कलम ३७० च्या निकालानंतर राज्यघटना फाडून तुकडे भिरकावले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019
  • राज्यसभेत ‘पीडीपी’च्या खासदाराचे कृत्य
  • स्वतःचे कपडे फाडून निषेध

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरला विशेष व खास दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव तसेच लडाखला या राज्यापासून वेगळे करून केंद्रशासित राज्याचा दर्जा देणारे जम्मू-काश्‍मीर राज्य फेररचना विधेयक २०१९ गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत मांडले.

या वेळी अभूतपूर्व गदारोळ झाला. मेहबूबा मुफ्ती यांच्या ‘पीडीपी’ पक्षाच्या नजीर अहमद लावे या खासदाराने भर सभागृहात राज्यघटना फाडून तिचे तुकडे हवेत भिरकावले. त्यांच्यासह स्वतःचे कपडे फाडून निषेध करणारे फैयाज अहमद मीर यांनाही राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी मार्शलकरवी सभागृहाबाहेर काढले. 

विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्यासह विधेयकाला तीव्र विरोध करणाऱ्या काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक व डाव्या पक्षांच्या खासदारांनी वेलमध्येच बैठक मांडली व जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळातच सरकारने विधेयकावरील चर्चा ठामपणे सुरू करून विधेयकाला आजच मंजुरी घेण्याचा निर्धार स्पष्ट केला.

कलम ३७० रद्द करण्याच्या राजपत्रावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली आहे, असे स्पष्ट करून शहा यांनी, या मुद्द्यावर आता परतीचे दोर कापले गेले आहेत, असेही स्पष्ट केले. हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. कनिष्ठ सभागृहात सरकारकडे दणदणीत बहुमत आहे व विरोधक तुलनेने क्षीण आहेत.  

जम्मू-काश्‍मिरातील हिंसाचाराच्या जखमा सात दशके वागविणाऱ्या भारताच्या इतिहासाला नवे व ऐतिहासिक वळण देणारा दिवस ठरला. काश्‍मीरला अन्य खास दर्जा देणाऱ्या कलम ३७० ला हद्दपार करण्याचे आश्वासन भाजपने आपल्या लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. विस्तारित संसदीय अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यात सरकारने हे विधेयक आणून संकल्पपूर्तीचा नवा अध्याय लिहिला. 

या विधेयकांना कडाडून विरोध करताना विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी, ‘सरकारने आज लोकशाहीचा खून केला आहे,’ असा आरोप केला. ते म्हणाले, की ज्या कलम ३७०ने १९४७ पासून या राज्याला भारताशी बांधून ठेवले आहे, तेच कलम रद्द करण्याची सरकारची ही खेळी एकता व अखंडतेसाठी अत्यंत घातक आहे. ‘पीडीपी’, नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस व अन्य नेत्यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. भारताबरोबर एकनिष्ठ राहिलेल्या या पृथ्वीवरील नंदनवनाशी तुम्ही जे करत आहात ते अतिशय वाईट आहे.

ते म्हणाले, की संसदेत जणू ॲटमबाँब फुटला. माझ्या सत्तर वर्षांच्या जीवनात मी कधी विचारही केला नव्हता, की भारताचे शिर असलेल्या जम्मू-काश्‍मीरबाबत हे विधेयक संसदेत आणून भारताचा शिरच्छेदच केला जाईल. बलिदान देणाऱ्या काश्‍मिरी जनतेचा हा विश्वासघात आहे.

‘पीडीपी’ खासदारांचे वर्तन
तृणमूल काँग्रेस, द्रमुक व डाव्या पक्षांसह काँग्रेसचे सारे सदस्य प्रचंड घोषणाबाजी करत वेलमधे उतरले. ‘पीडीपी’चे फैयाज मीर व नजीर अहमद हेही होते. मीर यांनी स्वतःचेच कपडे फाडून निषेध केला. शहा यांनी जेव्हा प्रत्यक्ष विधेयक मांडले, त्या वेळी अहमद यांनी सचिवालयाच्या टेबलावर ठेवलेली राज्यघटना हाती घेऊन तिचे तुकडे केले व ते हवेत भिरकावले.

हे पाहून भाजप सदस्यांचा संताप अनावर झाला. विजय गोयल यांनी वेलमध्ये धाव घेऊन अहमद यांच्याशी झटापट करत राज्यघटना त्यांच्या हातून हिसकावून घेतली. राज्यसभाध्यक्षांनी मार्शलला पाचारण करून ‘पीडीपी’च्या दोन्ही खासदारांना सभागृहाबाहेर काढले. आझाद यांच्यासह बहुतांश विरोधी नेत्यांनी घटना फाडण्याच्या प्रकाराचा निषेध केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News