलो इंडिया यूथ गेम्स, 2018 स्पर्धा - ब्रॉंझ पदक - खेलो इंडिया यूथ गेम्स, 2019 स्पर्धा - रौप्य पदक

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News