बेकायदा पार्किंगनंतर बेकायदा गायी, गुरांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 31 July 2019

वाहानतळांच्या परीसरात होणाऱ्या बेकायदा पार्किंगवर 10 ते 15 हजार रुपये दंड आकारण्यास सुरवात केल्यानंतर आता रस्त्यांवरील बेकायदा गायी, गुरांकडे मोर्चा वळवला आहे. रस्ते पदपथ आणि चौकांत गायी, गुरांना बांधून त्यांना चारा देऊन उदरनिर्वाह करणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

मुंबई : वाहानतळांच्या परीसरात होणाऱ्या बेकायदा पार्किंगवर 10 ते 15 हजार रुपये दंड आकारण्यास सुरवात केल्यानंतर आता रस्त्यांवरील बेकायदा गायी, गुरांकडे मोर्चा वळवला आहे. रस्ते पदपथ आणि चौकांत गायी, गुरांना बांधून त्यांना चारा देऊन उदरनिर्वाह करणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. गायी गुरांना बांधलेले आढळल्यास पालिका आता अडीच हजार रुपयांऐवजी 10 हजार रुपयांचा दंड आकारणार आहे. रस्त्यांवर वाहतूकीला तसेच पदपथावर पादचाऱ्यांना अडथळा होत असल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. 

मुंबईतील मंदिरे, रस्त्यांचे नाके, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी गाई-गुरे बांधली जात असल्याचे दिसत आहे. त्याचा वाहतूकीला आणि पादचाऱ्यांना त्रास होत आहे. गाईंना चारा देण्याच्या मोबदल्यात पैसे घेऊन ते आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, गाईला बांधलेल्या ठिकाणी मल-मूत्र, चारा पडून त्या जागा अस्वच्छ होऊ परिसरात दुर्गंधी पसरते. असे आढळून आल्यास अशा गायी-गुरांना पालिकेच्या कोंडवाडा विभागामार्फत जप्त करण्यात येतात. यापूर्वी बांधून ठेवलेल्या गायी पकडून नेल्यानंतर त्या सोडवण्यासाठी पालिकेकडून अडीच हजार रुपये इतका दंड आकारला जात होता. आता या दंडाच्या शुल्कात वाढ केली जाणार आहे.

त्यामुळे यापुढे गायीला पकडून नेल्यास ती सोडवण्यासाठी संबंधित मालकाला दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. गायीगुरांना जप्त केल्यानंतर त्यांना मालाड येथे नेण्यासाठी पालिका वाहन, कर्मचारीवर्ग, वाहनांचे इंधन आदींवर मोठ्या प्रमाणात खर्च येतो. हा खर्च दंडाच्या स्वरुपातून वसूल केला जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली. कोंडवाड्यामार्फत पकडण्यात येणाऱ्या मोठ्या जनावरांसाठी सध्या अडीच हजार रुपये दंड आकारला जातो, तर लहान जनावरांसाठी 1500 रुपये दंडाची रक्कम आकारली जाते.

मार्च 2004 मध्ये पालिकेने मंजूर केल्याप्रमाणे ही दंडाची रक्कम आकारली जाते. परंतु, आता या दंडाच्या रकमेत 15 वर्षांनी वाढ करण्याचा विचार प्रशासनाचा आहे. पकडण्यात आलेल्या मोठ्या जनावरांसाठी 10 हजार रुपये तर लहान जनावरांसाठी पाच हजार रुपये एवढा दंड आकारला जाईल, असे देवनार पशुवधगृहाच्या महाव्यवस्थापकांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीत मंजुर होण्याची दाट शक्‍यता आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News