विद्यार्थी मिळविण्यासाठी 20 हजार कमिशन 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019
  • कनिष्ठ महाविद्यालयांची मजबुरी
  • सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचा सर्वाधिक समावेश 

नागपूर : शहरात बड्या खासगी शिकवणी वर्गांची मक्तेदारी चांगलीच वाढली असल्याचे चित्र आहे. आपल्या प्रसिद्धीचा फायदा घेत, या शिकवणी वर्गाद्वारे कनिष्ठ महाविद्यालयांची लुट करण्यात येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रवेशामागे 5 ते 20 हजार रुपयाचे कमिशन घेण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा गोरखधंदा सर्रासपणे सुरू असून शिक्षण विभागाकडून याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. 

अकरावीमध्ये प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांकडून खासगी शिकवणी वर्गाच्या पायऱ्या झिजविण्यात येत असल्याचे दिसून येते. मात्र, प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी विशिष्ट शुल्क निर्धारित केले जाते. हे शुल्क देऊ शकणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची निश्‍चिती केली जाते. त्यासाठी शहरातील नामवंत खासगी शिकवणी वर्गाच्या माध्यमातून शाळांची तपासणी केली जाते. शिवाय त्यांच्याकडे अभ्यासक्रमांचे शुल्कही तपासण्यात येते.

प्रवेश शुल्क 20 किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास त्या कनिष्ठ महाविद्यालयाची निवड केली जाते. विशेष म्हणजे सीबीएसई दहावीचा निकाल लागल्यावरच या प्रक्रियेस सुरुवात झाल्याचे समजते. त्यामुळे अकरावीत सीबीएसई शाळांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची अडवणूक करुन त्यांच्या पाल्यांना नाईलाजाने ठरविलेल्या शाळांमध्येच प्रवेश दिला जात आहे.

त्यासाठी शहरातील दोन सीबीएसई शाळांची खासगी शिकवणी वर्गाकडून निवड करण्यात आली आहे. यापैकी एक शाळा कळमेश्‍वर मार्गावर असल्याचे समजते. यापैकी एका शाळेत जवळपास हजारावर प्रवेश झाल्याचे समजते. 

दुसरीकडे बोर्डाचा दहावीचा निकाल अद्याप लागायचा असला तरी, विद्यार्थ्यांचे प्रवेश कोणत्या कनिष्ठ महाविद्यालयात घ्यायचे हे शिकवणी वर्गाकडून ठरविण्यात आले आहे. मात्र, सीबीएसईच्या तुलनेत बोर्डाशी संलग्नित असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांसाठी 5 ते 10 हजार रुपये कमिशन आकारण्यात आले असल्याचे समजते. 

शिक्षण विभाग निद्रावस्थेत 
शिकवणी वर्गासोबत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे टायअप असताना त्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई शिक्षण विभागाकडून होताना दिसून येत नाही. याउलट तक्रार नसल्याचे सांगून विभागाकडून वेळ मारुन नेण्यात येते. त्यातूनच आता खासगी शिकवणी वर्गांची मुजोरी वाढली असल्याचे दिसून येते. मात्र, त्यावर कारवाई करण्याऐवजी विभाग निद्रावस्थेत असल्याचे दिसते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News