मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत आदित्य की उद्धव ठाकरे?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 11 November 2019
  • राज्यात शिवमहाआघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरू असल्याने मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेत बॅनरबाजी करण्यात आली.
  • शिवसेनेतील नेत्यांची इच्छा ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी असली; तरी युवासेनेतील पदाधिकाऱ्यांनी मात्र आदित्य ठाकरेंच्या नावाला पसंती.

मुंबई- राज्यात शिवमहाआघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरू असल्याने मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेत बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेतील नेत्यांची इच्छा ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी असली; तरी युवासेनेतील पदाधिकाऱ्यांनी मात्र आदित्य ठाकरेंच्या नावाला पसंती दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंना पुढे केले होते. तशा प्रकारची घोषणादेखील शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी केली होती. ‘मातोश्री’सह मुंबईतील अनेक ठिकाणी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी करणारे फलक युवासेनेकडून लावण्यात आले. ‘मातोश्री’बाहेर ‘युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार’ असे बॅनर लावल्यानंतर आता ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत’ असे बॅनर शिवसेनेकडून लावण्यात आले आहेत.

यामुळे मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेत दोन मतप्रवाह असल्याचे दिसत आहे. शिवसेना युतीमधून बाहेर पडून सरकार स्थापन करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. यामुळे शिवसेनेतील अनेक ज्येष्ठ नेत्यांना मुख्यमंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत. यामुळे पक्षांतर्गत बंडाळी वाढण्याची शक्‍यता आहे. संभाव्य बंडाळी रोखण्यासाठी पक्षाने आधी आदित्य आणि नंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशा आशयाचे फलक लावले असण्याची शक्‍यता आहे. या बाप- लेकाच्या स्पर्धेत मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News