आदित्य ठाकरेंची वाढती क्रेझ! 

परशुराम कोकणे 
Monday, 5 August 2019
  • आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून जबरदस्त नियोजन केल्याचे दिसून येत आहे.

सोलापूर : राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेत असूनही शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वतंत्रपणे हालचाली चालू ठेवली आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पुढे केले जात आहे. गेल्या आठवड्यात सोलापुरात झालेल्या जन आशीर्वाद यात्रेत, आदित्य संवाद उपक्रमावेळी आदित्य ठाकरे यांची क्रेझ दिसून आली. 

आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून जबरदस्त नियोजन केल्याचे दिसून येत आहे. आदित्य संवाद कार्यक्रमाच्या तयारीसाठी तर युवा सेनेची कोअर टीम एक दिवस आधीच सोलापुरात आली होती. वालचंद महाविद्यालयात आकर्षक सेट अप लावण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरवातीलाच आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनेच्यावतीने हा राजकीय कार्यक्रम असल्याचा आक्षेप घेऊन विरोध करण्यात आला. पोलिसांनी काही वेळातच सर्वांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. 

आदित्य संवाद कार्यक्रमावेळी समोरून येणाऱ्या प्रश्‍नांची उत्तरे देताना आदित्य यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये आश्‍वासक चित्र निर्माण केले. जवळपास चाळीस मिनिटे हा संवाद चालला. वेगवेगळ्या प्रश्‍नांवर उत्तरे देताना आदित्य यांनी शक्‍य तेवढे समाधान करण्याचा प्रयत्न केला. एका विद्यार्थ्याने धाडस करून खेकड्यामुळे धरण फुटू शकते का? हा प्रश्‍न विचारला. त्यावर आदित्य काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांनी शांतपणे उत्तर देवून विद्यार्थ्याचे समाधान केले. जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख आणि नव्यानेच सहपालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेले तानाजी सावंत कार्यक्रमावेळी पूर्णवेळ थांबून होते.

सावंत यांना क्रीडांगणाच्या प्रश्‍नावर लक्ष घालण्याचे आदित्य यांनी यावेळी सुचविले. हा कार्यक्रमास शहर मध्य विधानसभा मतदार संघात घेण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित बरेच विद्यार्थी याच मतदार संघातील रहिवासी असून ते नवमतदारही आहेत. याचा आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला फायदा होवू शकतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांची क्रेझ वाढत असल्याचे दिसून आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News