राहुल यांच्यानंतर काँग्रेसमध्ये सामूहिक राजीनामासत्र

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 June 2019
  • युवक काँग्रेस आणि संलग्न संघटनांमधील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर आज मध्य प्रदेशचे प्रभारी सरचिटणीस दीपक बावरिया यांनीही राजीनामा दिला

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा करणाऱ्या राहुल गांधींनी पक्षातील नेत्यांबद्दल व्यक्त केलेल्या नाराजीनंतर  काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. आतापर्यंत राज्यशाखा, युवक काँग्रेस आणि संलग्न संघटनांमधील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर आज मध्य प्रदेशचे प्रभारी सरचिटणीस दीपक बावरिया यांनीही राजीनामा दिला. या राजीनामासत्रामुळे पक्षातील नेत्यांवरील दबाव वाढला आहे.

राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस खासदारांच्या बैठकीत पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, अशी स्पष्टोक्ती दिली होती. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना नवा अध्यक्ष शोधण्यासाठी  आधीच सांगितल्याचेही ते म्हणाले होते. त्यानंतर काल युवक काँग्रेसच्या नेत्यांसमोर राहुल यांनी मनातील खंत व्यक्त करताना आपल्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेला नाही, असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस मुख्यालयात काँग्रेससह, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, काँग्रेस सेवादल या संलग्न संघटनांचे नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

सामूहिक राजीनामे
दिल्ली प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष राजेश लिलोथिया, हरियाणा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुमित्रा चौहान यांच्यासह १२० पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामापत्र सादर केले. राज्यसभा खासदार विवेक तनखा यांनी काँग्रेसच्या विधी विभागाच्या प्रमुखपदाचा कालच राजीनामा दिला होता, तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काल राजीनामा देऊ केला होता.  

राहुल पुन्हा सक्रिय? 
राजीनाम्यानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपदाचे कामकाज थांबविल्याचे सांगितले जाते. मात्र आज छत्तीसगड प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी मोहन मरकाम यांची नियुक्ती राहुल यांच्या मान्यतेने झाल्याचे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. राहुल यांच्या राजीनाम्यानंतर सर्व नेमणुका महासमितीच्या मान्यतेने झाल्या.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांचीही नियुक्ती महासमितीनेच केली होती. त्यापार्श्‍वभूमीवर छत्तीसगडमधील नेमणुकीमुळे राहुल पुन्हा सक्रिय झाल्याचीही चर्चा आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News