तलाठी परीक्षा केंद्र एकीकडे पत्ता दुसरीकडे; सकाळचा पेपर दुपारी

भास्कर लांडे
Monday, 8 July 2019
  • विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
  • चुकीचा पत्त्यामुळे परभणीत परीक्षार्थ्यांचा गोंधळ

परभणी: पहिल्यांदाच होत असलेल्या तलाठी परीक्षा केंद्र एकीकडे तर पत्ता दुसरीकडील दिल्यामुळे अनेक परीक्षार्थ्यांना गोंधळ उडाला. पत्ता शोधण्यात काहींचा वेळ निघून गेला तर काहींना परीक्षेला मुकावे लागले. परभणीतील केंद्रांवर मागील आठ दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे सोमवारी (ता.८) उघडकीस आले आहे. 

परभणीतील तीन केंद्रावर आयोजित तलाठी परीक्षेसाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातून परीक्षार्थी सोमवारी (ता.८) सकाळी आले होते. ते प्रेरणा इन्स्टीट्यूट ऑफ फार्मासी केंद्रावर जाण्यासाठी केंद्राशेजारील व्यंकटेश नगरात गेले. परंतु व्यंकटेश नगरात प्रेरणा इन्स्टीट्यूट नव्हते. तरीही विचारपूस केल्यावर त्यांना हे केंद्र येथे नसल्याचे सांगितले. मग परीक्षार्थ्यांनी या केंद्राचा शोध घेतला. त्यासाठी विचारपूसही केली. तेव्हा परभणी शहरालगत असलेल्या दत्तधाम परिसरात प्रेरणा इन्स्टीट्यूट असल्याचे लक्षात आले. ते येथील केंद्रावर दाखल होईपर्यंत त्यांची वेळ संपूण गेली. 

खूप विनंती केल्यानंतरही परीक्षार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. अखेरीस उज्वला गायकवाड, मीना आवचार, निता गांधारे यांच्यासह काहांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेवून कैफीयत मांडली. परंतु त्यांच्या हाती निराशा आली. मग त्यांना दुपारी फोन करून बोलाविण्यात आले. आणि त्यांची परीक्षा घेण्याचे सांगितले. त्यांनी सकाळचा पेपर दुपारी दिला. तोही ज्यांनी तक्रार केली, त्यांनाच परीक्षेला बोलाविण्यात आले. परंतु ज्यांनी तक्रार केली नाही, ज्यांची नावे निवेदनावर नव्हती, पत्ता न सापडलेले परीक्षार्थी, प्रवेश मिळाला नाही म्हणून परत गेलेल्या परीक्षार्थ्यांना तलाठी परीक्षेला मुकावे लागले. अशांची संख्या किती आहे, याचाही पत्ता नाही. पुढेही आणखी विद्यार्थ्यांची गफलत होणार असून त्यांनाही परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

परीक्षेविना परतले लातूरचे परीक्षार्थी
साच प्रकार रविवारी (ता.७) लातूरच्या परीक्षार्थ्यांसोबत घडला. त्यांनाही चुकीच्या पत्त्यामुळे परीक्षा केंद्रावर जाण्यास उशीर झाला. त्यामुळे त्यांना परीक्षेला प्रवेश दिला नाही. ते परीक्षार्थी रिकाम्या हाती परतले. त्यांनी केलेला अभ्यास, परीक्षा शुल्क, दिलेला वेळ पाण्यात गेला. 

 

परीक्षा केंद्र तेच असून त्याचा पत्ता चुकीचा दिला आहे. या केंद्रावर वेळेवर पोहचता आले नसल्याने परीक्षाला प्रवेश मिळाला नाही. म्हणून घराकडे जाण्यासाठी बसस्थानकावर गेलो. तेव्हा जिल्हा प्रशासनाकडून फोन आल्याने परीक्षा देता आली, परंतु मागील आठ दिवसांपासून किती परीक्षार्थी परीक्षेला मुकले आहेत, याचा नेम नाही.
-शैलेश कुंवर, परीक्षार्थी. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News