कर्नाटक, गोव्यानंतर आता बंडाचा नंबर महाराष्ट्राचा ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 13 July 2019
  • भाजप-सेनेत प्रवेशासाठी खलबते
  • मात्र मतदारसंघाची अडचण

मुंबई : कर्नाटक व गोव्यातील काँग्रेसच्या बंडानंतर आता महाराष्ट्रातही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदारांच्या बंडाचे वादळ घोंघावणार असल्याचे संकेत आहेत. आघाडीतील अनेक आमदार भाजप-शिवसेनेत प्रवेशाच्या प्रयत्नात असून कोणत्याही क्षणी ते पक्ष सोडणार असल्याचे चित्र आहे. यासाठी भाजप व शिवसेनेतील काही नेत्यांशी त्यांनी संपर्क साधून प्रवेशाचे आडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत केवळ निवडून येण्याच्या निकषावरच हे आमदार पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत; मात्र भाजप व शिवसेना युती असल्याने मतदारसंघाचे वाटप कसे होते, याबाबत या आमदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 

राष्ट्रवादीच्या काही दिग्गज आमदारांनी तर विश्‍वासू कार्यकर्त्यांना आपण निवडणूक लढणार तर आहोतच. तुम्ही कामाला लागा; मात्र पक्ष कोणता, याबाबत जाहीर प्रचार करू नका, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनीदेखील स्वत:चा पक्ष सोडून मतदारसंघातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठका वाढवल्या आहेत.

काँग्रेसमधून राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये पक्षांतर केल्यानंतर आता काँग्रेसचा राजीनामा दिलेले अब्दुल सत्तार, आमदार जयकुमार गोरे हेदेखील काँग्रेस पक्षात नाराज आहेत. त्यातच आज पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी पाहुणचार घेतल्याने त्यांचीही वाट भाजपच्या दिशेने असल्याची चर्चा सुरू झाली आहे. माढ्याचे बबनदादा शिंदे, बार्शीचे दिलीप सोपल, श्रीवर्धनचे अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीचे आमदारदेखील पक्षांतराच्या तयारीत असल्याची  चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. 

राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यापूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनीही शिवसेनेत प्रवेश करून राज्यमंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवले. यामुळे युतीकडे असलेल्या मतदारसंघातील आघाडीचे आमदार सोयीने पक्षांतर करत असले, तरी इच्छुकांना भाजपच जवळचा पक्ष वाटत आहे. त्यातच भाजप नेत्यांनी पक्षात आला, तर विजयाची हमखास खात्री असा परवलीचा शब्द देण्यास सुरुवात केली असून आघाडीच्या आमदारांमध्ये याचीच सर्वाधिक धास्ती असल्याचे चित्र आहे. 

भाजप आणि शिवसेनेत प्रवेशासाठी आमदारांची तयारी असली तरीही युतीत संबंधित आमदारांचा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातो, यावरच त्यांचा पक्षप्रवेश अवलंबून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

फडणवीस-उद्धव यांच्यावरच पक्षांतराची मदार
या महिन्याअखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युतीतल्या जागावाटपाचे व मतदारसंघ आदलाबदलीचे चित्र निश्‍चित होणार आहे. त्यानंतरच आघाडीतील आमदारांचे पक्षांतर संबंधित पक्षात होईल. त्यासाठी स्वत: मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे समन्वयाने या आमदारांना कोणत्या पक्षात प्रवेश घ्यावा याची हमी देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मध्य प्रदेशात काँग्रेस सावध
भोपाळ : कर्नाटक आणि गोव्यातील काँग्रेसमधील घडामोडींपासून धडा घेत मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेते सावध झाले असून, आपल्या सर्व आमदारांना एक ठेवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तुलसी सिलावट यांच्या निवासस्थानी काँग्रेस आमदारांसाठी भोजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘हम सब एक है’चे प्रदर्शन करण्यात आले. या समारंभाला काँग्रेसबरोबरच सप, बसप आणि अपक्ष आमदारही उपस्थित होते. राज्यात काँग्रेसला निसटते बहुमत असल्याने या सर्वांची त्यांना कधीही आवश्‍यकता भासू लागते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News