आदित्य ठाकरे : उठाव लुंगी, मी मुंबईकर ते केम छो वरळीकर!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 4 October 2019

वरळीच का?
आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा सुरू झाल्यावर ते वरळीतून लढतील, अशी अटकळ व्यक्त होत होती. वरळीतूनच का? असा प्रश्‍न निर्णाण झाला. १९९० पासून वरळीत फक्त एक अपवाद वगळता शिवसेनेचा आमदार आहे. सर्वाधिक नगरसेवकही शिवसेनेचे आहेत. निवडणूक नियोजन तज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी वरळी मतदारसंघ योग्य असल्याचे सांगितल्याचे समजते. या मतदारसंघात शिवसेनेला विरोधकच नाही. शिवसेनेशी दोन हात करू शकतील, असे वरळीतील माजी आमदार सचिन अहिर शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फीच झाली आहे.

वरळीच का?
आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा सुरू झाल्यावर ते वरळीतून लढतील, अशी अटकळ व्यक्त होत होती. वरळीतूनच का? असा प्रश्‍न निर्णाण झाला. १९९० पासून वरळीत फक्त एक अपवाद वगळता शिवसेनेचा आमदार आहे. सर्वाधिक नगरसेवकही शिवसेनेचे आहेत. निवडणूक नियोजन तज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी वरळी मतदारसंघ योग्य असल्याचे सांगितल्याचे समजते. या मतदारसंघात शिवसेनेला विरोधकच नाही. शिवसेनेशी दोन हात करू शकतील, असे वरळीतील माजी आमदार सचिन अहिर शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फीच झाली आहे.

‘केम छो...’ का?
शिवसेनेची स्थापना झाली ती दाक्षिणात्यांच्या विरोधातून. नंतर हा विरोध अमराठी समाजापर्यंत व्यापला. त्यात गुजराती समाजही आला. मात्र उद्धव ठाकरे यांनी गुजराती समाजाला कधीच नाराज केले नाही. हिंदुत्वाची हाक बाळासाहेब ठाकरे यांनी दिली असली तरी उद्धव यांनी सर्व भाषिक मतदारांमध्ये पक्ष रुजवण्याचा प्रयत्न केला. तीच गाडी आदित्य ठाकरे पुढे नेत आहेत. मुंबईत १२ ते १५ टक्के गुजराती, मारवाडी आणि जैन समाज आहे. संपूर्ण मुंबईचा विचार केल्यास गुजराती, मारवाडी आणि जैन समाज निर्णायक नसला तरी त्यांची मते बोनस नक्कीच ठरू शकतील. त्यामुळे फक्त ‘केम छो वरळी’ होर्डिंगचा विचार वरळीपुरता न करता संपूर्ण मुंबईसाठी करावा लागेल.

निवडणुकीच्या मैदानात का?
बाळासाहेब ठाकरे यांनी रिमोट कंट्रोलने फक्त पक्षच नाही चालवला तर राज्याची सत्ताही चालवली. त्यात त्यांचे राजकीय कौशल्य तर होतेच; पण त्याचबरोबर त्यांचा आदरयुक्त दराराही होता. ते सांगतील तोच उमेदवार निश्‍चित व्हायचा. उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली तेव्हा इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली. त्यावर बाळासाहेबांनीही नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी २०१४ च्या शेवटच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री होण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यात मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेपेक्षा मतदारांना भावनिक आवाहन होते. मात्र, आता पक्षावर वचक ठेवायचा तर बाहेर राहून उपयोग नाही. मुख्यमंत्री व्हायचे तर मागील दरवाजाने विधान परिषदेत जाण्याचे दिवस संपले आहेत. आदित्य यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी त्यांची आई रश्‍मी ठाकरे यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याची शक्‍यता आहे. मात्र, यंदाची निवडणूक लढवताना आपण फक्त एका मतदारसंघापुरते नसून संपूर्ण राज्याचे असल्याचे भासवण्यासाठी आदित्य यांनी राज्याचा दौराही केला. नवमतदारांना आकर्षित करण्याचाही तो प्रयत्न असू शकेल.

खेळी पलटूही शकेल
मुंबईत ३० ते ३५ टक्‍क्‍यांच्या आसपास मराठी मतदार आहेत. मात्र, उच्च मध्यमवर्गीय तसेच नवमराठी मतदार भाजपकडे गेल्याचे महापालिका निवडणुकीत दिसून आले. शिवसेनेचा मराठी मतदार ४० वर्षांच्या पुढील आहे. त्यामुळे मराठी मतांचा कमी झालेला टक्का भरून काढण्यासाठी ‘केम छो वरळी’चे बॅनर असू शकतील. मात्र, या खेळीमुळे हक्काचा मतदारही नाराज होण्याची शक्‍यता आहे. सध्या शिवसेनेला विरोधक नसल्याने त्याचा फारसा फरक पडणार नाही. मात्र, अशीच परिस्थिती महापालिका निवडणुकीपर्यंत राहील याची खात्री नाही. त्यामुळे या होर्डिंगची खेळी सेनेवर उलटू शकते. खासकरून आगामी महापालिका निवडणुकीपर्यंत काँग्रेसला उभारी आल्यास हे होर्डिंगचे परिणाम शिवसेनेला भोगावे लागू शकतील. समाजमाध्यमावर तर त्याचे आताच पडसाद दिसले. त्यामुळेच होर्डिंग काढण्याची वेळ सेनेवर आली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News