राज्यातील ५ हजार विद्यार्थी वाढीव गुणांपासून वंचित

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • क्रीडा, चित्रकला, गायन या विषयांतील गुण मंडळाकडे देण्यास उशीर

नेरळ : निकालाचा टक्का राज्यात घसरला असताना राज्यातील तब्बल ५००० हून अधिक विद्यार्थी हे वाढीव गुणांपासून वंचित राहिले आहेत. चित्रकला, क्रीडा आणि गायन या अन्य विषयांत विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुण हे त्या त्या माध्यमिक शाळांनी शालांत परीक्षा मंडळाला निर्धारित वेळेत कळवले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.

अनेक माध्यमिक शाळांचे विद्यार्थी हे शाळेतील अभ्यासक्रमाशिवाय अन्य विषयांत पारंगत होण्यासाठी स्पर्धांमध्ये भाग घेत असतात. अशा विद्यार्थ्यांना शालांत परीक्षा मंडळाच्या निर्देशाप्रमाणे वाढीव गुण दहावीच्या परीक्षेत दिले जातात. त्यासाठी शालांत परीक्षा मंडळ हे राज्यातील सर्व नऊ परीक्षा मंडळांना वाढीव गुण त्या त्या बोर्डाच्या कार्यालयात पोहचवण्यासाठी वेळ निश्‍चित करून देत असतात. या वर्षी ५ फेब्रुवारी अशी मुदतवाढ दिली होती; मात्र राज्यातील १०५ शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचे वाढीव गुण निर्धारित वेळेत देता आले नाहीत.

विद्यार्थ्यांना मोठा फटका
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी निर्धारित वेळेत विद्यार्थ्यांचे वाढीव गुण शालांत परीक्षा मंडळाकडे न पोहचवणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत काळजी घेण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र हे आश्‍वासन फोल ठरले असून पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्यात आलेले नाहीत. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने निर्धारित वेळेनंतर वाढीव विषयांचे गुण घेऊन येणाऱ्या शाळांचा निर्णय बाजूला ठेवल्याने पालकवर्ग नाराज झाला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना किमान दीड ते दोन टक्के गुणांचा फटका बसणार आहे.

क्रीडा, चित्रकला, गायन आदी विषयांचे विद्यार्थ्यांचे गुण सादर करण्यासाठी मंडळाने शाळांना दोन वेळा मुदतवाढ दिली होती. याकडे शाळांनी दुर्लक्ष केले आहे. शाळांनी मुदतीमध्ये प्रस्ताव सादर न केल्याने ते पुन्हा परत पाठवण्यात आले आहेत. या प्रकाराला सर्वस्वी शाळा जबाबदार आहेत.
- शरद खंडागळे, मुंबई विभागीय मंडळ सचिव

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News