दहा तासाच्या कोम्बींग ऑपरेशननंतर दूचाकी चोर जाळ्यात

मंगेश शेवाळकर
Monday, 19 August 2019
  • कळमनुरी तालुक्यातील मोरवाडी शिवारात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन
  • दहा तासाच्या कोम्बिंग ऑपरेशन नंतर सोमवारी (ता.१९) सकाळी पावणे अकरा वाजता एका शेतात सापडला

हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील मोरवाडी शिवारात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेला दुचाकी चोर स्थानिक गुन्हे शाखा व बाळापुर पोलिसांसह गावकऱ्यांकडून करण्यात आलेल्या दहा तासाच्या कोम्बिंग ऑपरेशन नंतर सोमवारी (ता.१९) सकाळी पावणे अकरा वाजता एका शेतात सापडला. त्यानंतर पोलिसांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडला. 

येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देगलूर (जि. नांदेड) येथील देविदास बाबुराव कांबळे याला शुक्रवार (ता.१६) ताब्यात घेतले. त्याने नांदेड शहरातील अनेक दुचाकी चोरून हिंगोली जिल्ह्यात विक्री केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी तब्बल 26 दुचाकी जप्त केल्या. दुचाकी चोरीचा आखाडा बाळापूर येथे गुन्हा दाखल असल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देवीदास कांबळे याला आखाडा बाळापूर पोलिसांच्या हवाली केले होते. 

आखाडा बाळापूर पोलिसांनी रविवारी (ता. १८) त्याला सेनगावच्या न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर रात्री परत आखाडा बाळापूर येथे आणत असतांना कळमनुरी जवळ माळेगाव फाटा येथून त्याने पोलीस वाहनातून उडी मारून पलायन केले. पोलीस वाहनात असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला मात्र तो सापडला नाही. 

दरम्यान पोलिस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे जगदीश भंडारवार, उपनिरीक्षक किशोर पोटे, शिवसांब घेवारे, जमादार बालाजी बोके, संभाजी लेकुळे संदीप जाधव, आशिष उंबरकर विठ्ठल कोळेकर, भगवान आडे, गणेश जाधव तसेच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास रोयलावार, जमादार संजय मार्के यांच्या पथकाने मोरवाडी गावकऱ्यांच्या मदतीने रात्री दहा वाजल्यापासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. 

यामध्ये परिसरातील शेताला वेढा घालून शोधमोहीम सुरू केली. आज सकाळी पावणे अकरा वाजता एका शेतात पिकांमध्ये लपून बसलेला तो आढळून आला. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला. लातूर येथे सापडल्याने आखाडा बाळापूर पोलिसांसह हिंगोली पोलीस दलाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News