इचलकरंजीतील तरुणाईचे २४ तास सेवाव्रत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 10 August 2019
  • एक हजार तरुण मदतीसाठी तत्पर; १२ हजार नागरिकांना केले स्थलांतरित

इचलकरंजी - शहरात आलेल्या महापुरात मदतीसाठी तरुणाई २४ तास राबत आहे. शहरातील गावभाग परिसर पाण्याखाली गेला असून १२ हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांच्या बचावासाठी शहर व परिसरातील एक हजारहून अधिक तरुण मदतीसाठी तत्पर आहेत.

डिजिटल युगात मोबाईलमध्ये मग्न असणारी तरुणाई सध्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिवाचे रान करताना दिसत आहे. प्रशासन, नगरपालिका कर्मचारी, रेस्क्‍यू फोर्स, पोलिस, स्वयंसेवी संस्था यांच्या खांद्याला खांदा लावून तरुण बचावकार्यासाठी पुढे येत आहेत. स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्त नागरिकांची शहरात विविध ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली आहे. महेश भवन येथून सेंट्रल किचनद्वारे सर्वांना अन्न पुरविले जात आहे.

या ठिकाणी फूड पॅकेट भरणे, सर्वांना काळजीपूर्वक अन्न पोचवणे, छावणीच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करणे, जनावरांना चारा उपलब्ध करून देणे व इतरत्र अडकून बसलेल्या नागरिकांचा बचाव करण्याच्या कामात तरुण मग्न आहेत. गेले सात दिवस सातत्याने तरुणाई मदत करताना दिसत आहे. चार दिवस महापुरामुळे महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे कॉलेज तरुण सुटीचा सदुपयोग पूरग्रस्तांच्या मदतीसाठी करत आहेत. कोणी जीवनावश्‍यक वस्तू एकत्र करून देत आहेत, तर अनेक तरुण रेस्क्‍यू फोर्स, होमगार्डच्या भूमिकेत आपले कर्तव्य बजावत आहेत.

व्हॉटस्‌ॲपचा आधार मदतीचा
व्हॉटस्‌ॲपवर मग्न असणारी तरुणाई सध्या मदतकार्याची सांगड घालत आहे. व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर कोणी काय मदत करणार, कशी मदत करायची, यावर चर्चा होऊ लागल्या आहेत. ग्रुपची नावे बदलून सुसंगत मदतीची चर्चा होत आहे. व्हॉटस्‌ॲपवर पूर्वनियोजन करून कोठे तरी एकत्र येऊन मदतीसाठी तरुण धावत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News