वर्धा जिल्ह्यात ४० हजार विद्यार्थांना मिळणार गणवेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 June 2019
  • मोफत गणवेश योजनेकरिता जिल्ह्यासाठी दोन कोटी २० लाख १७ हजार रुपये निधी मंजूर
  • तालुक्यातील ४० हजारांवर विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

वर्धा: समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत २०१९-२० मध्ये मोफत गणवेश योजनेकरिता जिल्ह्यासाठी दोन कोटी २० लाख १७ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेचा विविध तालुक्यातील ४० हजारांवर विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
 
सदर योजनेसाठी जिल्ह्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीची मुले तसेच दारिद्रय रेषेखालील पालकांची मुले असे एकूण ४० हजार २८ लाभार्थी पात्र आहेत. 

‘महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुबई यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात शिल्लक असलेल्या निधीतून सदर योजनेसाठी शाळा व्यवस्थापन समितीला निधी उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. समग्र शिक्षाअंतर्गत जिल्ह्यात शिल्लक असलेला दोन कोटी ३६ लाख रुपयांचा निधी गटशिक्षणाधिकारी यांना १८ जूनला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 

सदर निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात दोन दिवसांत जमा  करण्यात यावा, असे सूचित केले आहे. मोफत गणवेशाची कार्यवाही व्यवस्थापन समितीकडून २४ जूनपर्यंत करावयाची असून २६ जूनला शाळेच्या प्रारंभदिनी लाभार्थी विद्यार्थ्याना  गणवेश उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News