‘वैद्यकीय’ प्रवेशासाठी ५९ हजार अर्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 June 2019

उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरवतानाच शैक्षणिक आरक्षण १२ टक्के ठेवण्याचा आदेश दिला.

मुंबई : वैद्यकीय प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज करण्याची मुदत गुरुवारी सायंकाळी संपली. या मुदतीपर्यंत ६९ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, यापैकी ५९ हजार २७६ विद्यार्थ्यांनी अर्जाचे शुल्क भरले आहे. यात मुंबईतील विद्यार्थ्यांची ५,८०३ संख्या अधिक आहे, तर सर्वांत कमी २८५ अर्ज गडचिरोलीतून दाखल झाले आहेत.

यासह प्रवेशाचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून उपलब्ध जागा ३० जून रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना पाच जुलैपर्यंत ऑनलाईन पसंतीक्रम भरता येईल. राज्यभरातून तब्बल ६९ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. यातील ६१ हजार ६४५ विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज निश्‍चित केले आहेत. त्यातील ५९ हजार २७६ जणांनी प्रवेशाचे शुल्क भरले आहे. 

आरक्षणामुळे प्रवेश लांबणीवर?
उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरवतानाच शैक्षणिक आरक्षण १२ टक्के ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे वैद्यकीय, अभियांत्रिकी, अकरावी, आयटीआय आदी अभ्यासक्रमांसाठी नव्याने जागावाटप करावे लागणार आहे. त्यातच राज्य सरकार १६ टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा न्यायालयात जाणार असल्याने प्रवेशप्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन, वास्तुशास्त्र आदी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया तांत्रिक कारणामुळे रद्द करावी लागली होती. ही प्रक्रिया नव्याने राबवावी लागल्यामुळे प्रवेशाचे वेळापत्रक बिघडले आहे. आरक्षणात बदल झाल्यामुळे या अभ्यासक्रमांसाठी नव्याने ‘सीट मॅट्रिक्‍स’ तयार करावे लागणार आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News