पूरग्रस्त भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 10 August 2019
  • ‘महावितरण’ची तयारी; साधनसामग्रीसह पुणे, बारामती, सातारा, सोलापूरहून येणार ३२ पथके

कोल्हापूर - महापुराच्या संकटामुळे विस्कळित झालेल्या यंत्रणेला युद्धपातळीवर पूर्ववत करण्यासाठी महावितरण कोल्हापूर परिमंडलाच्या मदतीला शेजारच्या जिल्ह्यांतून अतिरिक्त कुमक मिळणार आहे. पूर ओसरताच पुणे, बारामती, साताऱ्यासह बारामतीहून ३२ पथके कोल्हापूर व सांगलीत दाखल होतील. याशिवाय, दोन्ही जिल्ह्यांतील महावितरणचे चार हजार व कंत्राटी दीड हजार असे साडेपाच हजारांचे मनुष्यबळ अविरत कार्यरत आहे. त्यांनी २ दिवसांत ६१ हजार ग्राहकांचा व ५ उपकेंद्रांचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे.

वीजपुरवठा ठप्प असलेल्या भागात पूर ओसरताच जनजीवन पूर्ववत व्हायला सुरवात होईल. त्यासाठी वीजपुरवठा युद्धपातळीवर पूर्ववत करण्याची तयारी केली आहे. ‘महावितरण’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी कोल्हापूर व सांगलीला लागणारी सर्वतोपरी मदत करण्यासाठी शेजारच्या जिल्ह्यातून अतिरिक्त मनुष्यबळ व साधनसामग्री पुरविण्याचे निर्देश वरिष्ठ प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार लागणारे रोहित्र, खांब, कंट्रोल केबल, रिले वीजमीटर आदी साहित्य कोल्हापूर व सांगलीला मिळेल. यंत्रणा गतिमान करण्यासाठी प्रभारी प्रादेशिक संचालक सुनील पावडे काल पासून कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. त्यांनी शेजारच्या चार जिल्ह्यांतून अतिरिक्त कुमक मागविली आहे.

कोल्हापूरसाठी २४ व सांगलीसाठी आठ अशी ३२ पथके रस्ते सुरू होताच दोन्ही जिल्ह्यांत दाखल होतील. प्रत्येक पथकात एक अभियंता, तीन वीज कर्मचारी व आठ कंत्राटी कामगार असतील. आठ पथकांमागे एक कार्यकारी अभियंता असेल. जो या पथकाचे पूर्ण नियोजन पाहील. तसेच, पथकाकडे स्वत:चे वाहन व लागणारी साधनसाम्रगी असेल. आवश्‍यक असणारे साहित्य कोल्हापूरकडे निघाले आहे. 

पूरग्रस्तांच्या छावण्यांना प्राधान्य
दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हा रुग्णालय तसेच महत्त्वाची खासगी रुग्णालये, रेल्वेस्थानक, बसस्थानक, पूरग्रस्तांसाठी उभारलेले कॅम्प आदींचा वीजपुरवठा सुरळीत ठेवला आहे. जिल्ह्यात नऊ पूरग्रस्त कॅम्पला महावितरणने जनरेटरद्वारे वीजपुरवठा केला आहे. काल मध्यरात्रीपर्यंत चार उपकेंद्रे सुरू केली आहेत. शहरातील बापट कॅम्प उपकेंद्र आज सकाळी ११.५० ला पूर ओसरल्याने सुरू करण्यात आले.

युद्धपातळीवर काम
जसजसा महापूर ओसरत आहे, तसतशी वीज पूर्ववत करण्यास ‘महावितरण’ युद्धपातळीवर काम करीत आहे. कोल्हापूरचे कळंबा फिल्टर हाऊस काल दुपारीच सुरू केले असून, सांगली पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठाही ‘महावितरण’कडून सुरू आहे. मात्र, जॅकवेलमध्येच पाणी शिरल्याने पंप हाउस बंद ठेवण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News