नोकरीचे अमिष दाखवून तरुणाकडून घेतली पाच हजारांची लाच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 June 2019
  • बेरोजगार तरुणाकडून महावितरण विद्युत निरीक्षक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाने पाच हजारांची लाच स्वीकारली. 
  • सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कनिष्ठ लिपिकास रंगेहात पकडले. 

सोलापूर : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (आयटीआय) इलेक्‍ट्रिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर व्यवसाय करण्यासाठी परवाना देण्याकरिता बेरोजगार तरुणाकडून महावितरण विद्युत निरीक्षक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाने पाच हजारांची लाच स्वीकारली. सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कनिष्ठ लिपिकास रंगेहात पकडले. 

कैलास दिगंबर मिसाळ वय 45 असे लाच घेणाऱ्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) इलेक्‍ट्रिकचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तरुणाने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता. तो अर्ज पुणे येथील कार्यालयात पाठविला होता.

मिसाळ याने वरिष्ठ कार्यालयात सांगून परवाना मिळवून देण्यासाठी सात हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले. तरुणाने याबाबत लाचलुचपत लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीच्या पडताळणीनंतर एसीबीच्या पथकाने विद्युत निरीक्षक कार्यालयात सापळा लावला. लिपिक मिसाळ हा पाच हजारांची लाच घेताना सापडला. 

एसीबीचे सहायक पोलिस आयुक्त अजितकुमार जाधव, पोलिस निरीक्षक कविता मुसळे, सहायक फौजदार नीलकंठ जाधवर, पोलिस नाईक अर्चना स्वामी, नीलेश शिरूर, प्रफुल्ल जानराव, शाम सुरवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणात विजयपूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News