रायगड जिल्ह्यात तब्बल ५०४ मुले शाळाबाह्य

प्रमोद जाधव
Wednesday, 9 October 2019

मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत रायगड जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये ५०४ मुले शाळाबाह्य असल्याचे स्पष्ट झाले होते.

अलिबाग:- मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत रायगड जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये ५०४ मुले शाळाबाह्य असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातील २७९ विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षणाद्वारे शाळेत रुजू करण्यात आले आहे. पालकांचे स्थलांतर, रोजगार, ऊसतोडी, दुष्काळी परिस्थिती, अंधश्रद्धा, बालविवाह, भावंडांना सांभाळणे आदी कारणांमुळे ही मुले शाळेपासून दूर होती.

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण सुरू करण्यात आले आहे. ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणाकडे देण्यात आली आहे. एकसुद्धा मूल शाळाबाह्य राहणार नाही, या दिशेने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत स्थलांतरित बालकांना शिक्षण देण्यासाठी आणि शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.

शाळाबाह्य मुलांना शाळेत आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास प्राधान्य देण्यात आले. त्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये बालरक्षकची संकल्पना राबविण्यात आली. शाळेतील शिक्षकाची बालरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार, शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्याचे काम करण्यात आले. त्यात शाळा व्यवस्थापन समितीकडूनही शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी सहभाग मिळाला. त्यामुळे जिल्ह्यात ५०४ शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्यामध्ये रायगड जिल्ह्यातील शिक्षण विभागाला यश आले आहे. त्यात २८१ मुले आणि २२३ मुलींचा समावेश आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News